
Crime News : बजाज फायनान्स कंपनीच्या नावे फसवणूक
डोंबिवली - बजाज फायनान्स मधून कर्ज पास करुन देण्याच्या बहाण्याने दिल्लीतील तिघांच्या टोळक्याने विविध राज्यातील नागरिकांची लाखोंची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. मानपाडा पोलिसांनी शिताफीने याचा तपास करत शिमला, दिल्ली, उत्तर प्रदेश येथून आरोपींना अटक केली आहे.
नमन गुप्ता (वय 22), आकाशकुमार चांदवानी (वय 28) आणि रिशी सिंग (वय 28) अशी अटक आरोपींची नावे असून त्यांच्याकडून 7 लाख 34 हजाराची रोख रक्कम, 5 मोबाईल, एटीएम कार्ड असा एकूण 9 लाख 21 हजाराचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील कुराडे यांनी दिली. यापूर्वीही बजाज फायनान्स कंपनीमार्फत कर्ज मिळवून देतो असे सांगत बनावट कॉल सेंटर चालविणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली होती.
मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारे अनिल आव्हाड यांना घरासाठी कर्ज हवे होते. विविध बॅंकांमध्ये होम लोनसाठी ते प्रयत्न करत होते. 22 नोव्हेंबरला त्यांना आर.के.शर्मा नावाच्या व्यक्तीचा फोन आला होता. त्यावेळी त्याने बजाज फायनान्स मधून बोलत असून तुमच्या नावावर 10 लाखाचे लोन पास झाले असल्याचे सांगितले. त्यानंतर अनिल यांना वारंवार बजाज फायनान्स नावाने कर्ज मंजुर झाल्याचे फोन व मॅसेज येऊ लागले.
कर्ज पाहिजे असल्यास शशांक प्रसाद यांचे नावे दिल्ली येथील कोटक महिंद्रा बॅंकेच्या खात्यावर 30 हजार रुपयांची प्रोसेसिंग फी भरावी लागेल असे सांगण्यात आले. अनिल यांनी 30 हजार रुपये ऑनलाईन भरणा केला. त्यानंतर आणखी 27 लाखाचे कर्ज मंजुर झाले असून प्रोसेसिंग फी साठी आणखी भरणा करावा लागेल असे सांगण्यात आले. पैसे भरले नाही तर यापूर्वी भरण्यात आलेले पैसे बुडतिल असे अनिल यांना सांगण्यात येत होते.
अशा प्रकारे भामट्यांनी अनिल याांच्याकडून 7 लाख 34 हजार रुपये भरणा करुन घेतले. अनिल यांनी कर्जाविषयी विचारणा केली असता त्यांना आणखी एक लाख रुपये भरणा करण्यास सांगितले. याविषयी संशय आल्याने अनिल यांनी मानपाडा पोलिस ठाण्यात धाव घेत डिसेंबर महिन्यात तक्रार दाखल केली होती. दाखल तक्रारीनुसार मानपाडा पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी तपासास सुरुवात करत अनिल यांचे बॅंक खाते लागलीच सील करणेबाबत संबंधित बँकांशी पत्रव्यवहार केला.
त्यानुसार बॅंक खाती सील करण्यात आली. बॅंक अकाऊंट वर असलेल्या पत्त्यांची खात्री करणेसाठी पोलिसांचे एक पथक दिल्लीला रवाना झाले. दिल्ली येथून आरोपी नमन गुप्ता हा अमृतसर येथे असल्याचे समजले. तेथे पोलिस गेले असता तो शिमला येथे गेला असल्याचे समजले. त्यानंतर शिमला येथील एका लॉजवरुन नमनला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याचे साथीदार हे नोयडा व दिल्ली येथे रहात असल्याचे समजले.
त्यानुसार दिल्ली येथून आकाश कुमार चांगवानी व रिशी सिंग याला नयडा येथून ताब्यात घेतले. आरोपींनी बनावट कागदपत्रांच्या आधारे विविध बँकांमध्ये खाते उघडून उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, पुणे येथे राहणाऱ्या नागरिकांना बजाज फायनान्सचे लोन मंजुर झाल्याचा फोन करुन त्याची प्रोसेस फी म्हणून रक्कम सांगून त्यांची फसवणूक करत असल्याचे उघड झाले आहे.