चित्रपटांतील गांधीवाद! 

चित्रपटांतील गांधीवाद! 

आज भारताचा 71 वा प्रजासत्ताक दिन. स्वातंत्र्यानंतर भारतीय संविधानानुसार गणराज्याचा कारभार सुरू झाला. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात अनेकांचे मोठे योगदान होते. महात्मा गांधी यांनी अहिंसा आणि शांततेच्या मार्गाने इंग्रजांविरोधात लढा दिला. यंदा गांधीजींचे 150 वे जयंतीवर्ष साजरे होत आहे. भारताचा 71 वा प्रजासत्ताक साजरा करत असताना गांधीवादाच्या लोकजीवनावरील प्रभावाकडेदेखील पाहायला हवे. 

चित्रपटांतून लोकजीवनाचे, येथील संस्कृतीचे, वैचारिक प्रवाहांचे प्रतिबिंब आढळत असते. ते चित्रपटांचे वैशिष्ट्यच. त्यामुळेच गांधीजींसारख्या व्यक्तीमत्त्वाने येथील वैचारिक आणि भावजीवनावर जो परिणाम केला त्याचे प्रतिबिंब चित्रपटांतून उमटणे अपरिहार्यच होते. ते वेगवेगळ्या मार्गांनी उमटलेही. मात्र थेट गांधी आणि गांधीवादावर मोजक्‍या चित्रकर्मींनी चित्रपट केले. ऍटनबरो यांचा गांधी, शाम बेनेगल यांचा मेकिंग ऑफ महात्मा, कमल हसन यांचा हे राम, फिरोज खान यांचा गांधी माय फादर, एम. एस. सत्यू यांचा गर्म हवा हे गांधीवादावरील काही चित्रपट. गिरीष कासारवल्ली यांचा कूर्मावतारम, व्ही. शांताराम यांचा दो आँखे बाहर हाथ, राजकुमार हिराणी यांचा लगे रहो मुन्नाभाई या चित्रपटांतून आपणांस गांधी भेटतात. त्यातील काही चित्रपटांविषयी... 

कूर्मावतारम 
गिरीष कासारवल्ली यांचा कूर्मावतार हा चित्रपट 2013 मध्ये आला. अनेक चित्रपट महोत्सवात गाजलेल्या या चित्रपटाने राष्ट्रीय पारितोषिकावरदेखील मोहोर उमटवली. समुद्र मंथनाच्या पुराणकथेवर आधारलेल्या या चित्रपटात कासवाचा एक प्रतीक म्हणूनदेखील उत्तम वापर दिग्दर्शकाने केलेला आहे. 
आनंद राव (शिकारीपुरा कृष्णमूर्ती) ही व्यक्ती सरकारी कारकून असते. आयुष्यभर कामाव्यतिरिक्त कशातही त्यांनी कधी लक्ष दिलेले नसते. आता निवृत्तीला आलेले असतात ते. अनपेक्षितपणे त्यांना म. गांधी यांच्या जीवनावर बनत असलेल्या मालिकेत गांधींची भूमिका करण्याची संधी मिळते. त्याकरीता गांधींचा अभ्यास करता करता आनंद राव यांच्या आयुष्यावरदेखील गांधींचा प्रभाव पडू लागतो; मात्र हे सहजासहजी घडत नसते. गांधी मालिकेचा टीआरपी वाढत जातो तसतशी राव यांना जाहिरातींमध्येदेखील कामे मिळतात. त्यातून राव व त्यांच्या कुटुंबाला अधिकचे पैसे मिळू लागतात. आता राव यांच्याकडे लोक आदराने पाहू लागतात. एके दिवशी राव एका तरुणाला कॉलेजच्या आवारात पानटपरीसाठी परवाना मिळवून देतात. तो तरुण राव यांना खाऊ व पैसे देतो. ही चुकीचीच गोष्ट. पण त्याकडे राव आकर्षित होतात. या प्रसंगी दिग्दर्शकाने पोलिसांच्या सायरनच्या आवाजाचा वापर केला आहे. चित्रपटात शेवटच्या प्रसंगादरम्यान गोडसे साकारणारा कलाकार राव यांच्या सुमार अभिनयाबाबत बोलतो त्या वेळी राव अश्रूभरल्या डोळ्यांनी त्याला विनंती करतात. म्हणतात, मी खरंच वाईट अभिनेता आहे, पण तरीही आपण कसेही करून चित्रिकरण पूर्ण करू या. असे म्हणून राव पाठमोरे होतात, तेव्हा तो स्वतःला मोठा अभिनेता समजणारा कलाकार प्रचंड अस्वस्थ होऊन जातो... अतिशय वास्तवदर्शी आणि मनाला भिडणारा हा चित्रपट मानवी परिघातील विविध कंगोऱ्यांना स्पर्श करत जाणारा आहे. 

दो आँखे बारह हाथ 
हा चित्रपट एका सत्य घटनेवर बेतलेला आहे. औंध संस्थानचे राजे भगवंतराव पंतप्रतिनिधी यांनी गांधी विचाराने प्रभावित होऊन आपल्या संस्थानात अनेक सुधारणा राबवल्या. गांधींच्या मार्गावर चालताना या राजाने कैद्यांनीदेखील सत्य-अहिंसेच्या मार्गावर चालावे यासाठी संस्थानातील आटपाडी (ता. खानापूर, जि. सांगली) येथे खुले कारागृह सुरू केले. याच खुल्या कारागृहावर आधारित दो आँखे बारह हाथ हा चित्रपट व्ही. शांताराम यांनी बनवला. शांताराम यांचे दिग्दर्शन आणि ग. दि माडगुळकर यांची पटकथा, संवादलेखन असलेल्या या चित्रपटालादेखील जगभरात नावाजले गेले. 
हत्येच्या आरोपाखाली शिक्षा भोगणाऱ्या सहा अट्टल कैद्यांना पुन्हा सत्य-अहिंसेच्या मार्गावर घेऊन येऊ पाहणारा तुरुंगाधिकारी आदिनाथ (व्ही. शांताराम) असे या चित्रपटाचे कथानक. हा तुरुंगाधिकारी या कैद्यांचे मनपरिवर्तन व्हावे, त्यांनी कष्ट करून नैतिक मार्गाने जगावे यासाठी त्यांना एका खुल्या कारागृहात घेऊन जातो. आझादनगरच्या माळरानावर येतो. तेथे शेतीसाठी योग्य जमीन तयार करायला सांगतो. कैद्यांमध्ये त्यांच्यासोबत काम करू लागतो, तेव्हा कैदीदेखील आश्‍चर्यचकित होतात. एकेदिवशी दलिया हा कैदी दाढीच्या निमित्ताने आदिनाथचा वस्तऱ्याने गळा कापायचा प्रयत्न करतो, पण धाडस न झाल्यामुळे सत्य सांगून कैदी पळ काढतात.

तेव्हा हा प्रयोग फसल्याचे आदिनाथकडून त्यांचा वरिष्ठ अधिकारी लिहून घेतो. त्यांना तो कोठडीत टाकतो. जमादाराला कैद्यांना शोधण्याचा हुकूम सोडतो. जमादार शोध घेतो तर त्याला दिसते, की कैदी त्याच शेतात काम करात आहेत. हे ऐकून आदिनाथचा त्याच्या कामावरील विश्‍वास अधिकच वाढतो. बाजारातील दलालांवरदेखील हा चित्रपट भाष्य करतो. 
एके दिवशी बाजारातील दलाल कैद्यांच्या वसाहतीतील शेतात जनावरे सोडतात. त्यातील एक बैल ओसरीत बेशुद्ध कैद्यांना मारण्यास येताना पाहून आदिनाथ त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतो. त्यात स्वतःचे बलिदान देतो. दरम्यान, कैद्यांची तुरुंगातून मुक्‍ती होते, पण आमच्यावर खिडकीतून नरज ठेवणारे बाबूजी आतादेखील आकाशातून आमच्यावर नर ठेवत आहेत असे म्हणत कैदी त्या खुल्या तुरुंगातून जाण्यास नकार देतात. प्रेम, करुणा, दयाभाव असेल तर वाईटातील वाईट विचारसरणीवरदेखील विजय शक्‍य असल्याचे या चित्रपटातून दाखविण्यात आले आहे. 

लगे रहो मुन्नाभाई 
राजकुमार हिराणी यांचा लगे रहो मुन्नाभाई हा व्यावसायिक पठडीतील विनोदीपट. मुरली शर्मा ऊर्फ मुन्ना (संजय दत्त) व सर्किट (अर्शद वारसी) हे दोघे गुंड. मुन्नाचे रेडिओ जॉकी जान्हवी (विद्या बालन) हिच्यावर प्रेम जडते. आपण इतिहासाचे प्राध्यापक असल्याचे तो तिला सांगतो. एके दिवशी ती तिच्या वृद्धाश्रमात गांधीविचारांवर बोलण्यासाठी आमंत्रित करते. त्यासाठी मुन्ना ग्रंथालयात जाऊन दिवस-रात्र गांधीजींविषयीची पुस्तके वाचतो. परिणामी मुन्नाला आपल्या आसपास गांधी असल्याचा भास होऊ लागतो. बापूजी त्याला अहिंसा व सत्याच्या मार्गाने जाण्यासंबंधी प्रवृत्त करतात. एके दिवशी एक बांधकाम व्यावसायिक जान्हवी व निराधार ज्येष्ठ नागरिक राहत असलेला बंगला बळकावतो.

तो बंगला परत मिळवण्यासाठी मुन्नासह सर्व जण मिळून सत्याग्रह करतात. मुन्ना रेडिओवरूनदेखील लोकांना सत्य व अहिंसेच्या मार्गाने आपल्या जीवनातील समस्यांना सामोरे जाण्याचे धडे देत असतो. अनेकांच्या आयुष्यात तो बदल घडवून आणतो, पण स्वतःबाबत जान्हवीला सत्य सांगण्यास अजूनही मुन्ना भीत असतो. बापू त्याला सत्य सांगण्यास प्रवृत्त करतात. जान्हवी त्याच्या खरे बोलण्यामुळे पुन्हा त्याच्या जवळ येते. प्रेक्षकांवर या चित्रपटाचा मोठा परिणाम झाला होता.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com