कोविड बरोबरच इतर पायाभूत सुविधांनाही प्राधान्य द्या, गणेश नाईक यांची मागणी

सुजित गायकवाड
Tuesday, 29 September 2020

कोरोनाविषयक वैद्यकीय उपचार आणि इतर गुणवत्तापूर्ण सेवा देताना त्यामध्ये सातत्य राहिले पाहिजे. या सेवेत जेव्हा त्रुटी निर्माण होतात तेव्हा आम्ही त्या दाखवून देण्याचा प्रयत्न करतो.

नवी मुंबई, ता. 29 : कोरोना नियंत्रणाची कामे करतानाच पाणी पुरवठा, शिक्षण, आरोग्य आदी मुलभूत सुविधांची कामे देखील प्राधान्याने हाती घ्यावीत, अशी मागणी आमदार गणेश नाईक यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना केली आहे. कोविड प्रतिबंधात्मक उपायांबददल नाईक यांनी सोमवारी बांगर यांच्यासोबत आढावा बैठक घेतली. या प्रसंगी माजी खासदार डाॅ संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, माजी महापौर जयवंत सुतार आदी मान्यवर या बैठकीस उपस्थित होते.

मागील आठवडयात झालेल्या मुसळधार पावसामुळे बेलापूर, नेरूळ येथील रहिवाशांच्या घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरून त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. पावसाळापूर्व कामांचे योग्य नियोजन या वर्षी झाली नाही त्यामुळे अशी बिकट स्थिती ओढल्याची बाब संदीप नाईक यांनी बांगर यांच्या लक्षात आणून दिली. शहराला पुरापासून वाचविणारे होल्डिंग पाॅंड स्वच्छ न केल्याने रहिवासी विभागात पाणी घुसल्याचे नाईक म्हणाले. एमआयडीसीच्या शटडाऊनमुळे दिघा भागात तीव्र पाणीटंचाई जाणवते. त्यावर तोडगा म्हणून या भागात पाण्याच्या टाक्या बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे काम सुरू करण्यासाठी तातडीने निविदा सुचना काढण्याची मागणी केली. खाजगी शाळांच्या तुलनेत पालिका शाळांमधील विद्यार्थी मागे पडू नये यासाठी या शाळांमधून देखील आॅनलाईन शिक्षण सुरू करावे, अशी मागणी संदीप नाईक यांनी आयुक्तांबरोबरच्या मागील बैठकीत केली होती. त्या विषयी त्यांनी आजच्या बैठकीत कार्यवाहीबददल विचारणा केली.

कोरोनाविषयक वैद्यकीय उपचार आणि इतर गुणवत्तापूर्ण सेवा देताना त्यामध्ये सातत्य राहिले पाहिजे. या सेवेत जेव्हा त्रुटी निर्माण होतात तेव्हा आम्ही त्या दाखवून देण्याचा प्रयत्न करतो. चांगल्या कामांचे कौतुकही करतो.

- आमदार गणेश नाईक

जर पालिका शिक्षणाधिकारी, शिक्षण आणि संबधीत शिक्षण विभागातील सर्व घटकांना वेतन देत आहोत तर पालिका शाळांमधील सुमारे 45 हजार विद्यार्थी आॅनलाईन शिक्षणापासून वंचित का? असा सवाल केला. तुर्भे येथे पालिकेच्या माता-बाल रूग्णालयाचे काम लवकरच सुरू होणार आहे. गर्भवती महिलांसाठी आयसीयू बेड आणि नवजात बालकांसाठी एनआयसीयूची संख्या वाढविण्याची सुचना नाईक यांनी केली. नवी मुंबईत कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्या पार्श्वभूमिवर कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्याचा सल्ला नाईक यांनी आयुक्तांना केला.

कोविड 19च्या रूग्णांसाठी जीवरक्षक असणारे रेमडेसेवीर इंजेक्शनच आवश्यक साठा करण्याची सुचनाही नाईक यांनी केली. महापालिकेच्या सेवेते गेली अनेक वर्षे 200 ते 250 सफाई पर्यवेक्षक किंवा मुकादम काम करीत आहेत. मात्र नव्याने होणाऱ्या कर्मचारी भरतीमध्ये पालिकेने हे पदच ठेवले नाही. पर्यवेक्षकांच्या प्रतिनिधींनी नाईक यांची भेट घेवून त्यांना न्याय देण्याची मागणी केली होती. नाईक यांनी ही बाब बैठकीत आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली. 

( संकलन - सुमित बागुल )

ganesh naik demands focus on basic facilities spoke to NMMC commissioner


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ganesh naik demands focus on basic facilities spoke to NMMC commissioner