नाईकसमर्थक नगरसेवकांची घरवापसी?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 डिसेंबर 2019

विधानसभा निवडणुकांआधी आमदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून भाजपमध्ये डेरेदाखल झालेले नगरसेवक आता पुन्हा एकदा स्वगृही परतण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

नवी मुंबई : विधानसभा निवडणुकांआधी आमदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून भाजपमध्ये डेरेदाखल झालेले नगरसेवक आता पुन्हा एकदा स्वगृही परतण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. राज्यात भाजप सत्तेवरून पायउतार झाल्यामुळे नाईकांच्या हाती मंत्रिपद लागलेले नाही. तसेच पक्षातूनही मोठी जबाबदारी अद्याप नाईकांवर देण्यात आली नाही. अशा परिस्थितीत आपले हात रिकामे राहू नयेत म्हणून काही नगरसेवक पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरू शकतात. महापालिका निवडणुकीचे पॅनल पद्धतीने प्रभाग जाहीर झाल्यावर पक्षांतराचे सत्र सुरू होण्याचा अंदाज राजकीय तज्ज्ञांकडून वर्तवला जात आहे. 

महापलिकेतील समर्थक नगरसेवकांच्या बळावर नाईकांनी भाजपसोबत सूत बांधले; परंतु एकाच घरात दोन तिकिटे देण्यास भाजप तयार नसल्यामुळे अखेर नगरसेवकांच्या आग्रहास्तव गणेश नाईकांना संदीप नाईकांसाठी दिलेल्या तिकिटावर निवडणूक लढवावी लागली. गेली पाच वर्षे मंत्रिपदापासून दूर राहिल्यानंतर भाजपत गेल्यावर मंत्रिपद मिळेल, अशी अपेक्षा बांधली जात होती. मात्र भाजपच सत्तेपासून दूर राहिल्यामुळे नाईकांपेक्षा नगरसेवकांमध्ये जोरदार अस्वस्थता निर्माण झाली आहे. राज्यात ज्या पक्षाची सत्ता असते, त्यांच्या विकासकामांना गती मिळते, हे सूत्र स्पष्ट असल्यामुळे महापालिका निवडणुकांआधी काही नगरसेवकांकडून महाविकास आघाडीला पसंती देण्याची शक्‍यता आहे. 

ऐरोली, कोपरखैणे, वाशी, नेरूळ आणि बेलापूर विभागातील काही नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याची शक्‍यता आहे. पावणे येथे नुकताच पार पडलेल्या बैठकीला यापैकी काही नगरसेवकांनी लावलेली गैरहजेरी त्याला अधोरेखीत करते. नाईकसमर्थक फुटण्याच्या तयारीत असल्यामुळे नवी मुंबईतील दुसरा मोठा पक्ष असलेल्या शिवसेना नेत्यांकडून फुटीर नगरसेवकांना आपल्या पक्षात घेण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी 
केली जात असल्याचे समजते. या मोर्चेबांधणीत काँग्रेसही मागे नसून, जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक आणि प्रदेश सचिव संतोष शेट्टी दिल्लीश्‍वरांच्या मर्जीने सक्रिय झाल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फेही पश्‍चिम महाराष्ट्रातील माथाडी कामगारांचा पाठिंबा असलेल्या जुन्या नगरसेवकांना पुन्हा एकदा गळ घातली जाण्याची शक्‍यता आहे.

योग्य वेळेची प्रतीक्षा 
विधानसभा निवडणुकांमध्ये नाईकांना बळ देऊन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे नगरसेवक सध्या पक्षांतरासाठी चांगल्या वेळेच्या शोधात आहे. महापालिका निवडणुकांचे कार्यक्रम जाहीर होण्याआधी पॅनल पद्धतीने होणाऱ्या निवडणुकांची प्रभागरचना जाहीर झाल्यावर ही वेळ साधण्याची शक्‍यता आहे. प्रभागातील पक्षाचे प्राबल्य, जास्त मताधिक्‍य व नागरिकांची पसंती या बाबी पाहून पक्षांतर होण्याचा अंदाज आहे.

नाईकांसोबत आलेले सर्व नगरसेवक अखेरपर्यंत भाजपमध्येच राहणार आहेत. कोणीही पक्षांतर करणार नाहीत. पालिका निवडणुका जवळ आल्यावर भाजपमध्ये पुन्हा पक्षप्रवेश सुरू होईल.
- रामचंद्र घरत, भाजप, जिल्हाध्यक्ष.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ganesh naik supporters backs return