भाजपचे बॅनर फाडणाऱ्या युवसैनिकांवर गुन्हा दाखल.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bjp and Shiv Sena

भाजपचे बॅनर फाडणाऱ्या युवसैनिकांवर गुन्हा दाखल

मुंबई : मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सव साजरा होत आहे. शिवसेना आणि भाजपकडूनही गणेशोत्सवाचे कार्यक्रम मोठ्या थाटात आयोजित केले जात आहेत. त्याचवेळी किरकोळ मुद्द्यांवरून भाजप आणि शिवसेना यांच्यात हाणामारी झाल्याचीही बातमी आहे. ताजे प्रकरण मुंबईतील लोअर परळ भागातील आहे. शनिवारी 3 सप्टेंबरला बॅनरच्या मुद्द्यावरून गणेशोत्सवादरम्यान भाजप आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार वादावादी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गणपती बॅनरवरून वाद झाल्यानंतर भाजप आणि शिवसेनेचे पदाधिकारी एकमेकांमध्ये वाद झाले.

या प्रकरणात एन एम जोशी पोलीस ठाण्यात सोमवारी 5 सप्टेंबरला गुन्हा नोंवण्यात आला. युवासेना पदाधिकारी संकेत सावंत आणि त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्याला गणपतीचे बॅनर फाडल्याचा आरोप आहे. याप्रकरणी आरोपीविरुद्ध भादंवि कलम १४३ आणि ४२७ अन्वये एनएम जोशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेशोत्सवासाठी भारतीय जनता पक्षाने लोअर परळ परिसरात गणपतीचे अनेक बॅनर लावले होते. हे बॅनर युवासेना पदाधिकारी संकेत सावंत आणि इतर कार्यकर्त्यांनी फाडल्याचा आरोप आहे. यानंतर भाजप आणि युवासेना पदाधिकाऱ्यामध्ये बाचाबाची झाली आणि वाद वाढला.त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला.