ठाण्यात गॅरेजचालकांचे पुन्हा रस्त्यावर बस्तान

राजेश मोरे
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

वाहतूक कोंडीमुक्त प्रवास करता यावा यासाठी शहरातील रस्त्यांचे वारंवार रुंदीकरण करण्यात आले आहे. यासाठी शेकडो नागरिकांना विस्थापित करण्यात आले आहे. फेरीवाल्यांचा त्रास तर नवीन नाही पण आता पुन्हा गॅरेजधारक आणि कार डेकोर दुकानदारांनी पुन्हा एकदा रस्त्याचा ताबा घेण्यास सुरुवात केल्याने वाहनचालकांना या कृत्रिम वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते आहे.

ठाणे : वाहतूक कोंडीमुक्त प्रवास करता यावा यासाठी शहरातील रस्त्यांचे वारंवार रुंदीकरण करण्यात आले आहे. यासाठी शेकडो नागरिकांना विस्थापित करण्यात आले आहे. फेरीवाल्यांचा त्रास तर नवीन नाही पण आता पुन्हा गॅरेजधारक आणि कार डेकोर दुकानदारांनी पुन्हा एकदा रस्त्याचा ताबा घेण्यास सुरुवात केल्याने वाहनचालकांना या कृत्रिम वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते आहे.

ठाण्यातील वंदना सिनेमा गृहासमोरील रस्ता हा तर गॅरेजचालक आणि कार डेकोरच्या दुकानांसाठी वर्षानुवर्षे आंदण दिला आहे. या रस्त्यावर कार डेकोरेशन करण्यासाठी शहरासह शहराबाहेरून मोठ्या प्रमाणात चार चाकी वाहने आणली जातात. या वाहनांनापैकी एखाद दुसऱ्या वाहनाला दुकानात जागा करून दिल्यानंतर येथील पदपथ आणि रस्ता सर्रास या दुकानदारांकडून अडवला जाण्याची परंपरा कायम राखण्यात आली आहे.

वाहतूक कोंडी होत असल्याने एखाद्या पादचाऱ्याने या कार डोकोरच्या कर्मचाऱ्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केल्यास त्यालाच धमकाविले जाते. या कार डेकोरबरोबरच याच परिसरात दुचाकी वाहनांना स्पेअर पार्ट पुरविणारी दुकाने आहेत. या दुकानांसमोरही दुचाकींची रांगच रांग लागलेली असते. महापालिका प्रशासनाला याकडे पाहण्यास वेळ नसल्याने आपला मार्ग शोधत वाहनचालकांना येथून बाहेर पडावे लागते आहे. 

पोलिसांना कोंडी दिसत नाही का?
एलबीएस रस्ता अरूंद असून, गॅरेजचालकांनी येथील रस्ते अडविले आहेत. याच रस्त्यावर आता उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असतानाही त्याचे सोयरसुतकही या गॅरेज चालकांना नसते. शनिवार आणि रविवारी तर रस्ते मोकळे असताना नाहक वंदना सिनेमागृहासमोरच्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. येथूनच जवळच्या सिग्नलवर हेल्मेटधारकाच्या विरोधात कारवाई करीत असलेल्या पोलिसांना होणारी वाहतूक कोंडी दिसत नाही का? असा प्रश्‍न सर्वसामान्य ठाणेकर करीत आहेत.

पदपथ कोणी अडवित असल्यास त्यावर कारवाई केली जाते. यापूर्वीही कारवाई करण्यात आलेली आहे. पुन्हा कोणी रस्ता अडवत असल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल. तसेच वाहतूक पोलिसांबरोबर संपर्क साधून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई अधिक मोठ्या प्रमाणात करण्याची शिफारस करू.
-अशोक बुरपुल्ले, उपायुक्त 
अतिक्रमण विरोधी विभाग


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The garage operator's road again in Thane