esakal | एसटी महामंडळाचे वाहतूक महाव्यवस्थापक नॉटरिचेबल!

बोलून बातमी शोधा

एसटी महामंडळाचे वाहतूक महाव्यवस्थापक नॉटरिचेबल!
एसटी महामंडळाचे वाहतूक महाव्यवस्थापक नॉटरिचेबल!
sakal_logo
By
प्रशांत कांबळे :सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोना माहामारीच्या काळात राज्यभरातील सुमारे 1 लाख कर्मचारी अहोरात्र आपले कर्तव्य बजावत आहे. राज्यभरातील सार्वजनिक प्रवासी सेवा आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना सेवा देण्याचे काम केले जात आहे. मात्र, वाहतूक शाखेचे महाव्यवस्थापक संजय सुपेकर गेल्या अनेक दिवसांपासून नॉटरिचेबल असल्याची ओरड एसटी कर्मचारी करत आहेत.

राज्यासह मुंबईतील बेस्ट उपक्रमात एसटी महामंडळ महत्वाची भूमिका बजावत आहे. सुरूवातील एक हजार बसेस बेस्ट उपक्रमात सेवेत दिल्यानंतर आता सुमारे 500 बसेस सेवा देत आहे. मात्र, राज्यभरातील सुमारे 8 हजार कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. तर, २०० पेक्षा अधिक जणांना प्राण गमवावे लागले आहेत. अशा परिस्थितीत एसटीच्या अधिकाऱ्यांनी अधिक दक्ष राहून काम करण्याची गरज आहे. मात्र, एक लाख वाहतूक कर्मचाऱ्यांचे भवितव्य अवलंबून असलेल्या वाहतूक विभागाचे महाव्यवस्थापक संजय सुपेकर हे नॉटरिचेबल आहेत.

बेस्ट उपक्रमात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रोज संकटांचा सामना करावा लागतो आहे. मात्र, यासंदर्भात वाहतूक महाव्यवस्थापकांना कोणतेही देणेघेणे नसल्याचे दिसून येत आहे. शिवाय माध्यमांच्या प्रतिनिधींना सुद्धा सहकार्य केल्या जात नाही. एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने सध्या आसाम येथील निवडणूक ड्युटीवर असल्याने, सध्या एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांना माहिती विचारल्यास टोलवाटोलवी केली जात असल्याचे दिसून येत आहे.

माधव काळेंचे वाहतूक शाखेकडे बोट

राज्यातील ऑक्सिजन टँकरच्या वाहतुकीसाठी परिवहन विभागाकडून एसटी महामंडळाच्या 50 चालकांना आरक्षित ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या, मात्र, अद्याप त्याची मागणी झाली नाही. परंतु, काही जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी स्तरावर काही निर्णय होऊन एसटी कर्मचाऱ्यांना ऑक्सिजन टँकर वाहतुकीसाठी ड्युटी लावण्यात आली आहे. त्यामूळे राज्यभरात किती कर्मचाऱ्यांना ऑक्सिजन टँकरवर ड्युटी लावण्यात आल्याची माहिती कर्मचारी वर्ग व औद्योगीक संबंध विभागाचे महाव्यवस्थापक माधव काळे यांना विचारणा केली असता, यासंबंधीत माहिती वाहतूक शाखेकडे मिळेल, असे सांगून माहिती देण्यास टाळले.

"वाहतूक महाव्यवस्थापकांचा नंबर सध्या लागत नाही. त्यामुळे याबद्दल सध्या, बोलता येणार नाही", असं एसटी महामंडळाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी राजन शेलार यांनी सांगितले. तर," महामंडळाचा खातेप्रमुख म्हणून सदैव कार्यतत्पर राहणे गरजेचे आहे. बेजबाबदारपणे नॉटरिचेबल राहणे अत्यंच चुकीचे असून, महामंडळाचे वाहतूक व प्रशासनाची शिस्त न पाळणारी आहे. तसेच कंत्राटी अधिकारी खातेप्रमुख दिल्याने असा कंत्राटी अधिकाऱ्यांचा उन्माद सुरू आहे", असं एसटी वर्कर्स काँग्रेसचे (इंटक) सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी सांगितलं

संपादन : शर्वरी जोशी