भाजपच्यामते 'मदिरालय चालू, मंदिरं बंद' या निर्णयाविरोधात मुंबईत घुमला घंटानाद आंदोलनाचा आवाज

भाजपच्यामते 'मदिरालय चालू, मंदिरं बंद' या निर्णयाविरोधात मुंबईत घुमला घंटानाद आंदोलनाचा आवाज

मुंबई : गेले पाच महिने राज्यातील मंदिरं भाविकांसाठी बंद ठेवण्यात आलेली आहेत. राज्यातील मंदिरं खुली करण्याच्या मागणीसाठी आज संपूर्ण राज्यात भाजपतर्फे घंटानाद आंदोलन करण्यात येतंय. मुंबईतही ठिकठिकाणी आज घंटानाद आंदोलन करण्यात आलं. मुंबईतील प्रभादेवीइथल्या सिद्धिविनायक मंदिरासमोर हे आंदोलन करण्यात आलं. मुंबईतील वडाळा इथल्या विठ्ठल मंदिरासमोर भाजपचे प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आलं. यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. घोषणाबाजीतून उद्धव ठाकरे यांनी राज्यातील मंदिरं खुली करावीत असं आवाहन करण्यात आलंय. यासोबतच मुंबईतील घाटकोपर, मानखुर्द, सायन या भागातही घंटानाद आंदोलन करण्यात  आलं.   

सायन कोळीवाड्यात घंटानाद : 

"आध्यात्मिक समन्वय आघाडी सरकारच्या 'मदिरालय चालू, मंदिर बंद' या निर्णयाच्या विरोधात आणि कुंभकर्णापेक्षाही गाढ झोपलेल्या या सरकारला इशारा देण्याकरिता 'दार उघड उद्धवा, दार उघड' " म्हणत आमदार कॅप्टन आर. तामिल सेल्वन यांच्या नेतृत्वाखाली आज सायन कोळीवाडा विभागातील तमिल संगम रोड, नामदेव कोळी मार्गावरील हनुमान मंदिरासमोर समोर हातात फलक घेऊन 'घंटानाद आंदोलन' करण्यात आले. यात मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

कोरोना प्रादुर्भावाच्या काळात जनजीवन पूर्ववत करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने राज्यातील मास-मदिरा ‘पुनःश्च हरी ओम' च्या नावाखाली सर्व काही चालू केले. मात्र संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात 'हरी' ला मात्र बंदिस्त ठेवले आहे. केंद्र सरकारने मंदिरे उघडण्याचे निर्देश दिल्यानंतर, राज्यातील भाविक व सर्वसामान्य नागरिकांकडून मंदिरे उघडण्याची मागणी करण्यात आली. मात्र, राज्य सरकारने त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले. त्यामुळे झोपी गेलेल्या 'ठाकरे सरकार'ला जागे करण्यासाठी हे घंटानाद आंदोलन छेडण्यात आले आहे. 

घाटकोपरमध्येही घंटानाद : 

घाटकोपरमध्ये अमृतनगर सर्कल येथील श्री साईबाबा मंदिराबाहेर कार्यकर्त्यानी ओम साईराम, जय श्रीराम च्या घोषणा देत घंटानाद केला. सरकारला दारुचे दुकाने चालतात मग मंदिरे सुरू करायला सरकार उशीर का करत आहे? सरकारने सामान्य जनतेला नियम आणि अटी घालून द्यावे. त्याचे सामान्य भक्त पालन करतील. पण आता आमच्या श्रद्धा असणाऱ्या मंदिरांना बंद ठेवू नका  असं आवाहन भारतीय जनता युवा मोर्चाचे मंडळ अध्यक्ष चेतन भाटकर यांनी केलं. महिलांना ज्या गोष्टी आवडत नाहीत, ती दारूची दुकाने सुरू करायला सरकार थेट परवानगी का देते. दारुच्या दुकानावर दारू खरेदीसाठी तसेच मार्केटमध्ये ग्राहकांची गर्दी वाढते आहे. तिथे सरकारचे लक्ष नाही असंही भाजपा युवा मोर्चाच्या अध्यक्षा पूनम नायर म्हणाल्या. 

मानखुर्दच्या पीएमजीपी वसाहतीमध्ये घंटानाद

भाजपच्या कार्यकर्त्यांनी मानखुर्दच्या पीएमजीपी वसाहतीमध्येही आज घंटानाद आंदोलनकेलं. हे आंदोलन ऍडव्होकेट विजय रावराणे, हेमंत भास्कर आणि  बीरजू अलदर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. लॉकडाऊन काळामध्ये कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी गर्दी टाळण्याच्या उपाययोजना शासनाने केल्या होत्या. त्या उपाययोजनांची अंमलबजावणी करताना मंदीरे व धार्मिक स्थळे देखील बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार बंद असलेली मंदीर भाविकांसाठी उघडण्यात यावीत या मागणीसाठी भाजपने शनिवारी आंदोलन केले. त्याच आंदोलनाचा भाग म्हणून मानखुर्दच्या पीएमजीपी वसाहतीतील विठ्ठल-रखुमाई मंदीरात घंटानाद आंदोलन केले. 

( संकलन - सुमित बागुल ) 

ghantanad andolan by bjp in all over maharashtra read full details about mumbais agitation

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com