घाटकोपर ग्राउंड रिपोर्ट: गजबज सरली; दहशत उरली...

घाटकोपर ग्राउंड रिपोर्ट: गजबज सरली; दहशत उरली...

पूर्व आणि पश्चिम उपननगरांना जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणजे घाटकोपर. मेट्रो रेल्वेने ही दोन्ही उपनगरे जोडली. त्यामुळे हा परिसर रात्री उशिरापर्यंत गजबजलेला असतो. लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे या भागात आता शुकशुकाट आहे. घाटकोपर रेल्वेस्थानक आणि मेट्रो स्थानकाच्या परिसरात चिटपाखरूही दिसत नाही. सर्वत्र आढळते, ती फक्त कोरोनाची दहशत... 

आरोग्य यंत्रणेचे दुर्लक्ष?
गेल्या महिनाभरापासून घाटकोपरमध्ये कोरोना पसरू लागला आहे. आरोग्य यंत्रणेचे लक्ष वरळी-धारावीवर केंद्रित झाल्यामुळे मुंबईतील उपनगरांकडे दुर्लक्ष झाल्याचे बोलले जाते. या पार्श्वभूमीवर घाटकोपरमधील कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता 55 वर गेली आहे. कोरोनाचे रुग्ण शोधणे, त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेणे, उपचार करणे, बाधितांना क्वारंटाईन करणे आदी उपाययोजना अडचणीच्या झाल्या आहेत. वाढती रुग्णसंख्या आणि दाट लोकवस्तीमुळे घाटकोपरमधील आरोग्य यंत्रणा ढेपाळल्याचे दिसत आहे. 

झोपडपट्ट्यांमध्ये प्रादुर्भाव
परदेशातून आलेल्या एका गुजराती व्यक्तीला कोरोनाची बाधा झाल्याचे घाटकोपरमध्ये आढळून आले. कोरोनाचा हा घाटकोपरमधील पहिला रुग्ण. त्यानंतर आढळलेले रुग्ण कोणत्या तरी बाधिताच्या संपर्कात आलेले आहेत. त्या व्यक्तींचा शोध घेणे कठीण होत आहे. घाटकोपर पूर्वेकडील गारोडिया नगर  पंतनगर, एम. जी. रोड सोडल्यास निम्म्यापेक्षा जास्त भाग झोपडपट्ट्यांनी व्यापलेला आहे. पूर्व द्रुतगती मार्गालगतचा कामराज नगर, रमाबाई आंबेडकर नगर परिसर, श्रेयस सिनेमा, रामनगर, भीमनगर, भटवाडी, चिरागनगर हा डोंगराळ भाग झोपड्यांनी व्यापला आहे. या दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये कोरोना पसरू लागला आहे.

सोशल डिस्टन्सिंग अशक्य
डोंगराळ भागात दाटीवाटीने उभ्या राहिलेल्या झोपडपट्ट्यांत सोशल डिस्टन्सिंग पाळणे अशक्यप्राय आहे. एका घरात सात ते 10 जण राहतात. अत्यंत चिंचोळ्या गल्ल्या आणि मोकळ्या जागेचा अभाव यामुळे लॉकडाऊनच्या काळातही नाइलाजाने रहिवासी घराबाहेर पडत आहेत. 

डोंगराळ भागात डोकेदुखी 
डोंगराळ भागात रुग्णांचा शोध घेणे आणि संपर्क शोधणे अडचणीचे झाले आहे. डोंगराळ भागातील वस्त्या अत्यंत दाटीवाटीच्या आहेत. या झोपडपट्ट्यांत कोरोनाने पाय पसरल्यामुळे आरोग्य खात्याची डोकेदुखी वाढली आहे. 

आरोग्य सेविका भयभीत
आरोग्य सेविका या वस्त्यांमध्ये जीव मुठीत घेऊन काम करत आहेत. त्यांना सुरक्षेच्या कोणत्याही सुविधा नाहीत. आम्हाला काम करताना अडचणी येत आहेत. कधी कोरोनाचा रुग्ण भेटेल, ते सांगता येत नाही. त्यामुळे भीती वाटते, असे त्या म्हणतात. 

भटकणाऱ्यांना चाप
कामराज नगर आणि रमाबाई कॉलनी भागात संचारबंदीचे उल्लंघन करून नागरिक बिनधास्त रस्त्यावर फिरताना दिसतात. अशा नागरिकांना पोलिस शिक्षा करत आहेत. कोरोनाचा प्रसार वाढू नये, यासाठी स्थानिक नगरसेवक परमेश्वर कदम पोलिसांना मदत करीत आहेत. 

राजावाडी रुग्णालयात गर्दी
घाटकोपरमधील नागरिकांना महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयाचा मोठा आधार आहे. या रुग्णालयातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दररोज भर पडत असल्याचे दिसते. त्यामुळे रुग्णांच्या विलगीकरणासाठी जागा अपुरी पडत आहे.

डॉक्टरांची कमतरता
डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने रुग्णसेवेवर परिणाम होत आहे. रुग्ण अधिक आणि डॉक्टर कमी, अशी स्थिती येथे पाहायला मिळत आहे. 

क्वारंटाईनसाठी जिमखाना 
राजावाडी रुग्णालय अपुरे पडू लागले आहे. त्यामुळे विलगीकरण कक्षासाठी जॉली जिमखाना ताब्यात घेणार असल्याचे आरोग्य खात्याने सांगितले. 

दृष्टिक्षेपात
रुग्णसंख्या : 55
इमारतींचा भाग : 30 टक्के
झोपडपट्टी भाग : 70 टक्के
लोकसंख्या : 6 लाख 20 हजार

कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना आरोग्य खात्याकडून कोणतीही काळजी घेतली जात नाही. पुरेसे सुरक्षा किट्सही नाहीत. आरोग्यसेवा देण्यात अडचणीची ठरणारी मार्गदर्शक तत्त्वे बदलण्याची गरज आहे.
- भालचंद्र शिरसाट, नगरसेवक

कोरोनाचे रुग्ण वाढत असून, रुग्णालयातील कर्मचारी अपुरे पडत आहेत. महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयाला अधिक सुविधा पुरवल्या पाहिजेत. 
- प्रकाश कांबळे, रहिवासी

Ghatkopar Ground Report: fear raise in city due to corona

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com