Mumbai News : घाटकोपर स्थानकांचा पादचारी पूलावर तूफान गर्दी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ghatkopar metro station pedestrian bridge storm crowd mumbai

Mumbai News : घाटकोपर स्थानकांचा पादचारी पूलावर तूफान गर्दी!

मुंबई : घाटकोपर-वर्सोवा मेट्रो १ मार्गामुळे घाटकोपर स्थानकातील गर्दी प्रचंड वाढली आहे. दिवसेंदिवस प्रवासी संख्या वाढत असल्याने घाटकोपर स्थानक- मेट्रोला जोडणाऱ्या पादचारी पूलावर तूफान गर्दी होत आहे. त्यामुळे घाटकोपर स्थानकांवर चेंगराचेंगरी होण्याची भिती प्रवाशांकडून करण्यात आली आहे.

उपनगरीय लोकलवर आणि रेल्वे स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी मेट्रो सुरू करण्यात आली. मात्र आता मेट्रोतून घाटकोपर स्थानकात उतरणारी गर्दी ही डोकेदुखी होऊन बसली आहे. घाटकोपर-वर्सोवा मेट्रो १ मार्गामुळे घाटकोपर स्थानकातील गर्दी प्रचंड वाढली आहे.

सोमवारी सकाळी देखील स्थानकातील मधल्या पुलावर अशीच गर्दी झाल्याने चेंगराचेंगरीची होण्याची शक्यता निर्माण झाली होती. दररोज सकाळी व सायंकाळी या स्थानकातून प्रवाशांचे लोंढेच्या लोंढे बाहेर पडतात.

प्रवाशांची संख्या कमालीची वाढल्याने तिकीट खिडकीवरील प्रवाशांच्या रांगा मध्य रेल्वेच्या घाटकोपर स्थानकावरील पादचारी पुलावर येऊ लागल्या आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेचे प्रवासी व मेट्रोचे प्रवासी एकत्र येत असल्याने पादचारी पुलावर दुहेरी गर्दी होऊ लागल्याने अक्षरश: चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण होते.त्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना चांगलीच कसरत करावी लागत आहे.

घाटकोपर स्थानकातील गर्दीवर नियंत्रणासाठी आणि पर्यायी सुविधेसाठी खासदार मनोज कोटक यांनी तत्कालीन रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे या प्रश्नाचा पाठपुरावा केला होता. 13 सप्टेंबर 2019 गोयल यांनी रेल्वे अधिकार्‍यांना एक विस्तृत योजना तयार करून स्थानकाचे अपग्रेडेशन करण्याचे निर्देश दिले होते.

हे काम मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन (एमआरव्हीसी ) करत आहे. त्यामुळे गर्दीचे विभाजन होणार आहे. घाटकोपर स्थानकात एलिव्हेटेड डेक,नविन पादचारी पुल उभारण्यात येणार आहेत.

एमआरव्हीसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, घाटकोपर स्थानकावर प्रचंड गर्दी आणि प्रवासी आणि गाड्यांची सतत ये-जा यामुळे काम करणे आव्हानात्मक होते. स्थानकाच्या बाहेरही तात्काळ जागा नसल्यामुळे, अवजड उपकरणे ठेवणे आणि काम करणे हे एक समस्या होती.

विकास काम प्रगतीपथावर

- घाटकोपर रेल्वे स्थानकाचे अपग्रेडेशनचे काम कोरोनामुळे रखडलेले होते. मात्र, आता हे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

- घाटकोपर स्थानकात ७५ मीटर लांब आणि १२ मीटर रुंद नविन पादचारी पूल उभारण्यात येणार आहे.

- पूर्वेला ४५ मीटर लांब आणि पंधरा मीटर रुंद स्थानकाला जोडणारा एलिव्हेटेड डेकही उभारण्यात येणार आहे.

- स्थानकात एकूण तीन पादचारी पूल आणि एक स्कायवॉकही उभारण्यात येणार आहे. यासाठी ५० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

- सध्या पायाभरणीच्या कामासाठी स्टेशनमधील एका प्लटफार्मवर काम सुरू आहे.

- या एलिव्हेटड डेक, पादचारी पूल यासह अन्य कामे नोव्हेंबर २०२३पर्यत पुर्ण करण्यात येणार आहे.

घाटकोपर रेल्वे स्थानकांत प्रवाशांच्या सुविधेसाठी आणि वाढत्या गर्दीचे विभाजन करण्यासाठी काम प्रगतीपथावर सुरू आहेत. एलिव्हेटड डेक, पादचारी पूल चे कामे नोव्हेंबर २०२३ पर्यत पुर्ण करण्यात येणार आहे.

- सुनील उदासी, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मुंबई रेल्वे विकास महामंडळ

घाटकोपर रेल्वे स्थानकांचा पादचारी पुलावरील गर्दीमुळे रेल्वे प्रवाशांचे प्रचंड हाल होता आहे. त्यात वृद्ध नागरिक, अपंग, रुग्ण हे ह्या पादचारी पुलावरुन जाऊच शकत नाही. रेल्वे प्रशासनाने व मेट्रोने याची दखल घ्यावी. मेट्रो आपला महसूल रेल्वेला तर देत नाही. मग गर्दी का या ठिकाणी ? त्यांनी त्यांच्या प्रवाशांसाठी वेगळी व्यवस्था करावी.

- नितीन गायकवाड, अध्यक्ष-निर्धार विकलांग विकास सामाजिक संघ