वाढदिवशीच मुलीचा गुदमरून मृत्यू!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

गॅस गीझरमध्ये गळती झाल्याने दुर्घटना

मुंबई : गरम पाण्यासाठी सुरू केलेल्या गॅस गीझरमधून निघालेला कार्बन डायऑक्‍साईड स्नानगृहातच साठल्यामुळे मुलीचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना बोरिवली येथे घडली. मुलीच्या वाढदिनीच ही दुर्घटना घडली. 

मागील आठवड्यात गोराई येथे घडलेल्या या दुर्घटनेत ध्रुवी गोहिल या मुलीचा मृत्यू झाला. वाढदिवसाच्या दिवशी आंघोळीसाठी स्नानगृहात गेलेल्या ध्रुवीने गरम पाण्यासाठी गॅस गिझर सुरू केला. थंडीचे दिवस असल्याने तिने बराच वेळ गरम पाण्याने स्नान केले. त्यामुळे स्नानगृहात वाफ आणि गॅसच्या ज्वलनामुळे तयार झालेला कार्बन डायऑक्‍साईड साठून राहिला. स्नानगृहात एक्‍झॉस्ट फॅन नसल्याने ध्रुवी गुदमरून बेशुद्ध पडली. मदतीसाठी तिला कुटुंबीयांना हाकही देता आली नाही.

दारूसाठी वाट्टेल ते... वाचा :  दारूसाठी तरुण चढला थेट विजेच्या खांबाबर...​

एक तास होऊनही ध्रुवी स्नानगृहाबाहेर न आल्यामुळे कुटुंबीयांनी दार ठोठावले. प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांनी दार तोडून बेशुद्धावस्थेतील ध्रुवीला बाहेर काढले. गिझरमधील गॅस व वाफ स्नानगृहातच कोंडून राहिल्याचे त्यांना आढळले. ध्रुवीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र दुसऱ्या दिवशी तिचा मृत्यू झाला. 
घरगुती स्वयंपाकाच्या सिलिंडरमधील गॅस किंवा महानगर गॅसच्या ज्वलनातून निर्माण होणारा कार्बन डायऑक्‍साईड दिसत नाही व त्याला वासही नसतो. सिलिंडरमधील ज्वलनशील गॅसमध्ये हलका दुर्गंध मिसळलेला असतो. महानगर गॅसद्वारे पुरवल्या जाणाऱ्या वायूला असा दुर्गंध नसतो. त्यामुळे गॅस गिझरच्या वापराबाबत अत्यंत सावधगिरी बाळगावी, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे. 

हेही वाचा करणार होता प्लास्टिक सर्जरी; आता तुरुंगात होतेय चौकशी! 

महानगर गॅसचे आवाहन 
- स्वयंपाकाच्या गॅसची शेगडी, गॅस गिझर यांची जोडणी महानगर गॅसच्या तंत्रज्ञांकडूनच करून घ्यावी. 
या जोडणीत घरातील सदस्यांनी किंवा अनधिकृत तंत्रज्ञामार्फत बदल करू नयेत. 
- गॅस गिझर शक्‍यतो स्नानगृहात न बसवता बाहेर बसवावा. 
- गॅसगळतीचा संशय आल्यास विजेच्या बटणांना हात लावू नये, दारे-खिडक्‍या उघडाव्यात. 

तज्ज्ञांचा सल्ला... 
- गॅस गिझरऐवजी इलेक्‍ट्रिक गिझर वापरा. 
- स्नानगृहात एक्‍झॉस्ट फॅन लावून घ्या. 
- गिझरची नियमित दुरुस्ती-देखभाल करा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Girl death in bathroom due to gas geyser leak