मराठा समाजाला शिक्षण, रोजगारासाठी सवलती द्या! भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मागणी

सकाळ न्यूज नेटवर्क 
Thursday, 10 September 2020

मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत महाविकास आघाडी सरकारने भाजप सरकारप्रमाणेच या समाजाला शिक्षण व रोजगारासाठी आरक्षित घटकांप्रमाणे सवलती द्याव्यात

मुंबई : मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत महाविकास आघाडी सरकारने भाजप सरकारप्रमाणेच या समाजाला शिक्षण व रोजगारासाठी आरक्षित घटकांप्रमाणे सवलती द्याव्यात, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी केली.

BMC च्या सुट्टी धोरणाविरोधोत सायनच्या डाॅक्टरांचा निषेध; सात दिवस निषेध नोंदवणार

चंद्रकांत पाटील म्हणाले, संवैधानिक प्रक्रिया पूर्ण करून मराठा आरक्षण लागू करण्यास कालावधी लागत असताना भाजप सरकारने मराठा समाजासाठी शिक्षण व रोजगारासाठी विविध सवलती दिल्या. पण, भाजपा सरकारच्या सारथीसारख्या अनेक उपक्रमांमध्ये महाविकास आघाडी सरकारने अडथळे निर्माण केले व आणि आर्थिक तरतूद रोखून ठेवल्या. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने ताबडतोब आपली भूमिका बदलून समाजाला दिलासा देण्यासाठी पावले टाकावीत, अशी मागणी त्यांनी केली.
सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाचा विषय गेल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने ढिलाई केली आणि आरक्षणाला स्थगिती आली, असा आरोपही पाटील यांनी केला. तसेच, आता आता सर्वोच्च न्यायालयात कधी निकाल लागेल व पुन्हा आरक्षण लागू होईल या बद्दल अनिश्चितता असल्याचे ते म्हणाले.  

मराठा विद्यार्थ्यांसाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकाससंस्था (सारथी) ही संस्था भाजपा सरकारने सुरू केली. मराठा समूहाच्या प्रशिक्षण, संशोधन, कौशल्य विकास, नोकरी व्यवसाय मार्गदर्शन, भरतीपूर्व मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन यासाठी ही संस्था सुरू करण्यात आली. महाविकास आघाडी सरकारने या संस्थेचे संपूर्ण कामकाज ठप्प केले आहे. आमच्या सरकारने 13 उपक्रम सुरु केले होते.  ते सर्व बंद केले आहेत. तसेच सारथीची स्वायत्तता काढण्यात आली. महाविकास आघाडी सरकारने आपली भूमिका बदलून सारथी संस्थेला पाठबळ द्यावे, अशीही मागणी पाटील यांनी केली. 

राज्यातील बड्या अधिकाऱ्यांचे बदल्यांचे सत्र सुरूच; तुकाराम मुंढे यांची बदली रद्द

भाजपप्रमाणे निर्णय घ्यावेत!
भाजप सरकारने मराठा विद्यार्थ्यांना राजर्षि शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून सवलती दिल्या. त्यामध्ये वैद्यकीय, अभियांत्रिकी व कृषीसह 605  कोर्सेसचा समावेश केला. त्यासाठी साठ टक्के गुणांची अट काढली आणि उत्पन्नाची मर्यादाही क्रिमी लेयरप्रमाणे 8 लाख रुपये केली. महाविकास आघाडी सरकारनेही मराठा विद्यार्थ्यांच्या विकासासाठी शिक्षण व रोजगारामध्ये अशा सवलती द्याव्यात, अशी मागणी पाटील यांनी केली.

-----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Give concessions to the Maratha community for education and employment Chandrakant Patil