esakal | मुंबईकरांनो, कोकणतील हापूस आंब्याबद्दलची ही बातमी वाचाच

बोलून बातमी शोधा

मुंबईकरांनो, कोकणतील हापूस आंब्याबद्दलची ही बातमी वाचाच
मुंबईकरांनो, कोकणतील हापूस आंब्याबद्दलची ही बातमी वाचाच
sakal_logo
By
प्रशांत कांबळे

मुंबई: कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षी कोकणातील हापूस आंबा उत्पादकांचे प्रचंड नुकसान झाले. राज्यात आणि देशात तर सोडाच पण परदेशात जाणारा हापूस आंबासुद्धा पाठवता आला नाही. मुंबईसारख्या खवय्यांच्या शहरातही आंबा पाठवणे कठीण झाले. आता या वर्षीही कोरोना महामारी कायम असल्याने हापूस उत्पादकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. ही अडचण लक्षात घेता या उत्पादकांच्या मदतीला आता एसटी सज्ज झाली आहे. कोकणातील विविध जिल्ह्यातील आंबा मुंबईत पोहचविण्यासाठी राज्य परिवहन मंडळाच्या एसटी बसेसचा वापर केला जाणार आहे.

हेही वाचा: बोरीवलीला मिळाला भारतातील पहिला 'इको-फ्रेंडली' ट्रान्सफॉर्मर

गेल्या वर्षीच्या कोरोना महामारीच्या लॉकडाऊन परिस्थितीमुळे बाजारपेठा बंद होत्या. वाहतुकीसाठीसुद्धा अडचणी आल्या होत्या, मुंबई, पुण्यात हापूस मिळाला नव्हता, त्यामुळे आता शेतकरी ते ग्राहक या संकल्पनेतून मुंबई, पुण्यातील नागरिकांपर्यंत हापूस पोहचविण्यासाठी एसटी महामंडळ मदत करणार आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी एसटी डेपो येथून दररोज 'किसान रथ वाहतूक सेवा' सुरू केली जाणार असून वेंगुर्ला, मालवण, देवगड, विजयदुर्ग, कुडाळ या डेपोतून आंब्याच्या पेट्या जमा करून पनवेल, वाशी, ठाणे, कुर्ला, परेल, मुंबई सेंट्रल, बोरीवली या डेपोत पोहचविण्यात येणार आहेत.

हेही वाचा: Breaking News! सर्वांना मोफत लस मिळणार, ठाकरे सरकारचा निर्णय

कोकणापासून मुंबई पुण्यापर्यंत हापूस आंब्याची सुरक्षित वाहतूक एसटीतून करण्यात येणार आहे. रात्रीच्या वेळी हापूस मुंबईला रवाना होत असल्याने आंबा खराब होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. वाहतुकीमध्ये काही नैसर्गिक आपत्ती किंवा अपघातामुळे आंबा खराब झाल्यास त्याचे विमा संरक्षण कवच मिळणार आहे. त्यासाठी कोकणातील उत्पादकांनी मालवण, वेंगुर्ला, देवगड/विजयदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, कणकवली येथील डेपो मॅनेजर सोबत संपर्क करण्याचे आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात आले आहे.

(संपादन- विराज भागवत)