कोरोनाच्या टेन्शनमध्ये 'या' गावचं मस्त चाललंय, कोरोना हॉटस्पॉट मुंबईच्या कुशीतील कोरोनमुक्त गाव...

समीर सुर्वे 
शनिवार, 23 मे 2020

दोन महिन्यांपासून संपुर्ण गाव क्वारंटाईन, एकही रुग्ण नाही...

मुंबई : बोरीवली येथील गोराई गावाने एप्रिल महिन्या पासून स्वत:ला क्वारंटाईन करुन घेतले आहे.पर्यटन मासेमारी,शेती वर अवलंबून असलेल्या या गावातील पर्यटन व्यवसाय बंद आहे. पण, मासेमारी आणि शेतीतून पोटापुरतं उत्पन्न मिळवण्याचे नियोजन गावाने केले असून त्यांचा चांगला परीणाम म्हणजे आता पर्यंत एकही कोविड रुग्ण या गावात सापडलेला नाही.

गोराई खाडीमुळे बोरीवली पासून वेगळे झालेल्या या बेटात 20-22 हजाराची लोकवस्ती आहे. ख्रिस्ती, मराठी आणि मुस्लिम अशी मिश्र वस्ती त्याच बरोबर आदिवासी पाडेही आहेत. देशात लॉक डाऊन लागू झाल्यानंतर काही दिवसात या गावाने स्वत:ला क्वारंटाईन करुन घेतले. गावाच्या व्यवस्थापन मंडळामार्फत स्थानिक पातळीवरील गरजांचे नियोजन केले आहेत. फक्त अत्यावश्‍यक सेवांसाठी खाडीतील बोट सेवा सुरु आहे. असे सरपंच रोसी डिसूझा यांनी सांगितले.

मोठी बातमी - धारावीत झपाट्याने पसरतोय कोरोना, बाधितांचा आणि मृतांचा आकडा चिंताजनक

भाजी मंडईतही गर्दी होणार नाही याची खबरदारी गावातील तरुणांनी घेतली आहे. सामाजिक अंतर राखून मंडईचा रोजचा व्यवहार होत आहे. तर,अत्यावश्‍यक परीस्थीती असेल तरच घरातून बाहेर पडण्याचा सल्ला ग्रामस्थाना दिला आहे.त्यांचे काटेकोर पालनही ग्रामस्थांकडून होत असल्याचे रोसी यांनी सांगितले.

या गावातील 60 टक्के कुटूंब हे मासेमारीवर अवलंबून आहेत. सुरवातीच्या काळात मासेमारी बंद होती.  केंद्र सरकारच्या मंजूरीसाठी मासे मारी सुरु केली. पण,ती मर्यादित प्रमाणात सुरु केली. गावा पुरती मासेमारी करण्याचा निर्णय मच्छिमार संस्थेने घेतला त्यानुसार काम सुरु होते असे संघटनचे प्रमुख जोसेफ कालासो यांनी सांगितले. सध्या दोन महिला गावातील मासळी बाहेर नेऊन विकत आहेत. त्यांच्या शिवाय कुणीही बाहेर मासे विकण्यासाठी जात नाही असे रोसी डिसूझा यांनी सांगितले.

मोठी बातमी  महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद बातमी! शालेय शिक्षणाबाबत निती आयोगाने प्रसिद्ध केला अहवाल; वाचा राज्याची क्रमवारी

गावातील 30 टक्के कुटूंब हे शेतीवर अवलंबून आहेत. त्यात फळभाज्यांचे पिक आहे त्याच बरोबर आंब्यांची बाग देखील आहेत. आंबा रस्ते मार्गाने मिरा भाईंदरवरुन घेऊन जातात. तर, रोजीची भाजी कम्युनिटी किचन पर्यंत माफक दरात पोहचवली जात आहे. यात शेतकरीही फक्त पोटापुरता नफा घेतात तर कम्युनिटी किचन्सनाही माफक दरात चांगली भाजी मिळत आहे. सेंटर फॉर सोशल एक्स्चेंज या संस्थेमार्फत ही भाजी विकत घेतली जाते असेही रोसी यांनी सांगितले.

पोलिसांकडूनही मदत : - 

या भागात आदिवासी पाडेही आहेत. त्यांना बोरीवलीतील संस्थांमार्फत संस्थामार्फत जेवण पुरवले जात होते. तर, गावातील मंडळीही त्यांची काळजी घेत होती. यात गोराई पोलिस ठाण्याची महत्वाची भुमिका होती. पोलिसांनी आदिवासी कटूंबांना शक्‍य तेवढी मदत या काळात केली आहे. असेही सांगण्यात आले.

गावाने एकत्र येऊन निर्णय घेऊन बंधन घालून घेतली आहे. त्याचे पालन होत आहे. गावातील तरुण स्वत: पुढाकार घेऊन देखरेख ठेवत आहे. मासेमार, मळेवाले यांनीही या नियमांचे पालन केले आहे. नागरीकही प्रतिसाद देत असल्याने गावाचे आता पर्यंतचे नियोजन चांगल्या पध्दतीने होत आहे.- रोसी डिसूझा, संरपंच गोराई. 

gorai village situated in mumbai is corona free happy village read positive story


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gorai village situated in mumbai is corona free happy village read positive story