एसटीत नोकरी लागली, मात्र नियुक्तीची वाट पाहून थकलो

घर वाऱ्यावर, भविष्य धुसर झालंय; तरुणांची व्यथा
Got a job in ST but tired of waiting for appointment
Got a job in ST but tired of waiting for appointment

मुंबई - २०१९ मध्ये एसटी महामंडळाने ८ हजार २२ चालक वाहक पदाची भरती होती. यातील २ हजार ६०० हून अधिक चालक कम वाहक पदासाठीची भरती प्रक्रिया रखडली आहे. अनेक उमेदवारांचे प्रशिक्षण आणि वैद्यकीय चाचणी पूर्ण होऊनही नियुक्ती पत्र मिळालेले नाही. सध्या राज्यभरात ६५५ उमेदवारांचे प्रशिक्षण पूर्ण होऊन नियुक्तीची वाट पाहत आहे.अनेकांच्या संसाराची घडी विस्कटली आहे. या तरुणांना आता हातमजुरी, बीगारी, हमालीसारखी काम करावी लागत आहे. काही जणांचे जुळलेले लग्न तुटायची वेळ आली आहे. नोकरी मिळत असल्यामुळे अनेक तरुणांनी हातची नोकरी सोडली,उदरनिर्वाहाचे साधनही विकले. तीन वर्षे वाट पाहून हे तरुण आता नाऊमेद झाले असू, भविष्य अंधारमय झालंय .दुसरीकडे निवड केलेल्या उमेदवारांना वाऱ्यावर सोडून कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती करण्याचे धोरण एसटी महामंडळ राबवत आहे. राज्यभरातील या तरुणांनी ‘सकाळ’कडे आपल्या व्यथा मांडल्या.

नियुक्ती पत्र मिळेपर्यंत पायात चपल घालणार नाही

- विजय कांबळे, कोल्हापूर, (वय ४०) शिक्षण - १० वी, निवड - चालक कम वाहक

माझ्या आई -वडिलांच स्वप्न होतं, की मी एसटी महामंडळात काम कराव. २०११ पासून एसटीत नोकरी मिळविण्यासाठी मी प्रयत्न करत आहे. जोपर्यंत एसटी महामंडळात लागत नाही तोपर्यंत पायात चपल घालणार नाही असा निश्चय मी केला होता. तब्बल ८ वर्षांच्या प्रयत्नानंतर २०१९च्या एसटी महामंडळाच्या भरती 'चालक कम वाहक' या पदावर माझी निवड झाली. निवडीनंतर आई- वडील, पत्नीला माझ्या कष्टाचे सोन झाल्यासारखं वाटल. मात्र, त्यानंतर कोरोनामुळे भरती प्रक्रिया रखडली. आज कोरोना संपून वर्षे होत आहे. आतापर्यंत माझे दोनदा ट्रेनिंग झाले, मेडीकल झाले. मात्र अजूनपर्यंत नियुक्ती पत्र मिळाले नाही. तीन वर्षांपासून बेरोजगार आहे. कुटूंबियांचा गाडा हाकणे कठीण होऊन बसले आहे. सध्या हातमजूरीच्या कामावर जातोय.मिळेत ते काम.मला सरकारने नियुक्तीपत्र द्यावे, जोपर्यंत नियुक्ती पत्र मिळत नाही तोपर्यंत अनवाणी फिरेल.

नियुक्ती नाही, लग्न रखडल

नाव- भगवान पाटील - (कोल्हापूर) (वय ३०) शिक्षण - १२ वी, निवड - चालक कम वाहक

घरात सर्वात मोठा मुलगा मी आहे. लहान भावाचे शिक्षण सुरु आहे.आई-वडील अंथरुणाला खिळून आहे. जावयाचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे बहिण घरी आहे. विधवा बहिण आणि तिच्या दोन्ही मुलांचा सांभाळ करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे.२०१९ एसटी महामंडळाच्या सरळ सेवा भरतीमध्ये माझी 'चालक कम वाहक' पदासाठी निवड झाली. मला खूप आनंद झाला, वाटल की माझे सर्व प्रश्न सुटतील. मात्र गेल्या तीन वर्षापासून मला अजूनही नियुक्ती पत्र मिळाले नाही. गेल्या दोन वर्षांपासून जगणे कठीण झाले आहे. लग्न जुळले मात्र नियुक्ती पत्र न मिळाल्यामुळे लग्न रखडले आहे. जोपर्यंत नोकरी लागत नाही तोपर्यंत लग्न नाही अशी भूमिका सासरच्या मंडळीनी घेतली.माझा नाईलाज झाला आहे.सध्या मी हाताला मिळेल ते काम करतो आहे. सरकारला माझी विनंती आहे की कंत्राटी चालकांना मुदत वाढ देण्यापेक्षा प्रतीक्षा यादीतील चालक कम वाहकाना नियुक्ती पत्र द्या.

ट्रेनिंगसाठी गाडी विकली, आता हातमजुरी वेळ

- दयानंद कदम (कोल्हापूर) (वय ३४) शिक्षण - १२ वी, निवड - चालक कम वाहक -

२०१९ च्या भरतीत माझी चालक कम वाहक पदावर निवड झाली. भोसरीमध्ये ट्रेंनिग झाले. नियुक्ती पत्रासाठी वाट पाहत आहे. नोकरी लागायच्या पहिले मी मालवाहू गाडी (छोट्टा हत्ती ) चालवायचो. यावर माझ्या कुटुंबाचे पालन पोषण होत असायचे. मात्र एसटीत नोकरी लागली, ट्रेनिंगसाठी पैसै नव्हते. शेवटी मालवाहू गाडी विकली. घराचा आधार गेला. मात्र नोकरीही मिळत नाही, रोजगारही हातातून गेला. आता कर्ज काढून, २०० रुपये हातमजुरी करुन दिवस काढत आहे. नोकरी नाही, लग्नासाठी मुलगी मिळत नाही.माझे वय निघून जाईल. जीवन अंधातरी लागले आहे. कृपया नियुक्ती पत्र दिल्यास समस्या सुटेल.

मित्रांकडून पैसे घेऊन उदर्निवाह

- इंद्रजीत धूम, विकासवाडी, (वय २९) शिक्षण - १० वी पास, निवड - चालक कम वाहक -

मी कोल्हापूर जिल्हातील शेतकरी कुटूंबातला आहे. नोकरी लागण्यापुर्वी डिझेल पेट्रोल टँकरवर काम करत होतो. १५ हजार रुपये पगार होता,२०१९ च्या एसटी भरतीत निवड झाली. हातची नोकरी सोडून एसटीचे ट्रेनिग पूर्ण केले. आता नियुक्तीची वाट पाहून थकलो आहे. पत्नी,दोन मुलं, वृध्द आई वडील असा सर्व कुटुंबकबीला चालवणे कठिण झाले आहे. मुलांचे शिक्षण, आई वडिलांच्या औषधीसाठी पैसे पुरत नाही. नोकरी सोडल्याने डिझेल पेट्रोल टँकरवाले कामावर घेत नाहीत. मित्रांकडून हातउसने पैसै घेऊन कुटुंबाचा गाडा ओढतोय. डोक्यावर कर्जाचा डोंगर झाला. मित्राकडून पैसे मागायची लाज वाटते. मागणी; एक तर नियुक्ती द्या, किंवा तीन वर्षांची नुकसान भरपाई द्या.

हमाली काम करतोय

- अंकुश रामचंद्र डवर, बनाचीवाडी, जि. कोल्हापूर, निवड - चालक कम वाहक.

२०१९ पूर्वी शेती, हातमजुरीचे काम करायचो. २०१९ मध्ये एसटीत 'चालक कम वाहक' या पदावर निवड झाली. २०२०मध्ये कर्ज काढून दोन महिने ट्रेनिग पुर्ण केलं. अडीच वर्षापासून नियुक्ती पत्र मिळाले नाही. एसटी महामंडळाला विचारणा केल्यास नियुक्ती मिळेल पण तारीख सांगता येत नाही अस उत्तर मिळते. मला दोन मुलं आहे, एक पाचवीला आणि मुलगी पहिलीत शिकत आहे. त्यांच्या भविष्याचे काय होईल हा प्रश्न मला आता सतावत आहे. सध्या मोलमजुरी करून संसाराचा गाढा हाकलतो. आम्ही सर्वजण अंत्यत सामान्य कुटुंबातील आहोत. कृपया आम्हाला आमच्या हक्काची नोकरी द्यावी.

नियुक्ती द्या नाही तर मरण्याची परवानगी तरी द्या

नाव - सिद्धार्थ काकडे, जि. बुलढाणा, (वय ३६) निवड - चालक कम वाहक

बुलढाणा जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबातील मी आहे. घरी दीड एकर कोरडवाहू शेती आहे.दुष्काळामुळे पीक होत नाही. मला दोन मुले आणि वृद्ध आई-वडील आहे. माझं बीए,बीएड असं शिक्षण झाले. २०१९ मध्ये एसटी महामंडळाच्या सरळ सेवा भरतीमध्ये नोकरी लागली. ट्रेनिंग सुरु झाले. खाकी गणवेश घालून गावात गेलो, गावकऱ्यांनी माझा सत्कार केला. तीन वर्षापासून नियुक्ती मिळाली नाही, घरातचं बसून असल्यामुळे गावकरी घरच्यांना प्रश्न विचारायला लागले की तूमच्या मुलाला नोकरीवरुन काढून टाकलय का? त्यांच्याकडे उत्तर नाही. नियुक्तीसाठी मुंबईतील एसटी मुख्यालयात चकरा मारल्या. आम्हाला नोकरीवर घ्या अन्यथा आत्महत्या करण्याची अनुमती द्यावी अशी सरकारला कळकळीची विनंती आहे.

नाऊमेद होत चाललो

नाव- कृष्णा हजारे, चंदूर, कोल्हापूर, (वय ३३), शिक्षण - १२ वी, निवड - चालक कम वाहक

तीन वर्षापासून एकाही निवड झालेल्या उमेदवाराला नियुक्ती पत्र मिळाले नाही. उलट एसटी महामंडळ कंत्राटी पध्दतीच्या चालकांना मुदत वाढून देत आहे.त्यांना आमचा विरोध नाही. मात्र त्यापुर्वी २०१९ मध्ये एसटीच्या सरळ सेवा भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवाराना नियुक्ती द्या. एसटी महामंडळ कंत्राटी कामगारांना प्रति महिना २१ हजार ५०० रुपये देत आहे. मात्र १७ हजार रुपये, वेतन असलेल्या हक्काच्या कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्र देत नाही. एसटीच्या हेतूवर शंका यायला लागल्या आहेत. आम्हा सर्व उमेदवारांच्या घरची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. मात्र सरकार आमचं गाऱ्हाणही ऐकुण घ्यायला तयार नाही. आम्ही नाउमेद होत चाललोय.

ज्या उमेदवारांची निवड झालेली आहे काहींचं प्रशिक्षण झालेलं आहे तर काहींचे अर्धवट प्रशिक्षण होऊन थांबलेले आहे. तसेच अनेक अनुकंपाची प्रकरणे सुद्धा प्रलंबित आहेत. अशा कर्मचा-यांना प्रथम कर्तव्यावर घेणे आवश्यक असताना कंत्राटी कामगार घेणे किंवा त्यांना मुदतवाढ देणे न्यायीक नाही.

- संदीप शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना.

अगोदर चालक कम वाहक पदातील प्रतीक्षा यादीवरील ६५५ उमेदवारांना नोकरीत घ्या. या उमेदवारांनी आपली खासगी नोकरी सोडून एसटी महामंडळातील प्रशिक्षण पूर्ण केले आहे. सध्या हे सर्व उमेदवार बेरोजागर आहे. मात्र, त्यांना डावलून कंत्राटदाराचे चालकांना मुदतीवर मुदत वाढ दिली जात आहे हे योग्य नाही.

- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com