उंदेरी किल्ल्यात पाण्याखाली तोफ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

अलिबागजवळ समुद्रात असलेल्या उंदेरी किल्ल्याजवळच्या पाण्याखालील खडकात सह्याद्री प्रतिष्ठानच्या सदस्यांना नुकतीच तोफ सापडली आहे.

पाली (वार्ताहर) : अलिबागजवळ समुद्रात असलेल्या उंदेरी किल्ल्याजवळच्या पाण्याखालील खडकात सह्याद्री प्रतिष्ठानच्या सदस्यांना नुकतीच तोफ सापडली आहे. पुरातत्त्व खात्याच्या निकषानुसार तिचे योग्य संवर्धन करण्यात येणार आहे.

सह्याद्री प्रतिष्ठानच्या अलिबाग विभागामार्फत उंदेरी किल्ल्यात नुकतीच स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. त्या वेळी तटबंदीच्या खाली गाडलेली तोफ बाहेर काढण्यात आली. आता या किल्ल्यावरील तोफांची संख्या १७ झाली आहे. सिद्दीने काही काळ हा किल्ला आपल्या ताब्यात ठेवला होता. तर सरखेल कान्होजी आंग्रे काळात हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता. समुद्रातील आक्रमणापासून संरक्षण दृष्टीने लष्करी शस्त्राने तो सज्ज होता. 

गडकिल्ल्यांचे संवर्धन
सह्याद्री प्रतिष्ठान ही संस्था महाराष्ट्रातील गडकिल्ले संवर्धनासाठी महाराष्ट्रभर कार्य करत आहे. संस्थेचे संस्थापक श्रमिक गोजमगुंडे यांच्या नेतृत्वाने १० वर्षांपासून दुर्ग संवर्धन होत आहे. या संघटनेने जंजिरा किल्ल्यावर कायमस्वरूपी राष्ट्रध्वज लावण्यात आला. तसेच पद्मदुर्ग, कोर्लई, कुलाबा या किल्ल्यांवर तोफांच्या संवर्धनाच्या दृष्टीने केंद्र पुरातत्त्व विभागाच्या परवानगीने ११ तोफांना सागवानी तोफगाडे पुरातत्त्व निकषाने लावण्यात आले. तसेच, खांदेरी किल्ल्यावर स्वच्छता मोहिमे दरम्यान जमिनीत गाडलेल्या दोन तोफांना बाहेर काढण्यात आले आहे, अशी माहिती सह्याद्री प्रतिष्ठानचे दुर्ग संवर्धन विभागाचे अध्यक्ष गणेश द. रघुवीर यांनी ‘सकाळ’ला दिली.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: got cannon under water in Underi Fort