पोलादपूर स्थानक परिसर भकास

देवेंद्र दरेकर : सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 डिसेंबर 2019

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या आड येणारी पोलादपूर शहरातील एसटी स्थानक परिसरातील सुमारे १७५ दुकाने हॉटेल प्रशासनाने हटवली आहेत.

पोलादपूर : मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या आड येणारी पोलादपूर शहरातील एसटी स्थानक परिसरातील सुमारे १७५ दुकाने हॉटेल प्रशासनाने हटवली आहेत. ही कारवाई करताना त्यांना नुकसान भरपाई दिली नसल्याने त्यांच्यासामोर आता कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम आता दक्षिण रायगडमध्ये वेगाने सुरू आहे. या कामात अडथळा ठरणारी घरे, दुकाने, हातगाड्या आदी हटवण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार पोलादपूर एसटी स्थानक परिसरात १५ दिवसांपूर्वी कारवाई करण्यात आली. त्यामुळे कुटुंबांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. 

...म्हणून बसस्थानक परिसर गजबजलेला 
पोलादपूर बसस्थानकातून मुंबई, कोकण, महाबळेश्‍वरकडे जाणाऱ्या प्रवाशांची वर्दळ असते. तसेच शाळा-कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची येथून वर्दळ असते. त्यामुळे पोलादपूर बसस्थानकाच्या परिसराला महत्त्व आहे. त्यामुळे महामार्गालगत बसस्थानक परिसरात दुतर्फा छोटे-मोठे टपरी व्यावसायिकांसाठी रोजगाराची मोठी संधी निर्माण झाली होती.

सावली हरवली 
पोलादूर बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्ष होते. ते मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणासाठी तोडण्यात आले. त्यामुळे हा परिसर ओसाड झाला असून प्रवाशांना उन्हाच्या झळा बसत आहेत. 

महामार्ग रुंदीकरणासाठी पोलादपूर बसस्थानक परिसरातील दुकाने, टपऱ्या हटविल्याने व्यावसायिक बेरोजगार होऊन वाऱ्यावर आहेत. महामार्गाचे काम होईपर्यंत सरकारने त्यांना मदतीचा हात पुढे करणे आवश्‍यक आहे. 
- ज्ञानदेव पार्टे, हातगाडी संघटना अध्यक्ष, पोलादपूर

महामार्गाच्या रुंदीकरणासाठी टपऱ्या हटविल्याने अनेकांचा रोजगार बुडाला आहे. अपंगांना तर दुसरा कोणताही रोजगार नसल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. 
- दिलीप सावंत, अपंग टपरीधारक

पोलादपूरमधील महामार्ग बाधित टपरी व्यावसायिकांची समस्या जाणून घेतली आहे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
- भरत गोगावले, आमदार, महाड


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Govt. Administration has removed shops and hotels