Grampanchayat Election Result | कल्याण-अंबरनाथमध्ये शिवसेना, भाजपचा दबदबा कायम

Grampanchayat Election Result | कल्याण-अंबरनाथमध्ये शिवसेना, भाजपचा दबदबा कायम

डोंबिवली  : कल्याण, अंबरनाथ तालुक्‍यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना, भाजपने आपला दबदबा कायम राखला आहे; मात्र बालेकिल्ला असलेल्या भागात मोठ्या पक्षांना हार पत्करावी लागली आहे. अंबरनाथ तालुक्‍यातील नेवाळी ग्रामपंचायतीत शिवसेनेला पराभव पत्करावा लागला आहे; तर कल्याणच्या म्हारळ ग्रामपंचायतीमध्ये भाजपला धक्का बसला आहे. मनसेनेही ग्रामपंचायतीमध्ये आपले खाते उघडले असून काकोळे येथे शिवसेना व भाजप पॅनलचा पराभव करीत मनसेच्या पॅनलने विजय मिळवला आहे. निकालानंतर आता सरपंच पदाच्या आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

ग्रामपंचायत निडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपचे आमदार गणपत गायकवाड प्रयत्नशील होते. परंतु शिवसेनेने ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भाजपही पूर्ण तयारीनिशी निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती. त्यामुळे ही निवडणूक शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्या प्रतिष्ठेची बनली होती. 
शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या नेवाळी ग्रामपंचायतीत सेनेला हादरा बसला आहे. 11 पैकी 9 जागांवर भाजपचा विजय झाला आहे. नेवाळी ग्रामपंचायतीतील 11 जागांवर निवडणूक होणार होती; मात्र त्यातील 3 जागा बिनविरोध झाल्या. यामध्ये 1 शिवसेना; तर दोन जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध आले होते. उर्वरित आठ जागांवर निवडणूक झाली. यामधील 1 जागेवर शिवसेना व उर्वरीत 7 जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आले. उसाटणे गावात भाजपविरुद्ध सर्व पक्ष असा संघर्ष पाहायला मिळाला. येथे मनसे, शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत झाली. येथे 2 जागा बिनविरोध आल्या; तर 5 जागांवर मनसे, शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या पॅनलने विजय मिळवला. 

कल्याण तालुक्‍यातील खोणी ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेने भाजपचा पराभव केला आहे. येथे शिवसेनेला 6, मनसेचे 3 व भाजपचे 2 उमेदवार विजयी झाले. वडवली - शिरढोण येथेही शिवसेनेने आपले वर्चस्व कायम राखत 9 पैकी 8 सदस्य निवडून आणले आहेत. बुर्दुल ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पॅनेलने आपले वर्चस्व कायम राखले आहे. काकोळे ग्रामपंचायतीवर मनसेचा झेंडा फडकला आहे. नाऱ्हेने, नेवाळी ग्रामपंचायतीवर भाजपने वर्चस्व मिळवले आहे. म्हारळ ग्रामपंचायतीमध्ये भाजपला धक्का लागला आहे. 17 पैकी 11 जागांवर महाविकास आघाडीचा विजय झाला आहे. भाजपला 6 जागांवर यश आले आहे. 

Grampanchayat Election Result In Kalyan Ambernath majority of ShivSena and BJP candidates won

----------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com