Grampanchayat Election Result | श्रीवर्धन तालुक्‍यावर शिवसेनेचा भगवा

अमोल चांदोरकर
Monday, 18 January 2021

श्रीवर्धन तालुक्‍यात झालेल्या चार ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये शिवसेनेने तीन ग्रामपंचायती जिंकल्या. गालसुरे ग्रामपंचायतीच्या नऊ जागांपैकी चार जागांवर शिवसेचे उमेदवार विजयी झाले

श्रीवर्धन  : तालुक्‍यात झालेल्या चार ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये शिवसेनेने तीन ग्रामपंचायती जिंकल्या. गालसुरे ग्रामपंचायतीच्या नऊ जागांपैकी चार जागांवर शिवसेचे उमेदवार विजयी झाले; तर पाच जागा शेकापने जिंकून या पक्षाचा लाल बावटा फडकला. 
शिवसेनेने तालुक्‍यावर निर्विवाद वर्चस्व सिद्ध करतानाच संपूर्ण तालुक्‍याचे लक्ष लागून राहिलेल्या दिघी ग्रामपंचायतीवर शिवसेनेने प्रमुख विरोधी पक्षांना धोबीपछाड देत तेरा जागांपैकी दहा जागा जिंकल्या. तसेच तालुक्‍यातील कारीवणे, सायगाव या ग्रामपंचायतींवरसुद्धा भगवा फडकवून पुन्हा एकदा श्रीवर्धन तालुक्‍यावरील शिवसेनेचे असणारे वर्चस्व सिद्ध केले आहे. 
Grampanchayat Election Result ShivSenas victory in Shrivardhan taluka

----------------------------------------

GrampanchayatElectionResult | रायगडमधील रोहा तालुक्‍यात शिवसेना - भाजपाची मुसंडी

अलिबाग  : राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या रोहा तालुक्‍यातील आकाराने मोठ्या ग्रामपंचायतीवर शिवसेना भाजपाने मुसंडी मारली. रोह्यात 21 ग्रामपंचायतीपैकी राष्ट्रवादी 12, शिवसेना आणि भाजप सहा, मगर गट एक, शेकाप दोन ग्रामपंचायत जागांवर पक्षांचे अधिकृत उमेदवार विजयी झाले. भाजपाला रोखण्यासाठी राष्ट्रवादी- शेकापने सर्व ताकद लावली होती. परंतु शिवसेनेच्या मदतीने भाजपाने रोहा तालुक्‍यात शिरकाव केला आहे. याचे पडसाद आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत उमटणार असल्याचे मत राजकिय विश्‍लेषकांचे आहे. 

राष्ट्रवादीच्या ताब्यातील ऐनघर, वाशी, निडी तर्फे अष्टमी, रोठ बुद्रुक या मोठ्या ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मतदारांनी सपशेल नाकारले. त्यामुळे या ग्रामपंचायती शिवसेना-भाजपा यांच्या ताब्यात गेल्या आहेत. तसेच शेकापच्या ताब्यातील शेणवई, वावे-पोटगे या ग्रामपंचायतीत मतदारांनी परिवर्तन करत शिवसेनेच्या हेमंत देशमुख गटाला विकास करण्यासाठी संधी दिली आहे. तेथील शेकापच्या गणेश मढवी गटाला मतदारांनी कंटाळून हेमंत देशमुख गटाला स्वीकारले. त्याचप्रमाणे वाशी ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीला सर्व जागांवर पराभव पत्करावा लागला. त्याठिकाणी अनेक वर्षे संघर्ष करत असलेल्या सुरेश मगर गटाने विजय मिळविला. एकंदरीत रोह्यातील राष्ट्रवादी गटांमधील अंतर्गत गटबाजीमुळे राष्ट्रवादीला पाच ग्रामपंचायतीवर पराभव पत्करावा लागला. 

पक्षातील अंतर्गत श्रेयवाद अखेर राष्ट्रवादीच्या पदरात निराशा देऊन गेल्याने आता आगामी निवडनुकांमध्ये याचे पडसात नक्कीच उमटणार असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे. वरसे ग्रामपंचायतीतील सर्वेसर्वा मधुकर पाटील फक्त आपले उमेदवार बिनविरोध विजयी करण्यात यशस्वी झाले आहेत. विशेषतः वाशी ग्रामपंचायतीत सुरेश मगर गट यांनी सर्वच्या सर्व जागांवर विजय मिळविल्यानंतर त्यांचीच चर्चा रोह्यात होत आहे. याशिवाय सहा ग्रामपंचायती राष्ट्रवादी व शेकापच्या हातातून निसटल्याचे शल्य नक्कीच कार्यकर्त्यांच्या मनात राहील असे बोलले जात आहे. 
पेणचे आमदार रवीशेठ पाटील यांच्या मतदार संघातील निडी तर्फे अष्टमी, रोठ बुद्रुक व ऐनघर ग्रामपंचायत भाजपाच्या ताब्यात आल्याने आता रोहा तालुक्‍यात भाजपाने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. 
GrampanchayatElectionResult Shiv Sena-BJPs Victory In Roha Taluka In Raigad

---------------------------------------

GrampanchayatElectionResult | म्हसळ्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम; भाजप चारीमुंड्या चीत
अलिबाग : म्हसळा तालुक्‍यातील कार्यकाल संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी निवडणुका जाहीर झाल्या होत्या. यातील ग्रामपंचायत केल्टे बिनविरोध अगोदरच झाली होती. तर पाभरे आणि लिपणी वावे या ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी (ता. 15) मतदान घेण्यात आले. यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसने बाजी मारली. 
पाभरे आणि लिपणी वावे दोन ग्रामपंचायतींसाठी 46.38 टक्के मतदान झाले होते. पाभरे ग्रामपंचायतीमध्ये भाजपने ताकद लावण्याचा प्रयत्न केला होता. त्यांचे नेतृत्व करण्यासाठी म्हसळा भाजप तालुकाध्यक्ष प्रकाश रायकर यांनीही कंबर खचली होती. परंतु, त्या भागामध्ये राष्ट्रवादीचे प्राबल्य मोठ्या प्रमाणात असल्यामुळे विकासकामाच्या जोरावर त्या ठिकाणी भाजपला चारीमुंड्या चित करून राष्ट्रवादीने गड कायम राखला. तर लिपणी वावे ग्रामपंचायतही अनेक वर्षे राष्ट्रवादीकडे होती; परंतु त्या ठिकाणी आघाडी असतानाही राष्ट्रावादी आणि कॉंग्रेस अशी दोघांमध्ये लढत होती. तीन ग्रामपंचायतींपैकी दोन ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचा झेंडा आजही कायम अबाधित ठेवला आहे. तर केल्टे ग्रामपंचायत ग्रामविकास आघाडीकडे आहे. त्या विभागात गण अध्यक्ष अनिल बसवत, कृषी सभापती बबन मनवे, तालुकाध्यक्ष समीर बनकर आणि यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी दोन्ही ग्रामपंचायती आपल्याकडे कायम राखण्यासाठी मेहनत घेतली. 
GrampanchayatElectionResult NCPs Dominance In Mhasla In Raigad

-----------------------------------------

GrampanchayatElectionResult | कर्जतमध्ये शिवसेनेचा भगवा फडकला; राष्ट्रवादीची एकाच ग्रामपंचातीवर सत्ता

कर्जत तालुक्‍यातील कोल्हारे, भिवपुरी, जिते ग्रामपंचायतीवर शिवसेनेने एकहाती सत्ता मिळवली आहे. तर राष्ट्रवादीने वैजनाथ या एकमेव ग्रामपंचायतीवर एकहाती विजय मिळवला आहे. साळोख ग्रामपंचातीत कॉंग्रेसने सर्वाधिक पाच जागांवर विजय मिळविला असला तरी सत्ता मिळविण्यासाठी राष्ट्रवादीशी हातमिळवणी करावी लागणार आहे. तालुक्‍यातील सर्वांचेच लक्ष असलेल्या कडाव ग्रामपंचातीमध्ये शिवसेनेत दोन गट पडलेले दिसून आले. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी, रिपब्लिकन यांच्या महाविकास आघाडीला 10 जागा, तर दुसऱ्या गटाचे फक्त शिवसेना म्हणून लढलेले तीन उमेदवार विजयी झाले. पोशीर ग्रामपंचायतीत एकूण 11 सदस्यांपैकी सहा शेकाप आणि शिवसेना यांच्या परिवर्तन आघाडीचे निवडून आले. तर ग्रामविकास आघाडीला पाच जागांवर यश मिळाले. कोल्हारे ग्रामपंचातीत शिवसेनेचे सहा, तर राष्ट्रवादीचे पाच उमेदवार निवडून आले. त्यामुळे शिवसेनेला एकहाती सत्ता मिळाली. 
सध्या चित्र काहीही असले तरी प्रत्यक्षात सरपंच निवडीनंतरच कोणाची सत्ता ग्रामपंचातीवर आहे हे निश्‍चित होईल असे मत राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस तानाजी चव्हाण यांनी व्यक्त केले. 
GrampanchayatElectionResult ShivSena Maintains Dominance In Karjat In Raigad

---------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Grampanchayat Election Result ShivSenas victory in Shrivardhan taluka