...आणि आई म्हणाली, मी पाया पडते तु नको जाऊ !

...आणि आई म्हणाली, मी पाया पडते तु नको जाऊ !

दर आठवड्याला गावाकडे आल्यानंतर चौकशी करणारे मित्र.., सर आलेत का? आमचं तेवढं रेशनचा बघा म्हणून सांगणारे गरजू... पाण्याची गावात खूप टंचाई झाली आहे तेवढं बघीतली तर बरं होईल... शंभर टक्के आपली समस्या सुटणार याची खात्री असल्याने अनेकजण मोठ्या आशेने गुरुवारची वाट पाहणारे या कोरोना व्हायरसमुळे अख्या कुटूंबाला संशयाने पाहत आहेत. कोणतीही अपेक्षा न ठेवता केवळ नागरिकांसाठी काम करणाऱ्या पत्रकाराची ही व्यथा आहे. 

देशभर कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत आहे. काही ठिकाणी रुग्ण आहेत, तर काही ठिकाणी रुग्ण नाहीत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सिमा बंदी करण्यात आल्यात. महराष्ट्रात पुण्यात पहिला रुग्ण सापडला. त्यानंतर इतरही रुग्ण सांपडले. पुणे आणि मुंबईमध्ये रुग्णांची संख्या मोठी असल्याने तेथून येणाऱ्यांची माहिती घेण्यात येत होती. त्यानंतर इतर जिल्ह्यातही रुग्ण वाढत गेले. त्यामुळे जिल्ह्या बंदी करण्यात आली. बाहेरच्या जिल्ह्यातून कोण आले आहे. याची माहिती प्रशासन घेऊ लागले. यासाठी ग्रामसेवक, आशासेविका, आरोग्यसेविका, तलाठी आदींना कामे देण्यात आली. संबंधीत कर्मचाऱ्यांनी गावातच रहावे असाही आदेश देण्यात आला. मात्र, अपवाद वगळता या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आली. अनेकजण गावात राहायला गेलेच नाहीत. कोरोनाच्या वाढत्यासंसर्गामुळे नागरिकही सजग झाले आणि गावबंद करु लागले. यातूनच कोण बाहेरुन आला आहे, त्याच्या कुटूंबीयांकडे सुद्धा संशयित दृष्ट्या पाहू लागले. यातून पत्रकार सुद्धा सुटले नाहीत.

१२ एप्रिलला सोलापुरात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. १९ एप्रिलला बाधितांची संख्या १३ झाली अन्‌ मृत्यूची संख्या २ होती. याचा धसका ग्रामीण भागाने घेतला. रुग्णांची वाढती संख्या पाहून प्रशासनाने खबरदारी म्हणून सोलापूरात संपूर्ण संचारबंदी सुरु केली. दरम्यान सोलापुरात राहणारा एक पत्रकार सुट्टीमुळे जिल्ह्यातीलच त्याच्या गावी गेला. जिल्ह्यातल्या जिल्ह्यात कोठेही जाऊ नये असा आदेश नाही. त्यामुळे तो गेला. त्याच्याकडे ओळखपत्र असल्याने त्याला वाटेतही कोठे अडचण आली नाही. २० तारखेला तो त्याच्या गावी गेला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने केलेल्या सर्व सूचनांचे त्याने पालनही केले. गावी गेल्यानंतरही त्याचे काम सुरुच होते. मात्र, सोलापुरातून आला आहे. याची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे जे लोक मोठ्या अपेक्षा घेऊन समस्या सांगायला येत होते. ते संशयाने पाहू लागले. याची माहिती गावातील संबंधीत कर्मचाऱ्यांनाही देण्यात आली. गावात एकदम चौकात त्याचं साधं पत्र्याचे घर आहे. मात्र, तो सोलापुरातून आल्यामुळे त्याच्या घरा समोरुन सुद्धा जाण्याचे टाळू लागले.

संबंधित कर्मचऱ्यांनी गावात राहणे आवश्‍यक असताना सुद्धा ते बाहेरगावी राहत आहेत. लोकांनी तो बाहेरुन आला आहे. त्याची चौकशी करा, असा आग्रह धरल्यानंतर ते आले. आल्याबरोबर एकाने विचारले तुमच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का आहे का? तुम्ही तपासणी केली का? असे एक ना अनेक प्रश्‍न त्याला विचारण्यात आले. कुटुंबाला त्रास होऊ नये म्हणून कोरोना बाधीत रुग्णांची ओळख प्रशासन जाहीर करत नाही. मात्र, एवढे असताना सुद्धा संबंधित कर्मचाऱ्यांबरोब १५ ते २० जण होते. त्याला कोणत्याही परस्थितीत गावात ठेऊ नका अशी, त्याची भावना होती. तुम्ही तपासणी करा, होम क्वारंटाईन व्हा, हातावर शिक्का मारुन घ्या, अशी काही त्यांची अपेक्षा होती.  तुम्ही अनेक अधिकाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या आहेत. मंत्र्याची मुलाखत घेतली आहे. आम्ही त्या पाहिल्या आहेत. त्यामुळे तुम्ही तपासणी करणे आवश्‍यक आहे. त्यावरी आम्ही तपासणी केली आहे. माझ्याकडे पासही आहे. सर्व सुचना पाळल्या आहेत. असं पत्रकाराने सांगितलेही. तरी त्यांनी तपासणी करण्याची सूचना केली. त्यावर पत्रकारानेही त्यांच्या सूचनेचे पालन करुन तपासणी करण्यास होकार दिली. त्याच्या गावापासून उपजिल्हा रुग्णालय १० किलोमीटर आहे. मात्र, त्याला तपासणीसाठी ४० किलोमीटरवरील प्राथमिक आरोग्य केंद्रात जाण्यास सांगितले. तशी चिट्टीही देण्यात आली. तुम्ही उद्या तपसाणीसाठी गेला तरी चालेल असे सांगण्यात आले. कारण लगेच तपासणीसाठी गेला तर तिथे कोणीही नसेल असेही सांगण्यात आले. 

एकदम १५-२० जण येऊन आपल्या मुलाला काय सांगत आहेत. याची भिती कुटुंबीयाना वाटू लागली. याची चर्चा संपूर्ण गावात झाली. त्यानंतर घरच्यांशी सुद्धा अनेकांनी बोलणे बंद केले. हा सर्व प्रकार झाल्यानंतर पत्रकारांने त्यांचे तालुका बातमीदाराला याची कल्पना दिली. त्यांनी उपजिल्हा रुग्णालयात संपर्क साधून येथेच तपासणीची व्यवस्था केली. डॉक्टरांनी सर्व माहिती विचारुन तपासणीची आवश्‍यकता वाटत नसल्याचे सांगितले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गावातील स्वत:ला पुढारी म्हणून घेणारे काहीजण एकत्र येऊन त्याला तपासणी करायला जा म्हणून सांगण्याच्या प्रयत्नात होते. ही बाब पत्रकारच्या चुलत्याने ऐकली. त्यावर गावात पुण्याहून कितीजण आलेत. त्यांनाही तपासणीला घेऊन चला असे सांगितले. विशेष म्हणजे सोलापुरातून आल्यानंतर एका मित्राने त्याची कटींग केली होती. त्याला सुद्धा त्रास देण्याचा प्रयत्न झाला. सर्वांच्या आग्रहखातर त्याने तपासणी करण्याचा निर्णयही घेतला. तालुका बातमीदार यांना याची कल्पनाही दिली. त्यांनी सांगितलेली सर्व प्रोसेस केली. दरम्यान सबंधित कर्मचाऱ्यांना उपजिल्हा रुग्णालयात तपासणी करत असल्याचेही सांगण्यात आले. तुम्ही आला तर बरं होईल, असंही सांगण्यात आले. पोलिस पाटील यांचे पती यांनाही याची माहिती देण्यात आली. पोलिस पाटील संघटनेचे अध्यक्षांनाही याची माहिती देण्यात आली.  सर्वांच्या सूचनांचे पालन करत तपासणीचा स्विकार केला. याची चर्चा गावभर झाली. तपासणी झाल्याचे समजताच जे कोणी तक्रार करत होते. त्यांची नावे सुद्धा लगेच सांगण्यात आली.


पत्रकाराच्या भावाचा पाण्याचा आरओ प्लांन्ट आहे. सध्या गावात पाणी टंचाई असल्यामुळे अनेकजण पाण्याचे जार घेतात. पत्रकार सोलापुरहून आला आहे. त्याला होमक्वरंटाईन केले आहे. काहींनी तर त्याला कोरोना झाला आहे, अशी सुद्धा अफवा उठवली. त्यामुळे काहींनी पाण्याचे जारही बंद केले. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या गावात नेहमीप्रमाणे भाव पाण्याचे जार घेऊन गेला. तर त्यालाही त्याचा त्रास सहन करावा लागला. भाऊ प्रत्येकाला हात जोडून सांगत होता. त्याने तपासणी करुन घेतली आहे. मात्र, त्याला होम क्वरंटाईन केलेले नाही. त्याच्या हातावर शिक्का सुद्धा मारलेला नाही. सर्व सूचनांची तो काळजी घेत आहे. मी स्वत: कोरोनाबाबत सर्व काळजी घेत आहे. तुम्ही पाणी घेऊ नका हरकत नाही. पण किमान खोटी माहिती तरी पसरवू नका, असं तो सांगत होता. दरम्यान एका कर्मचाऱ्यानही याचा खुलासा केली. भाऊ पोलिसांना सुद्धा पाण्याचे जार देत आहे. त्यांच्यापर्यंत ही बातमी गेली. त्यांनी सर्व चौकशी केली. त्यांनी भावाला धीर देण्याचा प्रयत्न केला. लोकांच्या त्रासामुळे भाऊ प्लांन्ट बंद करण्याच्या विचारात होता. मात्र, काही संमजस्य नागरिकांमुळे त्याने सुरु ठेवला. आमची पाण्याची अडचण करु नका, सध्या उन्हाळा आहे. पाणी महत्त्वाचे आहे. असं त्याला सांगितले जात होते. 

कामानिमित्त पत्रकार बाहेर पडला तरी त्याची खबर कर्मचाऱ्यांना दिली जात होती. त्यावर त्यांचा फोन येत होता. एखदा तर तुम्ही शिक्का का मारुन घेतला नाही म्हणून कर्मचारी विचारत होता. त्यावर पत्रकाराने ते डॉक्टर ठरवतात ना? मी कसं म्हणणार मला शिक्का मारा, असं उत्तर दिलं. अहा प्रकार तहसीलदार, जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिक्षकांच्या कानावर सुद्धा गेला. तुम्ही आता सोलापुरला जाऊ नका असा धीर सुद्धा काहीजण देत होते. हा सर्व प्रकार पाहून आई, वडील, भाऊ, पत्नी आणि मुलं सुद्धा टेन्शनमध्ये गेले. सोलापुरला जाताना अक्षरश: आई म्हणाली तुझ्या पाया पडते तु नको जाऊ सोलापूरला!

ground reality of how people are treating village outsiders and journalist in lockdown

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com