मुंबईचं फुप्फुस वाचल्याचा आनंद! कांजूर कारशेडच्या निर्णयाचे पर्यावरणवाद्यांकडून स्वागत 

मिलिंद तांबे
Monday, 12 October 2020

आरेमधील नैसर्गिक साधनसामग्री म्हणजे मुंबईची फुप्फुसे आहेत. माणसाच्या आयुष्यात फुप्फुसांचे जे महत्त्व तेच मुंबईसाठी आरेचे आहे.

मुंबई : आरेमधील नैसर्गिक साधनसामग्री म्हणजे मुंबईची फुप्फुसे आहेत. माणसाच्या आयुष्यात फुप्फुसांचे जे महत्त्व तेच मुंबईसाठी आरेचे आहे. फुप्फुस वाचल्याचा जो आनंद असतो तोच आता आम्हाला झाला आहे, अशी प्रतिक्रिया पर्यावरणवाद्यांनी सोमवारी व्यक्त केली. मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्याच्या निर्णयाचे पर्यावरणवाद्यांनी स्वगत केले आहे. 

मुंबईतील प्रदूषणाचे प्रमाण वाढले! रस्त्यावरील वाहने वाढल्याचा परिणाम; हवेचा दर्जाही खालावला

कांजूरमार्गचा पर्याय मेट्रोसाठी सर्वात योग्य असल्याचे पर्यावरणवादी स्टॅलिन दयानंद यांनी म्हटले आहे. कांजूरमार्गच्या जागेवर झाडे नाहीत. जैवविविधतेच्या दृष्टीने तो कमी महत्त्वाचा आणि सरकारच्या ताब्यात असलेला भूखंड आहे. सरकारला तो मोफत उपलब्धही आहे, असे ते म्हणाले. स्टॅलिन यांची "वनशक्ती' संस्था आरेमध्ये मेट्रो कारशेडच्या उभारणीविरुद्ध न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्यांपैकी एक आहे. 
मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाने मेट्रो-3 आणि मेट्रो-6 ची कारशेड एकत्र उभी राहील. त्यामुळे दोन्ही मार्गांची उपयुक्तता आणखी वाढेल, असेही स्टॅलिन यांनी नमूद केले. आता कुलाबा-सीप्झ-कांजूरमार्ग मेट्रो बनली आहे. ज्यामुळे पूर्व-पश्‍चिम उपनगरांना जोडणारा आणखी एक पर्याय मिळेल. त्यामुळे नागरिकांच्या सुविधेसह मुंबईच्या वाहतूक कोंडीतूनही मार्ग निघेल, असेही त्यांनी सांगितले. 

ठाण्यातील दुकाने रात्री साडेनऊपर्यंत सुरू; महापौर नरेश म्हस्के यांचे प्रशासनाला आदेश

कांजूर कारशेडच्या निर्णयामुळे खर्च वाढेल, असे सांगितले जाते. मात्र, त्यात तथ्य नाही, असे स्टॅलिन दयानंद यांना वाटते. आरे आणि कांजूरमार्गमध्ये दोन वेगवेगळ्या कारशेड बनवायच्या तर कमीत कमी आठशे ते नऊशे कोटी रुपये खर्च आहे, पण दोन्ही प्रकल्पांची कारशेड कांजूरमार्गमध्ये आणल्याने त्याचे काम चारशे ते पाचशे कोटी रुपयांत होणार आहे. त्यामुळे पैशांची बचतही मोठ्या प्रमाणावर होईल, अशी आशा स्टॅलिन यांनी व्यक्त केली. 

आरेमधील निसर्ग वाचणे यासाठी हा लढा होता. तो यशस्वी झाला. आरेमध्ये प्रस्तावित जागेच्या आसपास अजूनही जी 2700 जी झाडे उभी आहेत, तिथली जीवसंपदा आहे तीही वाचणार आहे हे अधिक महत्त्वाचे आहे. कोणताही प्रकल्प असो, पण तिथल्या पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही अशी जागा वापरली जावी, असे सेव्ह आरे मोहिमेचे झोरू बाथेना म्हणाले. 

रिचा-पायलने तडजोडीने वाद सोडवा; उच्च न्यायालयाने बुधवारपर्यंत दिला अवधी 

जमीन वाचणार अन्‌ नैसर्गिक संपत्तीचेही जतन! 
मेट्रो 3 आणि मेट्रो 6 साठी दोन वेगवेगळ्या कारशेड उभारण्यात येणार होत्या. आता दोनऐवजी एकच कारशेड उभी राहणार आहे. 80 ऐवजी 40 हेक्‍टरमध्येच दोन्ही कारशेड उभ्या राहतील. त्यामुळे 40 हेक्‍टर जमीन वाचणार असून त्यावरील नैसर्गिक संपत्तीचेही जतन होणार आहे. 

"सेव्ह आरे'च्या लढ्याचे यश 
मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय "सेव्ह आरे'च्या लढ्याला मिळालेले यश असल्याची प्रतिक्रिया सेव्ह आरे मोहिमेच्या झोरू बाथेना यांनी दिली. मेट्रो कारशेड आरेमधून कांजूरमार्गला हलवण्याचा प्रस्ताव तांत्रिक समितीने पाच वर्षांपूर्वीच दिला होता. त्याला आता मान्यता मिळाली आहे, असे ते म्हणाले. 
--------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Happy to save Mumbais lungs Environmentalists welcome Kanjur Carsheds decision

टॉपिकस