भाजपचा कट्टर नेता शिवसेनेत, समीर देसाईंच्या येण्याने गोरेगावात सेना होणार अधिक ताकदवान ?

कृष्ण जोशी
Thursday, 28 January 2021

"गोरेगावात लोकांच्या मनात अजूनही शिवसेना कायम आहे. मी आतापर्यंत शिवसेनेचा कट्टर विरोधक होतो"

मुंबई गोरेगावच्या पश्चिम भागातून सध्यातरी नामशेष झालेल्या शिवसेनेला भाजपमधून आलेले ताकदवान नेते समीर देसाई यांच्यामुळे नवसंजीवनी मिळेल का, या महत्वाच्या प्रश्नाचे पहिले उत्तर वर्षभराने होणाऱ्या महापालिका निवडणुकीत पहायला मिळणार आहे. 

काँग्रेस, भाजप ते शिवसेना असा प्रवास केलेल्या माजी नगरसेवक समीर देसाई यांच्यात प्रवाहाविरुद्ध जाऊन मते खेचण्याची ताकद आणि क्षमता नक्कीच आहे. काँग्रेस व भाजपमध्ये असताना त्यांनी हे सिद्ध केले आहे. आता स्वतःसह शिवसेना व काँग्रेसचे एकत्रित बळ वापरून भाजपवर मात करण्याचे शिवधनुष्य ते पेलू शकतात का, हे पहाणे लक्षवेधी ठरेल. तसे झाले तर भविष्यात त्यांना गोरेगावचे नेतृत्व करण्याची संधी मिळू शकते. 

महत्त्वाची बातमी : "असे येडे बरळतच असतात"; लक्ष्मण सावदी यांच्या वक्तव्यानंतर संजय राऊत कडाडले

देसाई यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह कालच शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या पत्नी राजूल देसाई या सध्या भाजपच्या नगरसेविका असून त्या वर्षभराने महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश करतील अशी शक्यता आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांचा पराभव झाल्यावर गोरेगावात शिवसेनेची घसरगुंडी झाली व अडीच वर्षांनी झालेल्या महापालिका निवडणुकीत येथे शिवसेनेला आस्मान दाखवीत सर्वच्या सर्व म्हणजे पाचही नगरसेवक भाजपचे निवडून आले. त्यातच आता सुभाष देसाई हे निवृत्तीच्या मनस्थितीत असल्याने सेना नेतृत्वाने ही पोकळी भरून काढण्यासाठी देसाई यांच्या नावाचा विचार केला आहे.  

गोरेगावात लोकांच्या मनात अजूनही शिवसेना कायम आहे. मी आतापर्यंत शिवसेनेचा कट्टर विरोधक होतो, तरीही पक्षवाढीसाठी सुभाष देसाई व उद्धवजी यांनी मला दिलेल्या संधीबद्दल मी त्यांचा आभारी आहे. या संधीचा उपयोग मी जनसेवेसाठी व पक्षवाढीसाठी निश्चितच करेन

- समीर देसाई.

गोरेगाव पूर्वेला गजानन कीर्तीकर यांच्याबरोबर सुनील प्रभू, अमोल कीर्तीकर आदींची दुसरी फळी सज्ज आहे. गोरेगाव पश्चिमेला मात्र सुभाष देसाईंबरोबर समर्थ अशी दुसरी फळी नाही. दीपक सुर्वे किंवा पाचवेळा नगरसेवक राहिलेले दिलीप शिंदे यांच्यावरही मर्यादा असल्याने आता येथे सेनेची अवस्था डळमळीत झाली आहे. त्यामुळे तसे पाहिले तर समीर देसाई यांना आता स्वतःची व शिवसेनेची ताकद वाढविण्याची मोठी संधी आली आहे. महापालिका निवडणुकीत त्यांनी ताकद दाखवून शिवसेनेचे दोन-तीन नगरसेवक निवडून आणले तर 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठीही त्यांचा विचार होऊ शकतो. 

सध्या भाजप आमदार विद्या ठाकूर यांच्या राजवटीत गोरेगावच्या मूलभूत समस्या फार सुटल्याचे चित्र नाही. गोरेगावात दोन उड्डाणपूल सुरु झाले, प्रसूतिगृहाचे नूतनीकरण झाले व टोपीवाला मंडई-नाट्यगृहाचे काम सुरु झाले. मात्र एसव्ही रोड, स्टेशन रोड येथे अरुंद रस्त्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी, रेल्वे स्टेशनवरील अवैध फेरीवाले, लिंकरोड पलिकडील अवाढव्य झोपड्यांमुळे अडलेले खाडीपट्ट्यातील नाले व त्यामुळे पावसात सखल भागात साचणारे पाणी, हे प्रश्न तसेच असल्याने नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे अजूनही काँग्रेसच्या युतीत शिवसेनेने चांगला पर्याय दिल्यास येथे भाजपचा पराभव होऊ शकतो.

लोकल ट्रेनबाबत मोठी बातमी ! 1 फेब्रुवारीपासून सर्वसामान्य मुंबईकरांना मिळणार लोकल ट्रेन प्रवासाची मुभा ?

तसा मध्यमवर्गीयांचे प्राबल्य असलेला गोरेगाव हा मतदारसंघ परंपरागत काँग्रेसविरोधी आहे. प. बा. सामंत, कमल देसाई हे पूर्वेचे नेते तर पश्चिमेला मृणाल गोरे, शरद राव, रमेश जोशी या समाजवाद्यांचे वर्चस्व असलेला हा बालेकिल्ला त्यांच्या हातून 1990 मध्ये निसटला. शिवसेनेने हा भाग त्यांच्या हातून हिसकावून घेतल्यानंतर येथील जनता दलाचे अस्तित्व कायमचे संपले. आता 2014 मध्ये भाजपने हा मतदारसंघ शिवसेनेकडून हिसकावून घेतल्यानंतर सध्यातरी येथील शिवसेनेचे अस्तित्व संपल्याचे चित्र आहे. शिवसेना व काँग्रेस यांची युती झाली तर येथे शिवसेनेला पुन्हा निम्मेतरी वर्चस्व मिळवण्याची संधी आहे. शिवसेना लाटेतही समीर देसाई काँग्रेसतर्फे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तर नंतरच्या महापालिका निवडणुकीत त्यांनी शेजारच्या मतदारसंघातून निसटता पराभव स्वीकारण्यापूर्वी सेनेच्या उमेदवाराला जोरदार लढत दिली होती. गोरेगावात जनता दलानंतर आता शिवसेनादेखील संपुष्टात आली ही इतिहासाची पुनरावृत्ती समीर देसाई बदलू शकतील का याचे उत्तर लवकरच मिळेल. 

hardcore shivsena hater sameer desai joins shivsena will party gain votes in BMC election


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hardcore shivsena hater sameer desai joins shivsena will party gain votes in BMC election