आचारसंहितेमुळे शेतकरी वाऱ्यावर; कापलेली पिके हातातून गेली

शामकांत पतंगराव
रविवार, 20 ऑक्टोबर 2019

- आचारसंहितेमुळे शेतकरी वाऱ्यावर
- कापलेली रोपे पावसात भिजली
- पीक हातातून गेल्याने शेतकरी नाराज

किन्हवली (ठाणे) : शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागात सराईच्या  हंगामात दोन दिवसापासून पाऊस पडत असल्याने कापलेली भात रोपे भिजून ती कुजण्याच्या अवस्थेत आहेत.हाता तोंडाशी आलेला घास या अस्मानी संकटाने हिरावून घेतल्याने शेतकरी धास्तावला आहे.

शहापूर तालुक्यात १४ हजार हेक्टर भू क्षेत्रात भात पिकाचे उत्पादन घेतले जाते. या वर्षी तरी आपल्या पदरी विना संकट भात पीके पडतील अशी अपेक्षा असताना ऐन सराई सुगीच्या हंगामात पाऊस पडू लागल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. भात पिकाला पूरक असा पाऊस झाल्याने गेली कित्येक वर्षांत शेतकऱ्यांना बघायला मिळाले नव्हते असे दर्जेदार पीक आले होते.सहा सात दिवस पावसाने उघडीप दिल्याने सराईच्या म्हणजे भात कापणीच्या हंगमास सुरुवात झाली होती.

पेरणीपासून120 ते 130 दिवसांनी पिकणाऱ्या गरवा प्रकाराच्या भाताच्या प्रजातीसाठी पाण्याची थोडीफार गरज असली तरी 100 ते 110 दिवसांनी पिकणाऱ्या हलवार जातीसाठी पाणी गरजेचे नाही. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी सोसायटीचे कर्ज काढून बि-बियाणे व खते विकत आणून शेती लावली आहे परंतू कापलेली भात रोपे डोळ्यादेखत पाण्यावर तरंगत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. तोंडावर आलेला दिवाळीच्या सणातील गोड घास सुद्धा कडू लागणार आहे.

विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे शासकीय यंत्रणा कामात व्यस्त असल्याने शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडले असून झालेल्या नुकसानीचे पंचनामे कोण करेल? असा सवाल शेतकरी करत आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे कृषि कार्यालयातील सर्व कर्मचारी निवडणूक कर्तव्यावर असून पंचनामे करून वरिष्ठांना अहवाल देणे अशक्य आहे. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान दुर्दैवी आहे. - दिलिप कापडणीस कृषी अधिकारी, शहापूर

"अचानक आलेल्या पावसाच्या संकटाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. कापलेली रोपे भिजून पेंढा काळा पडेल व भाताचे दाणे कुजणार असल्याने निवडणुकीनंतर तरी पंचनामे व्हावेत" - भाऊ बर्डे, प्रगतशील शेतकरी बर्डेपाडा (किन्हवली)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: harvested crops loss due to raining