एचडीएफसी बँकेचा एकत्रित नफा ९५७९ कोटी रुपये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

HDFC Bank

एचडीएफसी बँकेचा एकत्रित नफा ९५७९ कोटी रुपये

मुंबई - खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेने एप्रिल ते जून तिमाहीत ९,५७९ कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा नोंदविला असून मागीलवर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत तो २०.९ टक्के जास्त आहे.

बँकेने आज आपले तिमाही निकाल जाहीर केले. बँकेचा तिमाहीतील महसूल २७,१८१ कोटी रुपये असून त्यात १९.८ टक्के वाढ झाली आहे. या तिमाहीत बँकेला १९,४८१ कोटी रुपये व्याजापोटी मिळाले, या रकमेतही गेल्यावर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत साडेचौदा टक्के वाढ झाली आहे.

बँकेच्या उपकंपन्या वगळता फक्त एचडीएफसी बँकेचा या तिमाहीतील निव्वळ नफा ९,१९६ कोटी रुपये (१९ टक्के वाढ) आहे. बँकेच्या ठेवी १६ लाखकोटी रुपयांवर (१९.२ टक्के वाढ) गेल्या असून कर्जेही १४ लाखकोटी रुपयांवर (२१.६ टक्के वाढ) गेली आहेत. या तिमाहीत किरकोळ कर्जांमध्ये २१.७ टक्के तर व्यापारी-ग्रामीण कर्जांमध्ये २८.९ टक्के वाढ झाली. कंपन्यांना दिलेली कर्जेही १५.७ टक्के वाढली.

बेसिल तीन निकषांनुसार बँकेचा सीएआर (कॅपिटल अॅडिक्वसी रेशो) १८.१ टक्के असून ग्रॉस एनपीए १.२८ टक्के तर नेट एनपीए कर्जांच्या ०.३५ टक्के आहे. बँकेच्या देशभरातील एकूण शाखांची संख्या ६,३७८ असून १८,६२० एटीएम केंद्रे आहेत. गेल्या बारा महिन्यांत बँकेने ७२५ शाखा उघडल्या असून २९ हजार नवे कर्मचारी नियुक्त केले.

Web Title: Hdfc Banks Consolidated Profit Is Rs 9579 Crore

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..