चला तर हरवूया कोरोनाला, आरोग्यमंत्री टोपेंचं जनतेला पत्रातून भावनिक आवाहन

भाग्यश्री भुवड
Monday, 22 February 2021

राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेला कोरोनाविषयी खबरदारी घेण्याबाबत पत्र लिहिलं आहे. चला तर हरवूया कोरोनाला असे भावनिक आवाहन आरोग्यमंत्री टोपेंनी जनतेला केले आहे.

मुंबई: राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेला कोरोनाविषयी खबरदारी घेण्याबाबत पत्र लिहिलं आहे. चला तर हरवूया कोरोनाला असे भावनिक आवाहन आरोग्यमंत्री टोपेंनी जनतेला केले आहे. या पत्राद्वारे त्यांनी राज्यातील जनेतला धीर देत सतर्क राहण्याचे त्यासोबतच इशारा दिला आहे.

राज्यात कोरोनाने पुन्हा हात पाय पसरले असून सरकारमधील अनेक मंत्रीही कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. यातच आरोग्यमंत्री राजेश टोपे हे देखील गेले चार दिवस रुग्णालयात कोरोनाविरोधात उपचार घेत आहेत.  त्यामुळे, टोपे यांनी रुग्णालयातूनच राज्यातील जनतेला उद्देशून पत्र लिहिलं असून कळकळीचं आवाहन केलं आहे. मुंबई-पुण्यासह इतर जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसलर्ग झपाट्याने होत आहे. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा लॉकडाऊनचा इशारा दिला आहे. मात्र, जर लॉकडाऊन टाळायचा असेल तर राज्यातील जनतेने सहकार्य अत्यंत आवश्यक असल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे.

आपल्याला सामूहिक लढाई लढायचीय
 
राजेश टोपे यांनी पत्रात लिहलं आहे की, गेल्या वर्षभरापासून आपण कोरोना विरुद्धची लढाई लढत आहोत. शासनाची खंबीर भूमिका, ठोस उपाययोजना आणि प्रामाणिक प्रयत्न, जीवाची पर्व न करता लढणारे अनेक कोरोना योद्धे, डॉक्टर, नर्सेस, आरोग्यसेवक, पोलिस, स्वच्छता कामगार यांच्यामुळे आपण कोरोना नियंत्रित करु शकलो. मात्र, अद्यापही कोरोना गेलेला नाही. तो पुन्हा डोके वर काढत आहे. तेव्हा पुन्हा एकदा सामूहिक लढाई लागणार आहे, असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

कोरोना योध्यांचे कौतुक करतानाच आरोग्यमंत्र्यांनी पुढील कोरोना संकटाबद्दलही नागरिकांना आवाहन केलं आहे. अद्याप कोरोना गेला नाही आहे. तो पुन्हा डोकं वर काढत आहे. तेव्हा पुन्हा एकदा सामुहिक लढाई लढावी लागणार आहे. मी सध्या रुग्णालयात कोरोनाविरुद्ध लढतो आहे. गेल्या वर्षभरापासून कोरोना विषाणू माझा पाठलाग करत होता. मी राज्यातील अनेक भागात गेलो, कोरोना हॉटस्पॉटला भेटी दिल्या. मात्र कोरोनाला माझ्या जवळ येणे जमले नाही, पण अखेर त्याने मला गाठलेच. मात्र आपल्या सदभावना, प्रेम यामुळे त्याला हरवून पुन्हा एकदा कोरोना विरुद्धच्या सामूहिक लढाईत सहभागी होणार आहे,' असेही पत्रात त्यांनी नमूद केले आहे.

हेही वाचा- केंद्र सरकारचं महाराष्ट्र, मुंबईवर प्रेम; कोविन अॅपवरुन महापौरांची टीका
समजदार,सवेंदनशील आणि सहकार्य करणारे लोक

आरोग्यमंत्र्यांनी पत्रात पुढे, समजदार, संवेदनशील आणि सहकार्य करणारे लोक ही आपल्या राज्याची ओळख आहे. म्हणूनच लॉकडाऊन काळात सर्व जनतेने कोरोना संकटाचा सामना अत्यंत संयमाने केल्याचं आपण पाहिले. मात्र, आता पुन्हा लॉकडाऊन परवडणारे नाही. लॉकडाऊन टळणं केवळ आणि केवळ आपल्याच हातात आहे. मास्क सॅनिटायझर आणि सुरक्षित अंतर, तंतोतंत पाळा आणि लॉकडाऊन टाळा, असं आवाहन राजेश टोपेंनी केले आहे. एकजुटीनं, एकमतानं, एकनिर्धारानं कोरोनाला हरवूया, असं आवाहन राजेश टोपेंनी केले आहे.

राजेश टोपे यांना कोरोना संसर्ग

आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी 18 फेब्रुवारीला ट्विटरवरुन कोरोना झाल्याची माहिती दिली. “माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईल. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणे दिसल्यास तात्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी”,असं राजेश टोपे ट्विटरवरुन सांगितले होते. मात्र आज त्यांनी रुग्णालयातूनच राज्यातील जनतेला पुन्हा एकदा सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

---------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Health Minister Rajesh Tope Wrote emotional letter and appeal State people


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Health Minister Rajesh Tope Wrote emotional letter and appeal State people