नवी मुंबईत स्वाईन फ्ल्युचा पहिला बळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

health news First victim of swine flu in Navi Mumbai

नवी मुंबईत स्वाईन फ्ल्युचा पहिला बळी

नवी मुंबई : शहरात कोविडसोबत स्वाईन फ्ल्यूचे प्रमाणही वाढू लागले आहे. गेल्या आठवड्यात स्वाईन फ्ल्यूची बाधा झालेल्या नेरूळ येथील एका रुग्णाचा दोन दिवसांपूर्वीच मृत्यू झाला आहे. हा रुग्ण स्वाईन फ्ल्यूबाधित होता; परंतु नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने त्याच्या मृत्यूची अद्याप खातरजमा केलेली नाही. त्यामुळे सणासुदीच्या काळात स्वाईन फ्ल्यूसोबत कोविड आणि व्हायरल तापाचे रुग्णही वाढू लागल्यामुळे पालिकेच्या डोकेदुखी वाढणार आहे. गोपाळकाला, नारळीपौर्णिमा, गणेशोत्सव अशा गर्दी जमवणाऱ्या सणात कोविडसारख्या आजारांची भीती असताना स्वाईन फ्ल्यूसुद्धा वाढत आहे.

नवी मुंबई शहरात स्वाईन फ्ल्यूच्या तब्बल २४ रुग्णांची नोंद झाली आहे. अशा परिस्थितीत एका रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे धाबे दणाणले आहेत. आरोग्य विभागाने शहरातील नागरिकांना स्वाईन फ्ल्यू प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यास सुरुवात केली आहे. गोरदर माता, रक्तदाब व मधुमेह असणारे रुग्ण, आरोग्य कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक आदी नागरिकांना स्वाईन फ्ल्यू प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यास सुरुवात केली आहे. शहरातील वाढते स्वाईन फ्ल्यू लक्षात घेता महापालिकेने तब्बल ९ हजार डोस खरेदी केले आहेत. त्यापैकी २५४ लोकांना डोस दिले आहेत. उर्वरित ८ हजार ७४६ डोस देण्याचे काम आरोग्य विभागातर्फे सुरू आहे.

आरोग्य विभागापुढे तिहेरी संकट

काही दिवसांपासून शहरातील कोविड रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. सध्या शहरात ५० पेक्षा जास्त कोरोना रुग्ण सक्रिय आहेत. त्यामुळे महापालिकेकडून कोविड चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात आले आहे. पालिकेच्या नागरी आरोग्य केंद्र व रुग्णालयात कोविड चाचण्या केल्या जात आहेत. तसेच शहरात व्हायरल सर्दी-तापाची देखील साथ सुरू आहे. महापालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रात आणि रुग्णालयात सर्दीने बेजार नागरिक, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक येत असल्याने पालिकेच्या आरोग्य विभागापुढे तिहेरी संकट ओढावले आहे.

ग्रामीण भागांना सर्वाधिक धोका

नवी मुंबई शहरासोबत नजीकच्या ग्रामीण भागात स्वाईन फ्ल्यूचे प्रमाण वाढत आहे. ठाणे जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच रायगड जिल्ह्यातही स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांच्या नोंदी होताना समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वीच पेण येथील एका स्वाईन फ्ल्यू बाधित महिलेचा नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात मृत्यू झाला. हे ताजे असताना रोहा तालुक्यातील स्वाईन फ्ल्यूबाधित रुग्णाला पनवेलच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते.

निर्बंधमुक्त सणांमुळे भीती

कोविडचे रुग्ण कमी झाल्यामुळे तत्कालीन मविआ सरकारने कोविडचे निर्बंध कमी केले होते. आता विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वच सणांवरचे निर्बंध मागे घेतले आहेत. त्यामुळे गोपाळकाला, नारळीपौर्णिमा आणि गणेशोत्सवाला भरगच्च गर्दी होणार आहे. सध्या वाढत असलेला स्वाईन फ्ल्यू आणि मंकीपॉक्ससारख्या गंभीर साथीच्या आजारांना सणानिमित्त होणारी ही गर्दी पोषक ठरणार आहे. अशात स्वाईन फ्ल्यू आणि कोविडचे पुन्हा होत असलेली रुग्णवाढीने प्रशासन सतर्क झाले आहे.

कोविड रुग्णांसोबत स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्या अनुषंगाने आरोग्य विभागाने स्वाईन फ्ल्यू लसीकरणाचा वेग वाढवला आहे. या दोन साथीच्या आजारांसोबत व्हायरल तापाचे रुग्णही दिसून येत आहेत. त्या दृष्टिकोनातून खबरदारी आणि उपाययोजना करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत.

- अभिजीत बांगर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका

Web Title: Health News First Victim Of Swine Flu In Navi Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..