कोरोनाग्रस्त पित्याच्या मृत्यूचे वृत्त कळताच मुलानेही सोडला प्राण; नवीन पनवेलमधील घटनेने हळहळ

दीपक घरात
Thursday, 20 August 2020

कोव्हिडमुळे अतिदक्षता विभागात असलेल्या पिता पुत्राचा दुर्दैवी अंत होण्याची घटना पनवेल मधील एम जी एम रुग्णालयात घडली आहे.

पनवेल - कोव्हिडमुळे अतिदक्षता विभागात असलेल्या पिता पुत्राचा दुर्दैवी अंत होण्याची घटना पनवेल मधील एम जी एम रुग्णालयात घडली आहे. कोरोनाची लागण झालेल्या व नवीन पनवेलमध्ये वास्तव्यास आलेल्या 70 वर्षीय सीताराम तांबे यांचे मंगळवारी (ता.18)रोजी रात्री 2 च्या सुमारास कोरोनामुळे निधन झाले. वडिलांचे निधन झाल्याचे वृत्त सीताराम यांचा 40 वर्षीय मुलगा शशेंद्र तांबे यांना कळताच एम जी एम रुग्णालयातच कोरोनावर उपचारासाठी दाखल असलेल्या शशेंद्र यांचे देखील हृदयविकाराच्या झटक्याने बुधवारी (ता.19) सकाळी 12 च्या सुमारास निधन झाले. केवळ काही तासांच्या अंतराने पिता पुत्राच्या झालेल्या मृत्यू मुळे परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

कल्याणमधील नवीन पत्रिपुलाच्या गर्डर टाकण्याच्या कामाला सुरूवात; इतक्या दिवसांत पुर्ण होणार काम

शशेंद्र यांचे वडील सिताराम हे काही वर्षांपूर्वी मुबंई महापालिकेतून निवृत्त झाले होते तर पनवेल परिसरातील कोचिंग क्लासमध्ये शिक्षकाची नोकरीं करून आपला उदरनिर्वाह करणारे शशेंद्र यांच्या मागे पत्नी व दोन लहान मुले असा परिवार आहे. कोरोना आजारामुळे अनेक ठिकाणच्या कुटुंबांवर उध्वस्त होण्याची वेळ आली असून, कुटुंबातील कर्ते पुरुष गेल्याने अनेकांवर दुःखाचे सावट कोसळले आहे.

अंत्यविधी करिता उकळले 6 हजार

पनवेल पालिकेमार्फत करोना मयतावर अंत्यविधी करण्यासाठी नवीन पनवेल येथील पोदी येथे व पनवेल शहरातील अमरधाम येथे अंत्यविधी ची व्यवस्था करून देण्यात आलेली आहे. दोन्ही ठिकाणी असलेल्या विद्युत शव दाहिन्या खाजगी संस्थे मार्फत चालवल्या जात असून विद्युत दाहिनीवरील अंत्यविधी करिता पोदी येथे 2500 तर अमरधाम येथे 2000 रुपये रक्कम आकारण्यात येते तर विद्युत दाहिनीत बिघाड झाल्यास लाकडावरील अंत्यविधी करिता 5 हजार रुपये आकारले जातात तांबे कुटुंबियांच्या मृत्यू नंतर सीताराम यांच्यावरील अंत्यविधी करिता 6 हजार रुपये आकारण्यात आले आहेत l.

-----------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hearing the news of the death of the corona affected father, son also die