राज्यात उकाडा वाढणार, हवामान विभागाचा इशारा

राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा तापमान २ ते ३ अंशांनी वाढणार
heat
heatsakal

मुंबई : काही दिवस राज्यातील तापमानाचा पारा थोडा खाली आला होता, परंतु आता पुन्हा एकदा उकाड्याचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील काही भागांत उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे तापमानात दोन ते तीन अंशांची वाढ होण्याची शक्यता आहे.

विदर्भात पुढील तीन दिवस म्हणजे २८ ते ३० मार्चदरम्यान उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. अमरावती, चंद्रपूर, अकोला, यवतमाळ आदी जिल्ह्यांमधील कमाल तापमान वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. गेल्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे राज्यात पावसाळी स्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, नागरिकांची उन्हाच्या काहिलीपासून सुटका झाली होती; पण आता काही दिवस पुन्हा उन्हाचे चटके जाणवणार आहेत.

उत्तरेकडील राज्यांमध्ये उष्णतेची लाट आली आहे. उष्ण वाऱ्यांचा प्रभाव म्हणून रविवारी गुजरातमध्ये चांगल्याच झळा जाणवत होत्या. उष्णतेच्या लाटेचा प्रभाव मध्य प्रदेशपर्यंत जाणवणार असून राज्यातील काही भागांना याचा फटका बसणार आहे. या भागातील कमाल तापमान ४४ ते ४५ अश सेल्सिअसवर जाण्याची शक्यता आहे.

राज्यातील कमाल तापमान

  • अकोला : ४२.३

  • अमरावती : ४१.४

  • परभणी : ४१.२

  • वाशीम : ४१.०

  • सोलापूर : ४०.२

मुंबईवर परिणाम नाही

राज्यातील काही भागांत उष्णतेची लाट येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असला तरी मुंबईत मात्र त्याचा परिणाम जाणवणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. मुंबईतील तापमान किंचित वाढणार असले तरी उष्णतेच्या लाटेची शक्यता सध्या तरी नाही. आज कुलाब्यात ३२.५ आणि सांताक्रूझमध्ये ३३.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मुंबईतील परिस्थिती पुढील काही दिवस स्थिर राहण्याचा अंदाज आहे.

येत्या पाच दिवसांत महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांमध्ये काही ठिकाणी उष्णतेची लाट जाणवेल. देशभरातील उष्णतेच्या लाटेचा हा परिणाम आहे; पण यामुळे घाबरू नका. काळजी घ्या.

- डॉ. के. एस. होसाळीकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ, हवामान विभाग.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com