Rain News : मुसळधार पावसाचा अधिवेशनालाही फटका;कामकाज दिवसभरासाठी स्थगित,सर्व प्रकारची वाहतूक विस्कळित

रविवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाचा फटका मुंबईला बसून जनजीवन विस्कळित झाल्याने सोमवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.
Rain News
Rain Newssakal

मुंबई : रविवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाचा फटका मुंबईला बसून जनजीवन विस्कळित झाल्याने सोमवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. रेल्वे, रस्ते आणि विमान वाहतूकही कोलमडल्याने मतदारसंघात गेलेल्या मंत्री व आमदारांना देखील पावसाचा दणका बसला.

रेल्वे ट्रॅकमधून चालण्याचा आणि ट्रॅाफिकमध्ये अडकून पडण्याचा सामान्य मुंबईकरांच्या वाटेला नेहमीच येणारा ‘तुंबई’चा अनुभव आज मंत्र्यासंत्र्यांच्याही वाटेला आला. नाशिक शिक्षक मतदारसंघातून निवडून आलेले शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर दराडे यांना आज विधान परिषदेत आमदारकीची शपथ दिली जाणार होती. मात्र ते पोहोचण्यापूर्वी विधान परिषदेचे कामकाज स्थगित करण्यात आल्याने दराडे यांना आता उद्या शपथ दिली जाईल. पावसाचा अंदाज लक्षात घेऊन मुंबईतील कर्मचाऱ्यांना सुखरूप घरी जाता यावे म्हणून हा निर्णय घेण्यात आला. विधानसभा आणि विधान परिषद दिवसभरासाठी स्थगित केल्यानंतर मंत्रालय तसेच मुंबईतील सर्व शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना आज दुपारी तीननंतर कार्यालय सोडण्याची अनुमती देण्यात आली.

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यातील कामकाजाला आज सकाळी सुरुवात झाली. मात्र, रविवारी रात्रीपासून सुरु झालेल्या पावसाने मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचून सार्वजनिक वाहतुकीचा बोऱ्या वाजला. त्यामुळे जनजीवन विस्कळित झाले. मुंबईची स्थिती लक्षात घेता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात येत असल्याचे घोषित केले. विधिमंडळात आलेल्या अधिकारी- कर्मचाऱ्यांना सध्याच्या परिस्थितीत सुखरूप घरी जाता यावे यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे नार्वेकर यांनी सांगितले. विधान परिषदेतही आज प्रश्नोत्तराच्या तासानंतर कामकाज स्थगित करण्यात आले. दरम्यान, सभागृहाचे संपूर्ण कामकाज होण्यासाठी आणखी एक दिवस अधिवेशनाचा कालावधी वाढवावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज केली.

दरम्यान, भारतीय हवामान खात्याने आज मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविल्यानंतर राज्य सरकारने मंत्रालय तसेच मुंबईतील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी जे रेल्वेने दूरचा प्रवास करतात अशांना आज दुपारी तीन वाजता कार्यालय सोडण्याची अनुमती देण्यात आली. सामान्य प्रशासन विभागाने तातडीने तसा शासन आदेश जारी केला. त्यामुळे आज दुपारनंतर मंत्रालयात शुकशुकाट होता.

नालेसफाई कामाची श्वेतपत्रिका काढा : शेलार

ज्यावेळी सर्व लोकप्रतिनिधी लोकसभा निवडणुकीच्या कामात होते, त्यावेळी पालिका अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्यामुळे मुंबईतील मोठे नाले, छोट्या गटारांची सफाई कंत्राटदाराने योग्य केली नाही. नाल्यातील गाळ पूर्ण  निघाला नाही. तसेच काढलेला गाळ उचलला गेला नाही. आम्ही त्यावेळी नालेसफाई कामाचा दौरा करुन ही बाब पालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतरही कामे झाली नाहीत. त्यामुळे राज्य सरकारने मुंबईच्या नालेसफाईच्या कामाची श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी भाजप आमदार आशिष शेलार यांनी आज विधानसभेत केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com