MumbaiRains : मुंबईला झाली '26 जुलै'ची आठवण; सगळीकडे पाणीच पाणी

वृत्तसंस्था
शनिवार, 27 जुलै 2019

मुंबई शहरासह उपनगरात काल सायंकाळपासून पाऊस कोसळत आहे. पावसामुळे अनेक भागात पाणी साचले आहे. डोंबिवलीमध्ये रात्रीपासून वीजपुरवठा खंडीत झालेला आहे. तर, वांगणी ते बदलापूर दरम्यान रेल्वे रुळावर पाणी आल्याने महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकून पडली आहे. एनडीआरएफचे जवान मदतीसाठी गेले आहेत. पावसाचा थेट फटका विमान वाहतुकीलाही बसला असून, सुमारे 11 उडाणे रद्द करण्यात आली आहेत. 

मुंबई : मुंबईत शुक्रवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या धुवाधार पावसाने एका तपापूर्वीच्या '26 जुलै'ची आठवण करून दिली आणि मुंबईकरांच्या काळजाचा ठोका पुन्हा एकदा चुकला. अर्ध्या तासातच अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला असून, अद्यापही अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. तर, पावसाचा थेट परिणाम रेल्वे, रस्ते आणि विमान वाहतुकीवर झाला आहे. 

मुंबई शहरासह उपनगरात काल सायंकाळपासून पाऊस कोसळत आहे. पावसामुळे अनेक भागात पाणी साचले आहे. डोंबिवलीमध्ये रात्रीपासून वीजपुरवठा खंडीत झालेला आहे. तर, वांगणी ते बदलापूर दरम्यान रेल्वे रुळावर पाणी आल्याने महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकून पडली आहे. एनडीआरएफचे जवान मदतीसाठी गेले आहेत. पावसाचा थेट फटका विमान वाहतुकीलाही बसला असून, सुमारे 11 उडाणे रद्द करण्यात आली आहेत. 

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे मोडक सागर तलाव ओसंडून वाहू लागला. मुंबईला पाणी पुरवणाऱ्या प्रमुख सात तलावांत मोडक सागरला महत्त्वाचे स्थान आहे. तलाव भरू लागल्यामुळे मुंबईकरांवरील पाणीसंकट दूर होण्याची सुचिन्हे दिसत आहेत. राज्यात तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून, मुंबईसह उपनगरांतही जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. 

कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर या परिसरात पावसाचा जोर कायम राहिल्याने अनेक सखल भागात पाणी साचले आहे. बदलापूर, अंबरनाथ रेल्वे रुळावर पाणी साचल्याने लोकल सेवा थांबविण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला होता. पाण्याचा निचरा करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा रात्रीपासून कामाला लागली आहे. 

मुख्याध्यापकांनी घ्यावा शाळांबाबत निर्णय
पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याने शाळा सुरु ठेवण्याबाबत मुख्याध्यापकांनी निर्णय घ्यावा, असे ट्विट शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी केले आहे. पावसाचा अंदाज अंदाज घेऊन शाळांना सुटी देण्याचा निर्णय घ्या, असे त्यांनी म्हटले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heavy rainfall in Mumbai railway service affected