पालघरमध्ये परतीच्या पावसाने शेतकरी हवालदिल, उभे पिके आडवी

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 15 October 2020

पालघर जिल्ह्यात परतीच्या पावसाने खरीपाच्या पिकांची पूर्णपणे वाट लावली आहे. पालघर जिल्ह्यात परतीचा पाऊस सतत  कोसळत आहे. जिल्ह्यात खरीपाच्या पीकाच्या काढणीचा हंगाम सुरू आहे. तर काही भागात पीक काढून खळ्यावर आणले जात आहे.

मुंबईः पालघर जिल्ह्यात परतीच्या पावसाने खरीपाच्या पिकांची पूर्णपणे वाट लावली आहे. पालघर जिल्ह्यात परतीचा पाऊस सतत  कोसळत आहे. जिल्ह्यात खरीपाच्या पीकाच्या काढणीचा हंगाम सुरू आहे. तर काही भागात पीक काढून खळ्यावर आणले जात आहे. रोजच कोसळत असलेल्या पावसाने पीक शेतात आणि खळ्यात कुजून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेले पीक वाया जाण्याच्या भीतीने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली जात आहे. 

पालघर जिल्ह्यात एकूण क्षेत्रफळाच्या  1 लाख  5  हजार हेक्टर खरीप शेतीचे क्षेत्र आहे. यामध्ये  75  हजार हेक्टर भात,  15  हजार हेक्टर नागली आणि  10  हजार हेक्टर वरई आणि ऊर्वरित क्षेत्र ईतर पीकाचे आहे. जिल्ह्यात भात, नागली आणि वरई हे मुख्य पीके घेतली जातात. यावर्षी भाताचे पीक चांगले बहरले होते. काढणीचा हंगाम ही सुरू झाला आणि परतीचा मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे शेतात कापून ठेवलेले आणि काढून खळ्यावर आणलेले पीक भिजून गेले आहे. मात्र, रोजच पाऊस कोसळत असल्याने हे पीक कुजण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेले पीक वाया जाणार असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. 

जिल्ह्यातील अतिदुर्गम जव्हार, मोखाडा या अतिदुर्गम तालुक्यांमध्ये केवळ खरीपाचेच पीक घेतले जाते. या पीकावरच येथील आदिवासींची वर्षभर गुजराण होते. मात्र, आता हे पीक वाया जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने येथील आदिवासींवर ऊपासमार ओढावण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आदिवासी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष आणि मोखाडा पंचायत समिती सदस्य प्रदिप वाघ यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्याकडे केली आहे.

वाडा तालुक्यात भातपिकांचे आतोनात नुकसान

गेल्या दोन तीन दिवसांपासून मेघ गर्जनासह वाडा तालुक्यात  जोरदार पावसामुळे येथील शेतकऱ्यांचे कापणी केलेल्या भातपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. तालुक्यात भाताचे पीक तयार होऊन त्याची कापणी सुरू झाली आहे, मात्र दोन तीन दिवस सतत संध्याकाळी अचानक जोरदार पाऊस पडल्याने भात कापणी झालेल्या शेतात पाणी साचल्याने भात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. कापणी झालेले भात पिक शेतातच गळून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने येथील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

विक्रमगडमध्ये उभे पिके झाली आडवी

काल दिवसभर विक्रमगड आणि परिसरात मुसळधार पाऊस झाला.  शेतामध्ये कापून ठेवलेल्या हळवे भात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तर कापणीस आलेले गरवे भातपिक आडवे पडले आहे. विक्रमगड तालुक्यातील आलोंडे, शिळ, सजन, ओंदे, म्हसरोली, कुरंझे, मलवाडा आणि इतर परिसरात मोठे नुकसान शेतकऱ्यांचे झाले आहे.  शेवटच्या परतीच्या पावसाने ऐन कापणीच्या भातशेतीचे पुरते वाटोळे लावले असून या शेतीचे त्वरित पंचनामे करण्याची मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.

-----------------------

(संपादनः पूजा विचारे)

Heavy rains in Palghar district Major damage rice crop


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rains in Palghar district Major damage rice crop