आता काय बोलणार! सायन हायवेवर सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा

सकाळ वृत्तसेवा 
Monday, 1 June 2020

आज सोमय्या मैदानाजवळ नव्यानं घाऊक भाजी मार्केट सुरु करण्यात आलं. यासाठी भाजीचे ट्रक तसंच अन्य वाहने मोठ्या प्रमाणात आले. वाहनं एकत्र आल्यानं या हायवेवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. एएनआय या वृत्तसंस्थेनं या वाहतूक कोंडीचे फोटो शेअर केलेत.

 

मुंबई- आजपासून लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. या टप्प्यात अनेक सवलती देण्यात आल्यात. दरम्यान आताच समोर आलेल्या माहितीनुसार, सायन हायवेवर लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा वाजले आहेत. आज सकाळी सायन हायवेवर मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. आज सोमय्या मैदानाजवळ नव्यानं घाऊक भाजी मार्केट सुरु करण्यात आलं. यासाठी भाजीचे ट्रक तसंच अन्य वाहने मोठ्या प्रमाणात आले. वाहनं एकत्र आल्यानं या हायवेवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. एएनआय या वृत्तसंस्थेनं या वाहतूक कोंडीचे फोटो शेअर केलेत.

मुंबईतल्या प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळांचा स्तुत्य निर्णय... बाप्पाचे आगमन होणार पण...

भायखळा, दादर या भागातील गर्दी कमी करण्यासाठी सायन हायवे येथे भाजी मार्केट हलवण्यात आलं आहे. सध्या मोठ्या प्रमाणात ट्रक, टेम्पोतून भाजीची आवक होते. या वाहनातूनच मुंबईच्या विविध भागात भाजीचा पुरवठा केला जातो. या वाहनांमुळे सायन भागात बराच वेळ वाहतुकीची समस्या निर्माण झाली होती. दरम्यान लॉकडाऊन असतानाही या भागात प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याने चिंता वाढली आहे.

सकाळीच भाजीचे ट्रक आणि टेम्पो मोठ्या संख्येनं या भागात उभे होते. त्याचवेळी बस, कार, रिक्षा अशी वाहनंही रस्त्यावर उतरली आणि त्यामुळे वाहतूक कोंडी झाली. मुंबईतला कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मुंबई शहर रेड झोन असल्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी खूप कमी प्रमाणात नियम शिथिल केलेत. त्यांनी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन व्हायला हवे असं स्पष्ट केलं आहे. एकतर पाचव्या टप्प्यातील लॉकडाऊनचा आज पहिला दिवस आहे आणि त्यातच मुंबईत अशी वाहतूक कोंडी झाल्यानं आणखी डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heavy traffic jam seen outside a vegetable market in mumbais sion area

टॉपिकस