मुंबईतल्या प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळांचा स्तुत्य निर्णय... बाप्पाचे आगमन होणार पण...

मुंबईतल्या प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळांचा स्तुत्य निर्णय... बाप्पाचे आगमन होणार पण...

मुंबई- महाराष्ट्र सध्या कोरोना व्हायरसच्या संकटाचा सामना करतोय. त्यातच मुंबईत कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव आहे. संपूर्ण राज्यभरात गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात येतो. महाराष्ट्रात गणेशोत्सवाचं वेगळचं महत्त्वाचं आहे. मुंबई पुण्यासह मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. या गणेशोत्सवादरम्यान मुंबई पुण्यात मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी पाहायला मिळते. त्याच पार्श्वभूमीवर कोरोनाचा धोका पाहता मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव यंदा साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय काही प्रमुख गणपती मंडळांनी घेतला आहे. रविवारी परळचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने (नरेपार्क) यंदा 3 फुटांची गणेशमूर्ती घडवण्याचा निर्णय घेतला आहे. 

तसंच काही दिवसांपूर्वी भव्य गणेशमूर्तींसाठी ओळखल्या जाणाऱ्या खेतवाडीत जवळपास 31 मंडळे यंदा 2 ते 5 फुटांच्या मूर्ती स्थापन करणार असल्याची घोषणा अखिल खेतवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे करण्यात आली होती. बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेंद्र दहीबावकर यांनी सर्व गणेशोत्सव मंडळांना गणेशोत्सव साजरा करण्याची तयारी करा असं सांगितलं आहे. गणेशोत्सव दरवर्षीप्रमाणे धुमधडाक्यात न साजरा करता अत्यंत साधेपणाने करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. सरकारी यंत्रणेवर ताण येऊ नये या दृष्टीने यंदाचा उत्सव साधेपणाने करण्याबाबत बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीतर्फे आवाहन करण्यात आलं होतं. हा निर्णय घेताना मुंबईच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आजवर दाखवलेले सामाजिक भान, गणेशभक्त तसेच मंडळाच्या कार्यकर्त्यांची सुरक्षितता हे महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेतल्याचं समितीकडून स्पष्ट करण्यात आलं. समितीनं केलेल्या आवाहनानंतर अनेक मंडळांनी बाप्पाची मुर्ती कमी उंचीच्या स्थापन करुन तसंच सुरक्षित आणि अत्यंत साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीनं योजना करत असल्याचं समितीला कळवलं आहे.

परळचा राजा गणेशोत्सवाचा मोठा निर्णय 

परळचा राजाची मूर्ती यंदा तीन फुटांची असणार आहे. तसेच विभागातून वर्गणी न घेणे, विसर्जन मिरवणूक रद्द करून कृत्रिम तलावात मूर्तीचे विसर्जन करणे असे अनेक महत्त्वाचे निर्णय मंडळानं घेतले असल्याचं मंडळाचे अध्यक्ष चंद्रशेखर देसाई यांनी सांगितले.

कोरोनाचं संकट पाहता खेतवाडीतल्या 31 गणेशोत्सव मंडळांनी साधेपणानं उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्युत रोषणाई, देखावा या गोष्टींसाठी होणारा लाखोंचा खर्च टाळून, कमी उंचीच्या मूर्ती बसवण्यात येईल. तसेच विसर्जनासाठी मंडळाच्या आवारात कृत्रिम तलाव निर्माण केले जातील, अशी माहिती मध्यस्थ मंडळातर्फे नलिन मोदी यांनी दिली.

वडाळा येथील श्री राम मंदिरात साजरा होणाऱ्या जीएसबी गणेशोत्सव मंडळानं देखील गणेशोत्सव पुढे ढकलला आहे. यंदाचा गणेशोत्सव भाद्रपद महिन्याऐवजी माघ महिन्यात साजरा करण्याचा निर्णय घेतला. जीएसबी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ समितीनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com