पूरग्रस्तांसाठी मनसेकडून मदतीचा हात; जीवनावश्यक वस्तूंचे सहा ट्रक रवाना

दीपक शेलार  
Saturday, 10 August 2019

महापुरामुळे कोल्हापूर, सांगली भागात अक्षरश: दयनीय अवस्था झाली आहे. मदतीचा ओघ संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जात असताना ठाण्याची महाराष्ट्र नवनिर्माण सेना मदतीसाठी सरसावली आहे.

ठाणे : महापुरामुळे कोल्हापूर, सांगली भागात अक्षरश: दयनीय अवस्था झाली आहे. मदतीचा ओघ संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जात असताना ठाण्याची महाराष्ट्र नवनिर्माण सेना मदतीसाठी सरसावली आहे. त्यानुसार, जीवनावश्यक वस्तूंचे सहा ट्रक पूरग्रस्त भागाकडे रवाना केले आहेत. तर, डॉक्टरांनीदेखील मदतीचा हात पुढे केला असून, ठाण्यातील ४५ डॉक्टरांच्या पथकाने पूरग्रस्तांना वैद्यकीय मदतीसाठी पश्चिम महाराष्ट्राकडे रवाना झाले आहे. 

कोल्हापूर-सांगली येथे पूरामुळे सगळंच वाहून गेल्याने सर्वांचे संसार उद्ध्वस्त झाले आहे. या पूर बाधितांना गरज आहे ती मदतीच्या हातांची. तेव्हा ठाण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिलेदारांनी ठाणेकरांना आवाहन करून जमा केलेले वस्तू व जीवनाश्यक घटक एकत्र करून सहा ट्रक पूरग्रस्त भागाकडे रवाना केले आहेत. हे सर्व सामान 50 महाराष्ट्र सैनिकांचे पथक ठाण्यातून मदतीसाठी निघाले असून, यांत अन्नधान्य, पाणी,ब्लँकेट, कपडे, साड्या, औषध आहेत.

मदतीच्या साहित्यावर स्टिकर नाही

महत्वाचे म्हणजे या मदतीच्या सामग्रीवर इतराप्रमाणे कोणत्याही प्रकारचे स्टिकर लावले नाहीत. कारण आम्ही खऱ्या अर्थाने मदतीसाठी जात आहोत. इतरांप्रमाणे दिखाव्यासाठी नाही, असं वक्तव्य ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी केले आहे. तर ठाण्यातील वर्तकनगर येथील श्री सिध्दीविनायक हॉस्पिटल व सिध्दी फाउंडेशन यांच्या वतीने सांगली, कोल्हापूर पूरग्रस्त नागरिकांना जीवनावश्यक वस्तू देण्यात येणार आहेत. यासाठी त्यांनी नागरिकांनादेखील आवाहन केले आहे.

डॉक्टरांची टीमही जाणार मदतीला

आवाहनाला ठाणेकरांनी भरघोस प्रतिसाद दिला असून, डाॅक्टरच्या टीमसह जीवनावश्यक वस्तू पुरग्रस्तांपर्यंत पोहोचवले जाणार आहेत. केवळ मदतीचा हा न देता ठाण्यातून ४५ डॉक्टरांचे पथक या सर्व पूरग्रस्तांना वैद्यकीय सेवा देखील देणार आहे.

पूरग्रस्तांकरिता मदत स्वीकारण्यासाठी ठाणे जिल्ह्यात कक्ष स्थापन

अतिवृष्टीमुळे राज्यात अनेक ठिकाणी विशेषत: सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या ठिकाणच्या बाधित लोकांचे स्थलांतर अन्य ठिकाणी करण्यात आले आहे. सदर पूरग्रस्तांसाठी इच्छुक देणगीदार/ मदत करू इच्छिणाऱ्या व्यक्ती/ संस्था/ संघटना यांच्याकडून मदत स्वीकारण्याकरिता ठाणे जिल्ह्यात नैसर्गिक आपत्ती मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.

पूरग्रस्तांना आवश्यक असणारे साहित्य उदा. ब्लँकेटस्, सतरंजी, लहान मुलांचे कपडे, साड्या, टॉवेल, महिलांसाठी किट (साडी, परकर, टॉवेल, सॅनेटरी नॅपकीन इ.), तसेच पुरूषांसाठी किट (टी शर्ट, बर्मुडा, स्वेटर इ.), लहान मुले व मुलींसाठी किट असे पोषाख स्वीकारले जातील. जुने कपडे स्वीकारले जाणार नाहीत. याबरोबरच टिकाऊ अन्न पदार्थ, दैनंदिन गरजेच्या वस्तू स्वीकारल्या जातील. तसेच रोख स्वरूपातील निधी किंवा धनादेश खाली नमूद केलेल्या खात्यामध्ये संबंधित देणगीदारांना बँकेमार्फत जमा करता येईल.

मदत कक्ष पुढीलप्रमाणे :

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय - आपत्ती नियंत्रण कक्ष
ठाणे, तहसीलदार कार्यालय, ठाणे स्टेशन रोड, ठाणे (प.)
कल्याण तहसीलदार - दिवाणी न्यायालयासमोर, कल्याण-मुरबाड रोड, कल्याण (प.)
भिवंडी तहसीलदार - भिवंडी जुना जकात नाका, आग्रा रोड, भिवंडी,
अंबरनाथ तहसीलदार - नवीन प्रशासकीय इमारत, पहिला मजला, अंबरनाथ (प.), ता.अंबरनाथ,
उल्हासनगर तहसीलदार उल्हासनगर- गांधी रोड, उल्हासनगर-५, ता.उल्हासनगर, जि.ठाणे
शहापूर तहसीलदार - तहसीलदार कार्यालय, शहापूर, ता. शहापूर, जि.ठाणे
मुरबाड तहसीलदार - नवीन प्रशासकीय भवन, एमआयडीसी, मुरबाड, ता.मुरबाड, जि.ठाणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Help from MNS for flood victims Six trucks going for essential items