पूरग्रस्तांप्रमाणे मुंबईकरांनाही मदत द्या; राज्य सरकारने तेलंगणाचा आदर्श घेण्याची भाजपची मागणी

कृष्ण जोशी
Wednesday, 21 October 2020

मागील चार महिन्यांत मुंबईकरांना तीन वेळा वादळ आणि अतिवृष्टीला तोंड द्यावे लागले. यात मुख्यतः झोपडपट्टी व चाळींमध्ये राहणाऱ्या सर्वसामान्यांचे मोठेच नुकसान झाले. त्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी होऊनही सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. यासंदर्भात तत्पर व कर्तव्यदक्ष मुख्यमंत्र्यांना पत्र देऊनही त्यांनी साधे नजर पंचनामे करण्याचेही आदेश दिले नाहीत

मुंबई ः राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मदत करतानाच राज्य सरकारने ओल्या दुष्काळात मुंबईचाही समावेश करून मुंबईतील गरीब पूरग्रस्तांनाही अर्थसाह्य करावे, अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. याबाबतीत राज्य सरकारने तेलंगणा सरकारचा आदर्श घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

लोकल सुरू झाल्याने वसई-विरारच्या महिलांमध्ये उत्साह
 
कोरोनामुळे होरपळलेल्या मुंबईकरांना सरकारने एक रुपयाचीही मदत केली नाही. त्यानंतर महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठेच नुकसान झाले असून, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी भाजपने यापूर्वीच केली आहे. या ओल्या दुष्काळात मुंबईचाही समावेश करून क्षतीग्रस्त गरीब मुंबईकरांना घरटी किमान दहा हजार रुपये अर्थसाह्य करावे, असेही भातखळकर यांनी म्हटले आहे. 

मागील चार महिन्यांत मुंबईकरांना तीन वेळा वादळ आणि अतिवृष्टीला तोंड द्यावे लागले. यात मुख्यतः झोपडपट्टी व चाळींमध्ये राहणाऱ्या सर्वसामान्यांचे मोठेच नुकसान झाले. त्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी होऊनही सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. यासंदर्भात तत्पर व कर्तव्यदक्ष मुख्यमंत्र्यांना पत्र देऊनही त्यांनी साधे नजर पंचनामे करण्याचेही आदेश दिले नाहीत, असाही टोला भातखळकर यांनी लगावला. 

दहा हजार कोटी मदतीसाठी वापरा! 
मुंबई महानगरपालिकेकडे 70 हजार कोटी रुपयांच्या ठेवी असून, त्याबाबत राज्य सरकारने हमी देऊन त्यातील दहा हजार कोटी रुपये मुंबईकरांच्या मदतीसाठी वापरले पाहिजेत. ही मागणी वारंवार करूनही त्यावर कसलाही विचार झाला नाही. राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत जरूर करा; पण अतिवृष्टीचा फटका बसलेल्या गरीब मुंबईकरांनाही मदत करा, अशी आग्रही मागणीही त्यांनी पत्रात केली आहे. 

(संपादन- बापू सावंत)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Help Mumbaikars like flood victims; BJP demands that the state government follow the example of Telangana