काय सांगता! तब्बल १४ वर्षांनी हरवलेलं पाकिट सापडलं; कशी होती पाकिटाची अवस्था जाणून घ्या

पूजा विचारे
Tuesday, 11 August 2020

तब्बल १४ वर्षांनी हरवलेलं पाकिट सापडलं आहे. २००६ साली एका लोकल प्रवाशानं ट्रेनमधून पाकिट हरवल्याची तक्रार केली होती. ते पाकिट तब्बल १४ वर्षांनी सापडलं आहे ते सुद्धा जुन्या ५०० रुपयाच्या नोटेसह. 

मुंबईः  मुंबईच्या लोकल ट्रेन एखादी गोष्ट हरवली तर प्रवाशांनी अपेक्षाच सोडावी की ती पुन्हा मिळेल. जर हरवलेली वस्तू सापडली तर तुमचं नशीबचं. त्यातच मुंबईच्या लोकल ट्रेनमधून हरवलेलं पाकिट सापडणं म्हणजे मोठीचं गोष्ट. मात्र एका व्यक्तीला एक, दोन नव्हे तर तब्बल १४ वर्षांनी हरवलेलं पाकिट सापडलं आहे. २००६ साली एका लोकल प्रवाशानं ट्रेनमधून पाकिट हरवल्याची तक्रार केली होती. ते पाकिट तब्बल १४ वर्षांनी सापडलं आहे ते सुद्धा जुन्या ५०० रुपयाच्या नोटेसह. 

हेमंत पडळकर यांचं २००६ साली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पनवेल या  लोकल ट्रेनमध्ये त्यांचं पाकिट चोरीला गेलं होतं. त्यावेळी त्यांच्या पाकिटमध्ये ९०० रुपये होते. रेल्वे पोलिसांच्या (जीआरपी) अधिकाऱ्यानं रविवारी ही माहिती दिली.

यावर्षी एप्रिल महिन्यात, वाशी रेल्वे पोलिसांचा फोन आला आणि तुमचं पाकिट सापडलं असल्याचं सांगितलं. त्यानंतर कोरोना व्हायरस प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यामुळे लॉकडाऊन असल्यामुळे त्यांना पाकीट घेण्यास जाणं शक्य झालं नाही. लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल झाल्यानंतर पनवेलमध्ये राहणारे पडळकर वाशी येथील जीआरपी कार्यालयात गेले. जेथ त्यांना पाकिट आणि त्यातील काही रक्कम देण्यात आली. त्यांना पाकिटातील रकमेपैकी अर्धीच रक्कम परत मिळाली. 

हेही वाचाः ठाणे मनोरुग्णालयात पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव, 'इतक्या' महिला रुग्णबाधित

माझं पाकीट हरवलं त्यावेळी त्यात ९०० रुपये होते. यामध्ये नोटाबंदीनंतर चलनातून हद्दपार झालेली ५०० रुपयांची नोटही होती. वाशीच्या रेल्वे पोलिसांनी मला ९०० रुपयांपैकी ३०० रुपये परत केले आणि १०० रुपये स्टॅम्प पेपरसाठी कापले. तर उरलेले ५०० रुपये नवीन नोट मिळाल्यानंतर परत करणार असल्याचं पडळकर यांनी सांगितलं. 

हेही वाचाः हिंदमातासाठी आता नवा प्रयोग; पाणी वाहून जाण्यासाठी बोगद्याचा विचार, वाचा सविस्तर

ते पुढे म्हणाले की, जीआरपी कार्यालयात गेलो असता तिथे अनेक जण चोरी गेलेलं पाकिटं परत घेण्यासाठी आले होते. या पाकिटांमध्ये चलनातून हद्दपार झालेल्या हजारो रुपयेच्या किंमतीच्या नोटा होत्या. आता त्यांना हे पैसे कसे मिळणार असा प्रश्न मला पडला होता. मात्र मला पैसे परत मिळाल्याचा आनंद आहे. 

अधिक वाचाः मुंबई लोकलमधून प्रवास करताय, क्यु-आर कोड संदर्भातली मोठी अपडेट

तसंच १४ वर्षांपूर्वी हरवलेलं पाकीट सापडेल, अशी अपेक्षाच मी केली नव्हती. पण रेल्वे पोलिसांच्या अनपेक्षित फोनमुळे मला सुखद धक्का बसला असल्याचं पडळकर यांनी सांगितलं आहे. पैसे परत मिळाल्याचा मला आनंद झाला असल्याचं ते म्हणालेत. 

पडळकर यांचं पाकिट चोरणाऱ्याला आम्ही काही दिवसांपूर्वी अटक केली. आम्ही आरोपींकडून पडळकर यांचे पाकीट जप्त केलं. त्यात ९०० रुपये होते.  आम्ही ३०० रुपये पडळकर यांना परत केले आणि उर्वरित ५००  रुपये नवीन नोटा बदलल्यानंतर त्याला परत करण्यात येतील, असं रेल्वे पोलिसांनी सांगितलं. 

Hemant Padalkar Lost Wallet found after 14 years Mumbai local train


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hemant Padalkar Lost Wallet found after 14 years Mumbai local train