भिवंडी बलात्कार प्रकरणाची गृहमंत्र्यांनी घेतली दखल; पोलिसांना अहवाल सादर करण्याचे आदेश

शरद भसाळे
Thursday, 26 November 2020

भिवंडी शहरातील भोईवाडा भागातील समरूबाग येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी आरोपीवर कडक कारवाई करून फास्ट ट्रॅंक न्यायालयीन खटल्याद्वारे कारवाई करावी.

 

भिवंडी - भिवंडी शहरातील भोईवाडा भागातील समरूबाग येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी आरोपीवर कडक कारवाई करून फास्ट ट्रॅंक न्यायालयीन खटल्याद्वारे कारवाई करावी. तसेच पीडित आणि कुटुंबियांना न्याय देण्यात यावा अशी मागणी भिवंडी पुर्वचे आमदार रईस शेख यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे लेखी निवेदनाव्दारे केली आहे. त्यामुळे सदर पत्राची तातडीने गंभीर दखल घेत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांनी तातडीने कारवाई करून अहवाल शासनाला सादर करण्याचा सुचना दिल्या आहेत.

हेही वाचा - रायगडमध्ये सरकारी कामे ठप्प! 15 हजार कर्मचारी संपात सहभागी; नागरिकांचे हाल 

भिवंडी शहरातील भोईवाडा समरूबाग परिसरातील एक चाळीत राहणाऱ्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचे तिच्या कुटुंबियांच्या रखवालीतून फूस लावून अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला त्यामुळे पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करीत दोघांना अटक केली आहे.दरम्यान संतप्त झालेल्या नागरिकांनी रस्त्यावर उतरून घोषणाबाजी करीत दिवानशाह दर्गा येथील आरोपीचा पानपट्टी वर तुफान दगडफेक करीत आरोपींना तात्काळ फाशी दयावी अशी मागणी करीत रस्त्यावर गोंधळ घातला. त्यामुळे काही काळ भिवंडीत तणावाचे वातावरण होते. आमदार रईस शेख यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांना शांततेचे आवाहन करीत दोषी आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी करीत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना लेखी निवेदन दिले आहे. 

हेही वाचा - २०१९ विधानसभा निकालांनंतर राष्ट्रवादीचे बडे नेते शरद पवारांचा मेसेज घेऊन वर्षावर गेले होते ? नवाब मलिकांनी दिलं उत्तर

त्या मध्ये त्यांनी म्हटले आहे की सदरचा गुन्हा हा पुरोगामी विचारसरणीच्या महाराष्ट्रात घडणे अतिशय दुःखदायक आणि निंदनीय आहे. एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून या प्रकरणी सदरच्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार गुन्ह्याचा तपास फास्ट ट्रॅक पद्धतीने करणे, गुन्ह्याचा खटला हा फास्ट ट्रॅक पद्धतीने न्यायालयात चालवून 6 महिन्यांच्या आत निकाली काढणे, पीडित मुलगी अल्पवयीन असल्याने तसेच पालक आरोपी आणि संबंधितांच्या दहशतीखाली आहेत. त्यामुळे त्यांना संरक्षण देणे, पीडित मुलगी अद्याप शिक्षण घेत असल्याने तिच्या शिक्षणाची जबाबदारी शासनामार्फत घेणे तसेच पीडित मुलीला केंद्र सरकार महिला व बाल विकास विभागाच्या मनोधैर्य योजनेचा तसेच राज्य शासनाच्या संबंधित योजनांचा लाभ देणे इत्यादी मागण्या आ.रईस शेख यांनी निवेदनात केल्या आहेत. त्यामुळे गृहमंत्र्यांनी तात्काळ चौकशीचे आदेश देवून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

Home Minister takes notice of Bhiwandi case Order to submit report to police

-----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Home Minister takes notice of Bhiwandi case Order to submit report to police