गृहराज्यमंत्री घेणार आंध्र प्रदेशच्या 'दिशा' कायद्याची माहिती

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

गृहराज्यमंत्री अनिल देशमुख जाणार हैद्राबादला

मुंबई : महिलांवरील अत्याचारांविषयी राज्यशासन संवेदनशील असून राज्यात कठोर कायदा आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्याअनुषंगाने आंध्र प्रदेशने केलेल्या 'दिशा' कायद्याची माहिती घेण्यासाठी आपण स्वतः गृहराज्यमंत्री तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत दिनांक 20 फेब्रुवारी रोजी हैद्राबादला जाणार आहोत, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज दिली.

हेही वाचा - महापालिकेत ८१० लिपिक पदे

देशमुख म्हणाले, महिलांवरील अत्याचारांचे गुन्हे जलद गतीने चालवून या घटनांमधील गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा होईल यासाठी उपाययोजना करण्यास शासन प्राधान्य देत आहे. त्यासाठी प्रभावी ठरेल असा नवीन कायदा आणण्याचा विचार करत आहोत. महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे जलद गतीने चालवून निकाल मिळण्यासाठी आंध्र प्रदेशने केलेला 'दिशा' कायदा प्रभावी ठरेल अशी माहिती मिळत आहे. त्या अनुषंगाने प्रत्यक्ष हैद्राबादला जाऊन आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री, गृहमंत्री तसेच पोलीस महासंचालक कार्यालयाला भेट देऊन या कायद्याची सविस्तर माहिती घेणार आहे.

महत्त्वाची बातमी - वांद्रे किल्ल्यात श्रेयाचे राजकारण सुरु

या दौऱ्यात गृहमंत्र्यांसमवेत गृहराज्यमंत्री (शहरे) श्री. सतेज पाटील, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) श्री. शंभूराज देसाई, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, महिला व बालकांवरील अत्याचार प्रतिबंध विभागाचे पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीच्या अस्वती दोर्जे हे सोबत असणार आहेत.

web title : Home Minister will take information about Disha act


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Home Minister will take information about Disha act