esakal | तळीये दरडग्रस्तांना ६०० चौरस फुटांची घरे
sakal

बोलून बातमी शोधा

mhada

Raigad : तळीये दरडग्रस्तांना ६०० चौरस फुटांची घरे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अलिबाग : तळिये दरडग्रस्तांना ‘विशेष बाब’ म्हणून ६०० चौरस फूट क्षेत्रफळाची घरे देण्यात येणार आहेत, असा निर्णय गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज घेतला. २२ जुलैच्या अतिवृष्टीमध्ये महाड तालुक्यातील तळीये गाव पूर्णपणे गाडले गेले.

या दुर्घटनेनंतर ‘म्हाडा’ने हे पूर्ण गाव वसविण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. त्याबाबत कालबद्ध कार्यवाही करून येत्या महाराष्ट्र दिनी म्हणजे १ मे २०२२ ला या घरांचा ताबा तळीये येथील बाधित कुटुंबीयांना देण्याचा प्रयत्न म्हाडा करत आहे, असे वक्तव्य गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले.

कोकणातील राहणीमान, शेती, एकत्र कुटुंब पद्धती व पूर्वी असलेल्या घरांच्या क्षेत्रफळानुसार मदत व पुनर्वसन विभागामार्फत देण्यात येणारे घराचे क्षेत्रफळ हे अपुरे असल्यामुळे स्थानिकांच्या मागणीनुसार वाढीव क्षेत्र मिळण्याबाबत रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या विनंतीनुसार गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन केले होते. त्यावेळी याबाबत निर्णय घेण्यात आला.

बैठकीस राज्यमंत्री तथा पालकमंत्री अदिती तटकरे, महाडचे आमदार भरत गोगावले, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर तसेच तळीयेचे सरपंच व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

आव्हाड म्हणाले, ‘‘कोकणात वारंवार येणारी वादळे, पूर, अतिवृष्टी अशा भौगोलिक परिस्थितीमध्ये प्री-फॅब्रिकेशनया आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात येणारी घरे भविष्यातील सर्व आपत्कालीन परिस्थितीत अनुकूल ठरतील. त्यासाठी तळीयेचे पुनर्वसन म्हाडा करीत असून, या तंत्रज्ञानातून तयार झालेले ‘मॉडेल व्हिलेज’ म्हणून हे गाव विकसित होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

loading image
go to top