होरायझन प्राईम रुग्णालयाला ठाणे आयुक्तांचा जबरजस्त दणका; राज्यातील अशी ही पहिलीच कारवाई

होरायझन प्राईम रुग्णालयाला ठाणे आयुक्तांचा जबरजस्त दणका; राज्यातील अशी ही पहिलीच कारवाई

ठाणे ः कोविड रूग्णांकडून अतिरिक्त पैसे लाटल्याचा ठपका ठेवून होरायझन प्राईम रूग्णालयाचा परवाना एक महिन्यासाठी महापालिका आयुक्त डॉ विपिन शर्मा यांनी रद्द केला आहे. रूग्णांकडून जास्त पैसे उकळणाऱ्या रूग्णालयाच्या विरोधात पहिल्यांदा अशी कारवाई करण्यात आली आहे. आजपासून एकही नव्या रूग्णांला या रूग्णालयात प्रवेश देण्यास बंदी करण्यात आली आहे.

शहरात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील खासगी रुग्णालयांचे कोविड रुग्णालयात रुपांतर करण्यात आले होते. त्यात होरायझन प्राईम रुग्णालय प्रशासन रुग्णांकडून गैरवाजवी बिले आकारात असल्याची तक्रार ठाणे महापालिकेकडे प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने पालिकेकडून नेमण्यात आलेल्या विशेष लेख परीक्षण पथकाकडून या रुग्णालयाच्या देयकांची तपासणी केली असता, 57 पैकी तब्बल 56 देयके हि गैरवाजवी दराने आकारल्याचे निदर्शनास आले. याची गांभीर्याने दाखल ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी धडक कारवाई करीत, होरायझन प्राईम रुग्णालयाला देण्यात आलेली कोविड रुग्णालयाची मान्यता रद्द केली आहे. तसेच रुग्णालयाची नोंदणी एक महिन्यासाठी निलंबित केली आहे. त्यामुळे शहरातील इतर खासगी रुग्णालयांचे देखील धाबे दणाणले आहेत.

ठाणे शहरात मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाने शिरकाव केला. त्यानंतर कालांतराने शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची वाढत संख्या लक्षात घेता, ठाणे महानगर पालिकेने एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला शहरातील अनेक खासगी रुग्णालये कोविड रुग्णालये म्हणून घोषित केली. त्यामध्ये ठाण्यातील घोडबंदर रोड येथील होरायझन प्राईम रुग्णालयाचा देखील त्यात समावेश होता. त्यात कालांतराने शहरातील अनेक खासगी रुग्णालयांकडून कोविड रुग्णांकडून अवाजवी बिले आकारली जात असल्याची ओरड होत होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेली टाळेबंदी आणि कोविड रुग्णालयांकडून आकरण्यात येणारी अवाजवी बीले यामुळे गरीब व सर्वसामान्य नागरिक भरडून निघत होता. तसेच या आकारण्यात येणाऱ्या बिलांच्या बाबतीत महापालिकेकडे देखील तक्रारींचा वाढटी संख्या लक्षात घेवून, ठाणे महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी मुख्य लेखा परिक्षक, ठाणे महानगरपालिका व उपजिल्हाधिकारी यांचे संनियंत्रणात विशेष लेखा परीक्षण पथक नेमण्यात आले. या पथकाच्या माध्यमातून रुग्णांकडून आकरण्यात येणाऱ्या बिलांचा लेख परीक्षण करण्यात येत आहे. त्यानुसार होरायझन प्राईम रुग्णालया बाबत प्राप्त झालेल्या तक्रारींच्या अनुषंगाने विशेष लेख परीक्षण पथकाकडून 57 देयकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये तब्बल 56 देयकंच्या माध्यमातून 6 लाख आठ हजार 900 रुपये गैरवाजवी दराने आकरण्यात आल्याचे निर्दशनास आले. त्यात या देयकांची यादीसह महापालिकेने रुग्णालय प्रशासनाला नोटीस बजावत दोन दिवसात गैरवाजवी देयकांतील आक्षेपार्ह रकमेबाबत लेखी खुलासा करणेबाबत कळविण्यात आले होते.

मात्र, नोटीशीची मुदत संपल्यानंतर सुध्दा रुग्णालय व्यवस्थापनाकडून अनियमिततेबाबत कोणताही लेखी खुलासा करण्यात आला नाही. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने ठाणे शहरातील सर्वसामान्य कोरोनाग्रस्त नागरीकांची आर्थिक फसवणूक केल्याचे आढळून आले आहे. याची गांभीर्याने दखल घेत, होराईझन प्राईम हॉस्पीटल, घोडबंदर रोड, ठाणे या रुग्णालयास कोव्हिड रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आलेली मान्यता रद्द करण्यात आलिया असून या रुग्णालयाची ठाणे महानगरपालिका, ठाणे द्वारे मुंबई नर्सिंग होम रजिस्ट्रेशन अॅक्ट १९४९ नुसार देण्यात आलेली रुग्णालय नोंदणी देखील या आदेशाच्या दिनांकापासून एका महिन्याकरिता निलंबीत करण्यात आले आहे. 
दरम्यान, सध्याच्या घडीला या रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांवर आय सी एम आर. तसेच शासन आदेशानुसार समाधानकारक औषधोपचार होईल व त्यांचेकडून शासकीय दराने बिलाची आकारणी करण्यात येत असल्याचे निश्चित होईपर्यंत परिस्थितीवर संनियंत्रण ठेवण्यासाठी तसेच रुग्णालयामध्ये कोणत्याही प्रकारचे नवीन रुग्ण उपचारासाठी दाखल करुन घेण्यात येऊ नयेत यासाठी महापालिकेच्या वतीने राजीव गांधी महाविद्यालयाच्या सहयोगी प्राध्यापक, मेडिसीन विभाग डॉ. सौ. प्रेषिता क्षीरसागर, कनिष्ठ लेखापरिक्षक, लेखापरिक्षण विभाग बाळासाहेब कारंडे यांचे द्विसदस्यीय पथक पूर्णवेळ होराईझन प्राईम रूग्णालय येथे तैनात करण्यात आली आहे .

-------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com