कोरोनाच्या कठोर निर्बंधांमुळे हॉटेलचालक त्रस्त; नववर्षस्वागतासाठीतरी दीडपर्यंत वेळ वाढविण्याची मागणी

कोरोनाच्या कठोर निर्बंधांमुळे हॉटेलचालक त्रस्त; नववर्षस्वागतासाठीतरी  दीडपर्यंत वेळ वाढविण्याची मागणी

मुंबई  ः कोरोनाचा विळखा हळुहळू कमी होत असला तरी कठोर सरकारी निर्बंधांमुळे शहरातील हॉटेलचालक त्रस्त झाले असून त्यामुळे यंदा नववर्षाच्या स्वागताचा जल्लोष पूर्वीइतका असणार नाही, अशी भीती ते व्यक्त करीत आहेत. निदान नववर्षस्वागतासाठीतरी पहाटे दीडपर्यंत हॉटेल खुली ठेवण्याची संमती द्यावी, अशी मागणी ते करीत आहेत. 

दरवर्षी 31 डिसेंबरला मध्यरात्री शहरातील लहानमोठी हॉटेल, बार-रेस्टोरंट भरलेली असतात. क्लब, पंचतारांकित हॉटेल येथे तर पहाटेपर्यंत झिंग चढलेली असते. मात्र नुकत्याच काही लाऊंज बार ने नियमभंग केल्याने महापालिकेच्या कठोर कारवाईचा फटका एरवी नियम पाळणाऱ्यांना हॉटेलांनाही बसू लागला आहे. त्यामुळे वातावरण बिघडल्याची भावना हॉटेलचालक व्यक्त करीत आहेत. आता सर्व ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगला हरताळ फासला जात आहेच. त्यामुळे हॉटेलांसाठी किंचित नियमांमधून सूट द्यावी, अशीही मागणी होत आहे. 

रेस्टोरंट थंड
.....................
एरवी 24 डिसेंबरपासून ते एक जानेवारीपर्यंत हॉटेलचा धंदा चांगला होतो. मात्र आता रात्री साडेअकराला हॉटेल बंद होणार असल्याने कुटुंबांना नववर्षाचे स्वागत करताच येणार नाही. त्यामुळे यावेळी काही खास धंदा होईलसा वाटत नाही. म्हणून आम्ही यावेळी फारशी काहीच तयारी केली नाही. मुंबईत निर्बंध असल्याने लोक बाहेरगावी जातील असे दिसते आहे. एरवीही आमच्यापैकी काहीजण आधीच टेबल बुकिंग करणे, जास्त दरांचे वेगळे मेनूकार्ड, संगीत-गाणी, ऑर्केस्ट्रा असा जल्लोष करतात. मात्र आता संगीत कार्यक्रमांना सरकारने एसओपी मध्येच बंदी लादल्याने ते कार्यक्रम होणारच नाहीत, अशी भीती आहार संघटनेचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी यांनी व्यक्त केली. दिवाळीत आमचा व्यवसाय चांगला झाला, मात्र नंतर पुन्हा मंदी आली. आता सरकारने नियमांत काही सूट दिली तरच ठीक होईल, अन्यथा काही खरे नाही, असेही ते म्हणाले. 

मोठी हॉटेलही शांत

एरवी वर्षअखेरसाठी आम्हाला पहाटे पाच वाजेपर्यंत परवानगी होती. अर्थात आम्ही पहाटे दोन पर्यंत सारे आटोपत होतो. पण आता वेळमर्यादा साडेअकरा व निम्म्या क्षमतेनेच ग्राहक घ्यायचे असल्याने यावर्षी पार्टी रंगेल असे वाटत नाही. तसेही यंदा बरेच लोक लोणावळ्यापासून काश्मीर, हिमाचल ते दुबईत गेले आहेत. त्यातच यंदा 31 डिसेंबरला रात्री संचारबंदी असेल का, वेळमर्यादा वाढेल का हे नक्की नसल्याने सारेच अनिश्चित आहे. त्यामुळे काही तयारी करण्यात अर्थच नाही, असे दादरच्या मिडटाऊन प्रीतम हॉटेल चे गुरुबक्षिषसिंह कोहली म्हणाले.

Hoteliers suffer due to Coronas strict restrictions Demand for extension of time for New Years reception

--------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com