कल्याणसारखे रस्ते संपूर्ण महाराष्ट्रात कोठे नसतील, जितेंद्र आव्हाडांचा सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर

शर्मिला वाळुंज
Sunday, 17 January 2021

जितेंद्र आव्हाड यांनी कल्याणमधील रस्त्यांच्या दुर्देशचा मुद्दा उपस्थित करत सत्ताधाऱ्यांना उपरोधिक टोला लगावला आहे.

मुंबईः निवडणुकीच्या रिंगणात कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांचा मुद्दा कायमच चर्चिला गेला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी कल्याणमधील रस्त्यांच्या दुर्देशचा मुद्दा उपस्थित करत सत्ताधाऱ्यांना उपरोधिक टोला लगावला आहे. कल्याणमध्ये आल्यावर रस्त्यांची दुर्दशा बघवत नाही, अख्ख्या महाराष्ट्रात असे रस्ते कोठे नसतील असे वक्तव्य करत त्यांनी महाविकास आघाडीतील सेनेच्या नेत्यांना घरचा आहेर दिला. विशेष म्हणजे यावेळी शिवसेनेचे कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर हे मंचावर उपस्थित होते. 

एकीकडे शिवसेना तरुणांना सेनेकडे आकर्षिक करण्याचा प्रयत्न करत असताना आव्हाड यांनीही तरुणांनी विचार करावा असा सल्ला तरुणांना देत तरुणांना राष्ट्रवादीकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे येत्या महापालिका निवडणुकीत रस्त्यांचा मुद्दाही चांगलाच गाजणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

कल्याण पश्चिमेत एका क्रिकेट सामन्याला गृहनिर्माण मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आले होते. यावेळी कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांसह सेना राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. राज्यात महाविकास आघाडी असताना राष्ट्रवादीचे आव्हाड यांनी शिवसेनेच्या आमदारांसमोरच सत्ताधाऱ्यांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका सेना भाजप युतीचा बालेकिल्ला राहिली आहे. कल्याण पश्चिमेत पहिल्यापासून शिवसेनेचे वर्चस्व राहीले असताना या भागात राष्ट्रवादीचे आव्हाड यांनी हे वक्तव्य करीत सेनेला कानपिचक्या दिल्या. भाजपाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही यापूर्वीही डोंबिवली शहराचा अस्वच्छ शहर असा उल्लेख करीत भाजपला घरचा आहेर दिला होता. आता राज्यात महाविकास आघाडीत राष्ट्रवादी शिवसेनेच्या सोबत असताना राष्ट्रवादीनेही रस्त्यांच्या दुरावस्थेविषयी विधान करीत सेनेला घरचा आहेर दिला आहे. 

अंबरनाथमध्ये काही महिन्यांपूर्वी आव्हाड यांनी महाविकास आघाडीविषयीच बोलताना येणाऱ्या काळात काय होईल हे सांगता येत नाही. मात्र आता तरी ते आपले मित्र असल्याने त्यांच्यावर टीका करता येत नाही. मात्र येणारा काळ अवघड असून युती होईल की नाही हे सांगता येत नाही. त्यामुळे तयारी कायम ठेवा असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले होते. महाविकास आघाडीतील नेत्यांनी एकमेकांवर टीकास्त्र सोडण्यास सुरुवात केल्याने येत्या महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार का ? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहे.

हेही वाचा- जेजे रुग्णालयात भारत बायोटेकच्या 'को-व्हॅक्सीन' लसीचे डोस, 49 जणांनी घेतली लस

येत्या काही महिन्यात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. कल्याण पत्रीपूल, कोपर उड्डाण पूल, दुर्गाडी पूल, मानकोली पूल यांची कामे रेंगाळली होती, कल्याण शीळ रोडचे सीमेंट कॉंक्रीटीकरणाचे कामही रेंगाळलेले आहे. त्यामुळे रस्त्यांचा मुद्दा येत्या निवडणुकीत चांगलाच गाजणार असून राजकीय नेते या मुद्द्यावरुन शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणार अशी चर्चा रंगू लागली आहे.

------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Housing Minister Jitendra Awhad comment kalyan road condition


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Housing Minister Jitendra Awhad comment kalyan road condition