एकीकडे पावसाळा दुसरीकडे कोरोना, मुंबईकरांनो पावसाळ्यात 'अशी' घ्या काळजी...

सकाळ वृत्तसेवा
Monday, 8 June 2020

रुग्णालयात जाण्यापूर्वी रुग्णांनी विशेष खबरदारी घेणे गरजेचे...

मुंबई : पावसाळा तोंडावर आला असून संपुर्ण देशभरात कोरोनाचे संकट पसरले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या देखील वाढत असल्याने आरोग्य व्यवस्थेवर ताण आल्याचे दिसून येते. अशा परिस्थितीत कोरोनाव्यतिरिक्त इतर आजाराने त्रस्त रुग्णांनाही उपचाराकरीता धावाधाव करावी लागत आहे. काही खाजगी रुग्णालयांतील ओपीडीला सुरुवात झाली असून कोरोनाव्यतिरिक्त इतर आजारांवर, दुखण्यांवर उपचार घेणा-या रुग्णांनी विशेष खबरदारी घ्यावी असे आवाहन तज्ञ डॉक्टरांनी केले आहे. 

पावसाळ्यात विशेष काळजी घेण्याची गरज

पावसात भिजल्याने सर्दी, ताप , खोकला होऊ शकतो, त्यामुळे पावसात भीजणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशन चे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ अविनाश भोंडवे यांनी सांगितले. पावसात शक्यतो बाहेर पडू नका, कामानिमित्त बाहेर पडावे लागलेच तर पावसापासून संरक्षण करण्यासाठी छत्री, रेनकोट वापरा. अचानक पाऊस आलाच तर गर्दीच्या ठिकाणी आडोसा घेऊ नका, अशामुळे संसर्ग वाढण्याचा धोका नाकारता येत नाही. सर्दी, ताप,खोकला अशी लक्षणे जाणवू लागली तर अंगावर काढू नका किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेऊ नका. 

मोठी बातमी - 2 मिनिटं काढा आणि हे आधी वाचा, मास्क लावून जॉगिंग किंवा चालण्याचा व्यायाम कराल आणि भयंकर स्थिती ओढावेल...

डॉक्टरांचा योग्य सल्ला घेऊन आपला आजार बरा करा असा सल्ला ही डॉ भोंडवे यांनी दिला आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्याने हॉटेल, रेस्टोरंट, खाऊ गल्ली सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र सध्या उघड्यावरील किंवा बाहेरचे अन्न पदार्थ खाणे टाळावे. यामुळे आजारी पडण्याची शक्यता अधिक असल्याचे ही डॉ भोंडवे यांनी सांगत लोकांना सावध केले आहे.

हॉस्पीटलला भेट देण्यापूर्वी या गोष्टी लक्षात घ्या : 

पावसाळा तोंडावर असून यामुळे साथीचे आजार पसरण्याचा धोका अधिक असतो. अश्यावेळी रुग्णाला दवाखान्यात, नर्सिंग होम किंवा रुग्णालयात जावे लागू शकते. अश्यावेळी रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांनी खबरदारीचा उपाय म्हणून आपली पुरेपूर काळजी घेणे महत्वाचे असल्याचे मुंबईच्या अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पीटलचे इंटरनल मेडिसिन एक्स्पर्ट डॉ तुषार राणे यांनी काही मार्गदर्शक सूचना पाळण्याचे आवाहन केले आहे.

  • प्रवेशद्वारावर सर्वप्रथम कोविडसंबंधी असलेले मुल्यांकन पूर्ण करून मगच आत प्रवेश करावा
  • पैसे भरण्यासाठी डीजीटल पर्यायांचा वापर करा.
  • तपासणी करिता दिलेल्या वेळेचे पालन करा आणि त्या वेळेत हॉस्पीटलमध्ये हजर रहा.
  • फक्त रुग्णांची आत प्रवेश करावा. आवश्यकता असल्यास कुटुंबातील केवळ एका व्यक्तीला आत प्रवेशास परवानगी दिली जाईल.
  • आपल्या जवळील महत्त्वाच्या वस्तु तुमच्या गाडीतच ठेवून, नातेवाईकाकडे ठेवा. मास्क आणि पेन याच गोष्टी जवळ ठेवा.

मोठी बातमी - धक्कादायक ! बिल्डिंग मधील २५ जणांसोबत ज्यांच्या खांद्यावर कोरोना पळविण्याची जबाबदारी त्याही कोरोना पॉझिटिव्ह...

  • सोशल डिस्टंसिंगचे पालन करा. सार्वजनिक शौचालयांचा वापर करू नका.
  • इतरत्र हात लावणे टाळा,हॉस्पीटलमधील वस्तूंना स्पर्श करणे टाळा.
  • तपासणीनंतरचे तुमचे रिपोर्ट्स हे ऑनलाईन उपलब्ध करून दिले जातील.
  • शूज ऐवजी साध्या लेदरच्या नसलेल्या व आल्यावर धुता येतील अशा चपला घालाव्या.
  • रुग्णालयात जाताना गरज भासल्यासच एखाद्या व्यक्तीला सोबत न्यावे व तेव्हा चारचाकी वाहनात एक पुढच्या सीटवर तर दुसरा त्याच्या मागे विरुद्ध बाजूला बसावे.

रुग्णालय प्रशासनाकडूनही घेतली जातेय विशेष खबरदारी

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयांनी आपल्या दैनंदिन कामकाजाच्या पद्धतीत बदल करणे आहे. WHO तसेच ICMR ने दिलेल्या निर्देशांचे पालन करणे गरजेचे आहे. तसेच रुग्णालयांत सोशल डिस्टंसिग तसेच स्वच्छतेचे पुरेपुर पालन करणे आवश्यक असल्याचे ही डॉ राणे यांचे म्हणणे आहे. रुग्णालयातील सर्वच कर्मचारी संरक्षणात्मक किटचा वापर करणे अनिवार्य आहे. वारंवार स्पर्श करण्यात आलेल्या जागा त्वरीत सॅनिटाईज करणे आवश्यक आहे. बायो मेडिकल वेस्टचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. हॉस्पीटलमधील सर्व कर्मचारी, रुग्णांना उत्तम सेवा तसेच उपचार पुरविणे तसेच त्यादृष्टीने उपाययोजना आखणे आवश्यक असल्याचे ही डॉ राणे यांनी म्हटले आहे.

how to take care during monsoon especially when there is threat of corona 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: how to take care during monsoon especially when there is threat of corona