लॉकडाऊनमध्ये कार सुरक्षित ठेवण्यासाठी टिप्स 

लॉकडाऊनमध्ये कार सुरक्षित ठेवण्यासाठी टिप्स 

मुंबई - सध्या देशात लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे नागरिक घरी आहेत, मात्र त्याचसोबत कारही घराबाहेर किंवा पार्किंगमध्ये उभ्या करून ठेवल्या आहेत. जर कार खूप दिवसांपर्यंत एकाच जागेवर उभी करून ठेवली तर लॉकडाऊन संपल्यानंतर गाडी सुरू करताना अनेक समस्या येऊ शकतात. यामुळे एकाच जागेवर पार्क करून ठेवलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांची काळजी घेणे अतिशय आवश्‍यक ठरते. लॉकडाऊननंतर कार पुन्हा सुरू करताना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स... 

कारचे बाह्यरंग स्वच्छ ठेवा 
एकाच जागेवर खूप दिवस वाहन उभे केल्यास त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ आणि कचरा जमा होतो. यामुळे ते स्वच्छ करण्यास अधिक वेळ लागतो किंवा कायमस्वरुपी डाग पडतात. त्यामुळे कार दिसायला खराब दिसते. यामुळे आठवड्यातून किमान दोन वेळा तरी कारवर जमा झालेली धूळ आणि कचरा काढून टाकावा. यासाठी केवळ पाण्याचा वापर केला तरी चालेल. त्यानंतर काही वेळ कारला सुकू द्या. जर कार आपण इनडोअर पार्क करत असाल, तर कारवर कव्हर टाकण्यास विसरू नका. त्यामुळे कारवर अधिक प्रमाणात धूळ साचणार नाही. 

इंटेरिअर स्वच्छ ठेवा 

जे लोक कारचा नियमित वापर करतात, ते गाडीच्या स्टोअरेज स्पेसमध्ये काही अतिरिक्‍त वस्तू ठेवण्याचा प्रयत्न करतात. जर अशा काही वस्तू आपल्याकडून स्टोअरेज स्पेसमध्ये राहिल्या असतील, तर त्या तत्काळ बाहेर काढून केबिन स्वच्छ करून घ्या. कारण या वस्तूंमुळे कारमध्ये दुर्गंधी निर्माण होऊ शकते. अनेक दिवसांपर्यंत गाडीचे इंटेरिअर स्वच्छ व सुरक्षित ठेवण्यासाठी औषध फवारणीही करू शकता. 

बॅटरी मेंटेनन्स 

जर खूप दिवसांपर्यंत गाडी बंद राहिली, तर बॅटरी डिस्चार्ज होऊ शकते. त्यामुळे गाडी सुरू करताना मोठी समस्या येऊ शकते. हे टाळण्यासाठी बॅटरीला चार्ज करणे आवश्‍यक आहे. प्रत्येक दोन-तीन दिवसांनी कार स्टार्ट करून 15 ते 20 मिनिटांपर्यंत चालू राहुद्या. यामुळे इंजिन गरम होण्यास मदत होईल. यादरम्यान आपण कारचे वायपर, एसी, लाईट सुस्थितीत आहेत का, याचीही तपासणी करू शकता. 

हॅण्ड ब्रेक 

जर आपली कार एकाच जागेवर खूप दिवसांसाठी उभी राहणार आहे, हे आपल्याला माहिती असेल, तर कारला हॅण्ड ब्रेक न लावता ती उभी करा. खूप दिवसांपर्यंत हॅण्ड ब्रेक लाऊन ठेवल्यामुळे कारचे ब्रेक खराब होऊ शकतात किंवा कारचा ब्रेकही लॉक होऊ शकतो. आपण आपल्या गाडीला सपाट पृष्ठभागावर गिअरमध्ये टाकून उभी करू शकता. जर आपली कार उताराच्या ठिकाणी उभी असेल, तर कारच्या चाकांखाली विट किंवा दगड ठेवून द्या. यामुळे गाडी पुढे जाणार नाही. 

टायर प्रेशर 

तुम्ही गाडी वापरा किंवा नका वापरू, काही वेळानंतर गाडीच्या टायरमधील हवा आपोआप कमी होऊन जाते. अशामध्ये जर खूप दिवसांसाठी कार एकाच जागेवर उभी राहिली, तर टायरवर एका बाजूला फ्लॅट स्पॉट होण्याची शक्‍यता वाढते. त्याचा थेट परिणाम टायरच्या ग्रिप, कारच्या राईड क्‍लॉलिटी आणि मायलेजवर होतो. यामुळे काही ठराविक दिवसांनंतर गाडीला थोडे पुढे मागे करण्याचा प्रयत्न करा, ज्यामुळे टायर फिरू शकतील. तसेच टायरमध्ये हवेचा योग्य दाब आहे की नाही, याकडेही लक्ष द्यायला विसरू नका. हवा कमी असल्यास पेट्रोल पंपावरून टायरमध्ये हवा भरून घ्यावी. 

how to take care of your car during corona virus lockdown period 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com