लॉकडाऊनमध्ये अडकलेल्यांसाठी राबताहेत हजारो हात

राहुल क्षीरसागर
Tuesday, 14 April 2020

लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या नागरिकांना जायचे कुठे? राहायचे कुठे? खायचे काय? करायचे काय? असे प्रश्न भेडसावू लागले होते. अशा अडकून पडलेल्या नागरिकांची राहण्याची, जेवणाची सोय ठाणे जिल्हा प्रशासनाने निवारा कॅम्पमध्ये केली आहे. जिल्ह्यात जवळपास 324 निवारा केंद्रे कार्यरत आहेत. सरकारने सुरू केलेली ही निवारा केंद्रे लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या लोकांसाठी ‘माणुसकीचा झराच’ बनल्याची भावना येथे राहणाऱ्या लोकांकडून व्यक्त होत आहे.

ठाणे : लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या नागरिकांना जायचे कुठे? राहायचे कुठे? खायचे काय? करायचे काय? असे प्रश्न भेडसावू लागले होते. अशा अडकून पडलेल्या नागरिकांची राहण्याची, जेवणाची सोय ठाणे जिल्हा प्रशासनाने निवारा कॅम्पमध्ये केली आहे. जिल्ह्यात जवळपास 324 निवारा केंद्रे कार्यरत आहेत. सरकारने सुरू केलेली ही निवारा केंद्रे लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या लोकांसाठी ‘माणुसकीचा झराच’ बनल्याची भावना येथे राहणाऱ्या लोकांकडून व्यक्त होत आहे.

ठाणे जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाचे 76, कामगार विभागाचे 245, जलसंपदा विभागाचे 3 अशा एकूण 324 निवारा केंद्रांमध्ये 28 हजार 206 लोक वास्तव्यास आहेत. सिडको एक्झिबिशन सेंटरला 280 पेक्षा अधिक लोक आश्रयाला आहेत. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनानुसार कुणीही उपाशी राहणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे.

वाचा सविस्तर : आजारी भावाला खांद्यावर घेऊन त्याची कैक किलोमीटर पायपीट

निवारा केंद्रात सामाजिक अंतर ठेवून या लोकांची राहण्याची सोय केली आहे. येथील लोकांना सकाळी चहा नाश्ता, दुपारी जेवण, सायंकाळी चहा, रात्री जेवण दिले जाते. प्रत्येकासाठी स्वतंत्र गादी, चादर, साबण, टुथपेस्ट, तेल उपलब्ध करून दिले असून, त्यांची नियमित आरोग्य तपासणी केली जाते. त्यांचे समुपदेशन करण्यात येत आहे. 

दरम्यान, ठाणे जिल्हाधिकार्यांनी या लोकांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थांनी पुढे यावे, असे आवाहन केले होते. त्यानुसार भूपेश गुप्ता यांनी पुढाकार घेऊन स्वखर्चाने सकाळचा नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण आणि आवश्यक साधनसामग्री या लोकांना पुरविली आहे.

वाचा सविस्तर : म्हणून कॉलेज कॅम्पसमध्ये पुन्हा काव काव 

कोरोनामुळे विस्थापित झालेल्या लोकांना सन्मानाने जगता यावे यासाठी केलेली ही माणुसकीपोटी मदत म्हणून गुप्ता यांनी सहकार्य करीत असल्याचे त्यांनी सांगितले. हे केवळ एका दिवसापुरते नाही तर 14 एप्रिलपर्यंत दोन वेळचे जेवण देण्याची त्यांनी तयारी दर्शवली. स्वयंसेवी संस्था आणि दानशूर व्यक्ती यासाठी स्वत:हून पुढाकार घेता आहेत. ही आनंदाची गोष्ट आहे. जिल्हाधिकारी व महसूल यंत्रणा यांच्या अतिसुक्ष्म नियोजनामुळे बेरोजगार, निवाराहीन आणि स्थलांतरित लोकांना हक्काचा निवारा प्राप्त झाला आहे.

बिहार येथे बांधकामाचे काम करतो. महाराष्ट्र सरकारने आम्हाला नुसताच निवारा नाही तर दोन वेळेला पोटभर जेवण मिळेल याचीही सोय करून दिली. गावी आम्हाला संपर्क साधण्यासाठी फोनही उपलब्ध करून दिला जातो. मधूनमधून डॉक्टरही येऊन जातात. सरकारचे आमच्यावर खूप उपकार आहेत.
- रामकिशन तिवारी,
निवारा केंद्रातील रहिवासी

या ठिकाणी आमची उत्तम सोय केली आहे. आमची नियमित आरोग्य तपासणी केली जाते. घरच्या इतकीच आपुलकीची वागणूक सरकारकडून मिळत आहे.
- सुधीर पाल, गोंदिया,
निवारा केंद्रातील रहिवासी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A humanitarian for those trapped in lockdown