ICICI बँक प्रकरणः कोचर यांच्या घराचा व्यवहारही ईडीच्या रडारवर

अनिश पाटील
Saturday, 12 September 2020

आयसीआयसीआय बॅंकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) अटक केल्यानंतर त्यांच्या चर्चगेट येथील घराचा व्यवहारही ईडीच्या रडावर आला आहे.

मुंबई: आयसीआयसीआय बॅंकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) अटक केल्यानंतर त्यांच्या चर्चगेट येथील घराचा व्यवहारही ईडीच्या रडावर आला आहे.

चर्चगेट येथील क्रिकेट क्लब ऑफ इंडिया क्लबजवळील सीसीआय चेंबर येथे कोचर यांचे घर आहे. ईडीने याप्रकरणी केलेल्या तपासानुसार,19 फेब्रुवारी, 1996 मध्ये  मे. क्रेडेन्शिअल फायनान्स लि.(सीएफएल) यांनी पाच कोटी 25 लाख रुपयांना हे आलिशान घर खरेदी केले होते. त्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया होम फायनान्सकडून चार कोटी 70 लाख रुपयांचे कर्ज घेण्यात आले होते. सीएफएलचे हे कर्ज थकले. त्यासाठी चर्चगेटमधील हे घर गहाण ठेवण्यात आले होते. 2009 मध्ये व्हीडिओकॉन ग्रुपने या रुमचे थकीत देणे भरले. त्यानंतर या घराचे मालकी हक्क मे. क्वॉलिटी अप्लायन्सेस प्रा. लि.(सध्या क्वालीटी टेक्नो अॅडवायजर) यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आले. या कंपनीचे सर्व समभाग 26 नोव्हेंबर, 2016 मध्ये क्वॉलिटी अॅडव्हायजर या ट्रस्टने अवघ्या 11 लाख रुपयांना घेतले. त्यामुळे या कंपनीचे सर्व मालमत्ता (चर्चगेट येथील साडे पाच कोटींच्या घरासहीत) या ट्रस्टच्या नावावर झाले. क्वालीटी अॅडव्हायजरही ट्रस्ट चंदा कोचर यांच्या आईने स्थापन केली होती. दीपक कोचर या ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त आहेत. विशेष म्हणजे 1996 पासून कोचर कुटुंब याच घरात राहत आहेत. त्यामुळे हा सर्व व्यवहार संशयास्पद असून ईडी याप्रकरणी अधिक तपास करत असल्याची माहिती वरिष्ठ अधिका-याने दिली.

उद्योगपती वेणूगोपाळ धूत आणि चंदा कोचर यांचे पतीन दिपक कोपर यांनी एकत्र येऊन नूपावर रिन्यूवेबल ही कंपनी स्थापन केली होती. त्या कंपनीच्या नावावर 64 कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात आले होते. त्याशिवाय व्हीडीओकॉन ग्रुपच्या पाच कंपन्यांच्या नावावर तीन हजार 250 कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात आले होते. त्यातील 86 टक्के रक्कम म्हणजेच दोन हजार 810 कोटी रुपये देण्यात आलेले नाही. त्यानंतर 2017 मध्ये या कर्जाला बुडीत घोषित करण्यात आले होते.

नूपावरमध्ये दीपक कोचर आणि धूत यांचे 50-50 टक्के भागिदारी होती. दीपक कोचर यांना या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बनावण्यात आले होते. त्यानंतर धूत यांनी या कंपनीचे संचालक पद सोडले. धूत यांनी आपले अडीच लाख रुपयांमध्ये 24 हजार 999 शेअर्स न्यूपावरवर हस्तांतरीत केले होते.

दीपक कोचर यांना व्हिडिओकॉनने सहाय्य करावं यासाठी हे कर्ज देण्यात आले, या आरोपांमुळे चंदा कोचर यांना आयसीआयसीआय बॅंकेच्या प्रमुखपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. हाच ठपका या गुन्ह्यातही कोचर यांच्याविरोधात ठेवण्यात आला आहे. गुन्ह्यातील या मुख्य व्यवहारासोबत कोचर यांच्या घराचा व्यवहारही ईडीच्या रडावर आला आहे. त्याबाबत अधिक तपास केला जात असल्याचे अधिका-याने सांगितले.

----------------------

(संपादनः पूजा विचारे) 

ICICI Bank Case Kochhar house deal only 11 lakh


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ICICI Bank Case Kochhar house deal only 11 lakh