Mumbai : वाघ, सिंहासाठी राणी बागेत आयसीयू ; प्राण्यांची आरोग्य चिंता मिटणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai

वाघ, सिंहासाठी राणी बागेत आयसीयू ; प्राण्यांची आरोग्य चिंता मिटणार

मुंबई : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात (राणी बाग) प्राण्यांसाठी आता सुसज्ज रुग्णालय उभारण्यात येणार आहे. या रुग्णालयात प्राण्यांसाठी खास अतिदक्षता विभागही (आयसीयू) असेल. येत्या वर्षात हे रुग्णालय कार्यरत होणार असल्याने बागेतील प्राण्यांच्या आरोग्याची चिंता मिटणार आहे.

राणीच्या बागेत सध्या लहान प्राण्यासाठी तसेच पक्ष्यांसाठी रुग्णालय आहे. आता बागेत वाघ, बिबट्यादेखील दाखल झाला आहे. येत्या काळात परदेशातून कांगारू, झेब्रा, जिराफ असे प्राणी तर देशातील इतर भागातून सिंहासह इतर प्राणी आणण्यात येणार आहेत. या प्राण्यांच्या अनेकदा आरोग्याच्या समस्या उद्बवतात. त्यामुळे उपचारात अडथळे येत असल्याने या प्राण्यांसाठी पाच हजार चौरस फुटांचे रुग्णालय बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राणीच्या बागेत या रुग्णालयाचे काम सुरू असून यात प्राण्यांसाठी सर्व आवश्‍यक सुविधा उपलब्ध असतील, असे प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी सांगितले. प्राण्यांसाठी आयसीयूसारखीही सुविधा यात असेल, असेही त्यांनी सांगितले.

प्रदर्शनी अन्‌ पारदर्शक गॅलरी

१ राणी बागेत रुग्णालया-बरोबरच पक्षी, इतर प्राण्यांचे विलगीकरण कक्ष, माकड प्रदर्शन सुविधा, मगर सुसर यांची प्रदर्शनी बांधण्यात येणार आहे. या प्राण्यांसाठी रात्रीची निवासस्थाने बांधण्याबरोबर तेथील पाणी कायम स्वच्छ राहील, अशी यंत्रणा तयार करण्यात येत आहेत. यासाठी पालिका ६० कोटी ६२ लाख रुपयांचा खर्च करत आहे.

२प्राणिसंग्रहालयाभोवती आवश्‍यक भिंती आणि काटेरी तारेचे कुंपणही बांधण्यात येत आहे. माकडांची रात्रीची निवासस्थाने आणि त्यांना फिरण्यासाठी जागा, त्याचबरोबर मगर, सुसर असे प्राणी पाण्याखाली पोहताना पाहाण्यासाठी पारदर्शक गॅलरीही बांधण्यात येईल.

loading image
go to top