हॉल तिकिटावरून पटली मृतदेहाची ओळख 

मंगेश सौंदाळकर
रविवार, 4 नोव्हेंबर 2018

मुंबई : नोकरीच्या शोधात नेपाळहून मुंबईला आलेल्या युवकाचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला होता. राजेंद्र सुग्रीव आहिर (18) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडील दहावीच्या हॉल तिकिटावरून त्याच्या नातेवाइकांचा शोध घेण्यात वांद्रे रेल्वे पोलिसांना यश आले. राजेंद्रचा मृतदेह पाहून त्याच्या नातेवाइकांना अश्रू अनावर झाले. गुरुवारी मुंबईत राजेंद्रच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

मायानगरीत अनेक जण नोकरीच्या शोधात येतात. त्याचप्रमाणे हालाखीच्या परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी राजेंद्रने मुंबईत येण्याचे ठरवले. नेपाळच्या कपिलवास्तु येथील दुर्गम भागातून तो महिन्याभरापूर्वी मुंबईत आला होता. नोकरी करून आई-वडील, चार भावडांचा उदरनिर्वाह करू, असे स्वप्न त्याने उराशी बाळगले होते. नोकरीच्या शोधात प्रसंगी त्याला पदपथावरही राहावे लागले. नोकरी मिळेल या आशेने तो मुंबईच्या उपनगरांत फिरत होता. 28 ऑक्‍टोबरला विलेपार्ले-सांताक्रुझदरम्यान लोकल अपघातात त्याचा मृत्यू झाला आणि नोकरीचे स्वप्न अपूर्णच राहिले. पोलिसांनी पंचनामा करून राजेंद्रचा मृतदेह कुपर रुग्णालयात पाठवला. या वेळी पोलिसांना हॉल तिकीट मिळाले. त्यावरून राजेंद्र हा नेपाळचा रहिवासी असल्याचे सिद्ध झाले. वरिष्ठ निरीक्षक सुनीलकुमार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल ए. एस. सय्यद आणि पोलिस नाईक संदीप साळे यांनी त्याच्या नातेवाइकांचा तपास सुरू केला. 

नेपाळच्या पोलिसांची मदत 
पोलिसांनी तपासात एका नेपाळी पोलिस मित्राची मदत घेतली. राजेंद्रच्या हॉल तिकिटाचा फोटो नेपाळ पोलिस अधीक्षक कार्यालयाला पाठविण्यात आला. हॉलतिकिटवरील शाळेच्या पत्त्यानुसार कपिलवास्तु येथील दुर्गम भागातील शाळेत नेपाळ पोलिसांचे पथक गेले. त्यानंतर पोलिसांना राजेंद्रच्या घरचा पत्ता मिळाला. कपिलवास्तु गोवरी क्र. 7 इतकाच पत्ता पोलिसांकडे होता. अखेर शोध घेतल्यानंतर पोलिसांना राजेंद्रचे घर सापडले. पोलिसांनी राजेंद्रच्या मृत्यूची माहिती त्याच्या नातेवाइकांना दिली. गुरुवारी राजेंद्रचे दोन भाऊ रामअवतार आणि धर्मेद मुंबईत आले. पोलिसांनी त्यांना कुपर रुग्णालयात नेले. तेथे राजेंद्रचा मृतदेह दाखवला. त्यानंतर विलेपार्ले येथे राजेंद्रच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

Web Title: Identity of the deceased from the Hall ticket