धनुष्यबाण चिन्ह असते तर जास्त मते मिळाली असती; बिहारबाबत चंद्रकांत खैरे यांची प्रतिक्रिया

धनुष्यबाण चिन्ह असते तर जास्त मते मिळाली असती; बिहारबाबत चंद्रकांत खैरे यांची प्रतिक्रिया

मुंबई ः खरे पाहता बिहारमध्ये पुढच्या निवडणुकीची तयारी करण्यासाठी तसेच तेथील कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आम्ही शेवटच्या क्षणी निवडणुक लढवायचे ठरवले. पण नितीश कुमार यांनी मुद्दाम आम्हाला धनुष्यबाण चिन्ह मिळू दिले नाही, ते मिळाले असते तर आम्हाला जास्त मते मिळाली असती, असे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी सकाळ ला सांगितले. 

बिहारमध्ये शिवसेनेला खातेही उघडता न आल्यामुळे सेनेचे कोणीही चाणक्य आता प्रतिक्रिया देण्यास तयार नाहीत. त्यामुळे फक्त प्रतिकात्मक पद्धतीने लढण्यासाठी किंवा आपले नाव तेथील निवडणुक आयोगाच्या दप्तरी नोंदलेले रहावे यासाठी शिवसेना तेथे लढली हा एकच तर्क समोर येऊ शकतो, असे राजकीय विश्लेषक सांगत आहेत. भाजप -  नितीशकुमार आघाडीला अपशकून करण्याचीही शिवसेनेची तेथे ताकद नव्हती. सध्या राष्ट्रीय राजकारणात आपला दबदबा वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याच डावपेचांचा एक भाग म्हणून आपले अस्तित्व सगळीकडे दाखविण्याचा प्रयत्न म्हणून बिहारमध्येही निवडणुक लढविली हाच त्यांचा एकमेव हेतू असावा, असेही एका सत्ताधारी नेत्याने सांगितले. 

खैरे यांनी मात्र सकाळकडे खुलेपणाने आपली भूमिका मांडली. पूर्वी जनसंघाचे निष्ठावान कार्यकर्ते आपले दिवा हे चिन्ह घराघरात जावे यासाठी चिकाटीने प्रयत्न करीत असत. जरी निवडणुक हरले, डिपॉझिट गमावले तरीही ते हार मानीत नसत, त्याचे परिणाम आज आपल्याला दिसत आहेत. त्याचप्रमाणे पुढच्या निवडणुकांसाठी तेथे व्यूहरचना करून कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आम्ही ही निवडणुक लढवली. खरे सांगायचे तर आम्ही सगळेच नेते महाराष्ट्रातील आपापल्या शहरांमध्ये कोरोनाग्रस्तांच्या सेवेत अडकलो होतो. त्यामुळे फारशी आखणीही करता आली नाही, मात्र एकदा तेथे गेल्यावर सर्वोच्च प्रयत्न केले. मी, प्रियंका चतुर्वेदी, अनिल देसाई, पंजाब चे राज्यप्रमुख असा आम्ही प्रचार केला. माझ्याबरोबर संभाजीनगरचे पदाधिकारीही होते. उत्तर प्रदेशात आमचे संघटन मजबूत आहे, तसे बिहारमध्ये नाही. मात्र अशीच चिकाटीने पक्षाची ताकद वाढेल हे निश्चित, असेही ते म्हणाले. 

निवडणुक आयोगाच्या लेखी आमचे अस्तित्व टिकावे हा हेतू तर होताच. मात्र मला दिल्ली विधानसभा निवडणुकीची आठवण यानिमित्ताने येते. तेथील चार मतदारसंघात आम्ही भाजपचे उमेदवार पाडले. तेथे आम्हाला अगदी 250 ते 1,700 मते मिळाली व त्या त्या ठिकाणी नेमक्या साधारण तितक्याच मतांनी भाजपचे उमेदवार पडले. अर्थात आम्ही काही भाजपला पाडण्यासाठीच म्हणून उभे रहात नाही, पण त्यांचे काही नेते आम्हाला नगण्य समजण्याची चूक करतात हे देखील तितकेच खरे, असेही खैरे म्हणाले. 

नितीशकुमार यांचे चिन्ह बाण होते व त्याचमुळे मतदारांचा गोंधळ होऊ नये म्हणून नितीशकुमार यांनी आम्हाला धनुष्यबाण चिन्ह मिळू दिले नाही. आम्हाला तुतारीवाला माणूस हे चिन्ह मिळाले, धनुष्यबाण चिन्ह असते तर निश्चितच फरक पडला असता. आमचे डिपॉझिट गेले हे खरे आहे, मात्र आम्ही हळुहळू ताकद वाढवणार अशी खात्रीही खैरे यांनी व्यक्त केली.

If there was a bow and arrow more votes would have been received Chandrakant Khaires reaction about Bihar

-----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com