हिंमत असेल तर वेगवेगळे लढून दाखवा! 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 12 February 2020

चंद्रकांत पाटील यांचे मविआला आव्हान 

नवी मुंबई : हिंमत असेल तर भाजपविरोधात वेगवेगळे लढून दाखवा, असे जाहीर आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कॉंग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसला दिले. नवी मुंबईत 15 व 16 फेब्रुवारीला होणाऱ्या भाजपच्या राज्यव्यापी अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पाटील आले होते.

हेही वाचा - मोदींची पुन्हा तुलना छत्रपतींशी

त्या वेळी वृत्तवाहिन्यांशी बोलताना पाटील यांनी दिल्ली निकालावरून मविआवर निशाणा साधताना त्यांना वेगवेगळे लढण्याचे आव्हान दिले. याप्रसंगी पाटील यांनी वाशीत कार्यकर्ता मेळावा घेऊन महापालिका निवडणुकांच्या कामाला लागण्याच्या सूचनादेखील पदाधिकाऱ्यांना दिल्या. 

दिल्ली विधानसभेत आपने भाजपला पराभवाची धूळ चारल्यानंतर यावर बोलताना पाटील यांनी भाजपच्या अपयशाचे खापर कॉंग्रेसवर फोडले. शेवटच्या चार दिवसांत कॉंग्रेसने त्यांची मते आपकडे वळवली. भाजपविरोधात कॉमन मिनिमम प्रोग्रॅमच्या नावावर हव्या त्या मुद्द्यावर जुळवून घेण्याचे काम तिन्ही पक्षांकडून सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली. याप्रसंगी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली वाशीमध्ये नगरसेवक व प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मेळावा झाला.

महत्त्वाची बातमी - ते प्रवासी पीत होते ट्रेनच्या टाॅयलेटमघलं पाणी

पक्षांतर करून आलेल्यांचा सन्मान महापालिका निवडणुकीत राखला जाईल, अशी ग्वाही पाटील यांनी दिली. तसेच महापालिका निवडणुकीची धुरा ऐरोलीचे आमदार गणेश नाईक, बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या खांद्यावर सोपवली. या निवडणुकीत जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांच्यावरही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 

राज्यव्यापी अधिवेशनाची धुरा नवी मुंबईवर 

भाजपच्या दर तीन वर्षांनी होणाऱ्या राज्यव्यापी अधिवेशनाची जबाबदारी यंदा नवी मुंबईच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. 15 फेब्रुवारीला नेरूळमधील तेरणा महाविद्यालयाच्या सभागृहात एक अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात राज्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार असून महत्वांच्या मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे. तसेच 16 फेब्रुवारीला सायन-पनवेल महामार्गालगत असणाऱ्या रहेजा मैदानावर भव्य सभामंडपात राज्यव्यापी अधिवेशन होईल. या अधिवेशनात केंद्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह राज्यातील भाजपचे सर्व खासदार उपस्थित राहणार आहेत. याबाबत सुरू असलेल्या तयारीचा आढावा पाटील यांनी घेतला. 
 

web title : If you dare, try to run election alone said by chandrakant patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: If you dare, try to run election alone said by chandrakant patil